मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४७९१ ते ४८००

बोधपर अभंग - ४७९१ ते ४८००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४७९१॥
निरोप सांगतां । न धरीं भय न करीं चिंता ॥१॥
असो ज्याचें त्याचे माथां । आपण करावी ते कथा ॥२॥
उतरावा भार । किंवा न व्हावें सादर ॥३॥
तुका म्हणे वाहे धाक । तया इह ना परलोक ॥४॥

॥४७९२॥
इच्छेचें पाहिलें । डोळीं अंतीं मोकलिलें ॥१॥
यांचा विश्वास तो कायी । ऐसें विचारुनि पाहीं ॥२॥
सुगंध अभ्यंगें पाळितां । केश फिरले जाणतां ॥३॥
पिंड पाळितां ओसरे । अवघी घेऊनि मागें सरे ॥४॥
करितां उपचार । कोणा नाहीं उपकार ॥४॥
अल्प जीवन करीं । तुका ह्मणे साधीं हरी ॥५॥

॥४७९३॥
जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षाळिले वरी वरी ॥१॥
अंतरींचें शुद्ध कासयानें झालें । भूषण त्वां केलें आपणया ॥२॥
वृंदावन फळ घोळिलें साकरा । भीतरील थारा मोडेचिना ॥३॥
तुका ह्मणे नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कासया फुंदा तुह्मी ॥४॥

॥४७९४॥
जप तप ध्यान नलगे धारणा । विठ्ठलकीर्त्तनामाजी सर्व ॥१॥
राहें माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥२॥
कीर्तनसमाधि साधन ते मुद्रा । राहतील थारा धरोनियां ॥३॥
तुका ह्मणे मुक्ति हरिदासांच्या घरीं । वोगळती चारी ऋद्धिसिद्धी ॥४॥

॥४७९५॥
मायबाप करिती चिंता । पीर नाईके सांगतां ॥१॥
नको जाऊं देऊळासी । नेतो बागुल लोकांसी ॥२॥
कर्णद्वारें पुराणिक । भुलवी शब्दें लावी भीक ॥३॥
वैष्णवा संगती । हातीं पडलीं नेणों किती ॥४॥
आम्हा कैंचा मग । करिसी उघडियांचा संग ॥५॥
तुका म्हणे जाणें नरका । त्यांचा उपदेश आइका ॥५॥

॥४७९६॥
तडामोडी करा । परि उत्तम तें भरा ॥१॥
जेणें खंडे एके खेपे । जाय तेथें लाभें वोपे ॥२॥
दाविल्या सारिखें । मागें नसावें पारिखें ॥३॥
मागें पुढें ऋण । तुका ह्मणे फिटे हीण ॥४॥

॥४७९७॥
नसावें ओशाळ । मग मानिती सकळ ॥१॥
जाय तेथें पावे मान । चाले बोलिलें वचन ॥२॥
राहों नेदी बाकी । दान ज्याचें त्यासी टाकी ॥३॥
होवा वाटे जना । तुका म्हणे साटीं गुणां ॥४॥

॥४७९८॥
चालिती आड वाटा । आणिकां दाविती जे नीटा ॥१॥
न मनीं तयांचे उपकार । नाहीं जोडा तो गव्हार ॥२॥
विष सेवूनी वारी मागें । प्राण जातां जेणें संगें ॥३॥
बुडतां हाक मारी । ठाव नाहीं आणि कां वारी ॥४॥
तुका ह्मणे न करीं हिका । गुण घेऊन अवगुण टाका ॥५॥

॥४७९९॥
दिन दिन शंका वाढे । आयुष्य नेणवतां गाढें ॥१॥
कैशीं भूलली बापुडीं । दंभ विषयांच्या सांकडीं ॥२॥
विसरलीं मरण । त्याची आठवण ॥३॥
देखत देखत पाहीं । तुका ह्मणे आठव नाहीं ॥४॥

॥४८००॥
सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥१॥
आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं टळों नये ॥२॥
समय सांभाळूनी आगळे उत्तर । द्यावें भेदी वज्र तयापरी ॥३॥
तुका ह्मणे तरी ह्मणवावें सेवक । खादलें तें अन्न हक्क होय ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP