मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५१९१ ते ५२००

बोधपर अभंग - ५१९१ ते ५२००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५१९१॥
जिवें जित कोष्टी खांचे घातलासे । विणी सावकाशें एक चित्तें ॥१॥
जोडुनियां तंतू सांधी बर्‍यावोजा । आवडत्या काजा संसारीच्या ॥२॥
तुका ह्मणे तैसें देवापायीं चित्त । राहिलिया नित्य धन्य तोचि ॥३॥

॥५१९२॥
भक्तिचिया पेंठे आणियलें केणें । सांगतों हें घेणें लागे तैसें ॥१॥
सुखाचे शेजारीं मांडिलें दुकान । ठेविलें सोडून आवडीये ॥२॥
सुखाचें सवंग फुकाचें साचार । भरलें अपार न सरेचि ॥३॥
थोर थोर मागें होते भाग्यवंत । त्यांहीं साधु संत पारखीले ॥४॥
तुका ह्मणे घडी घडीनें मालाची । पाहिजे त्या रुची घेती मोलें ॥५॥

॥५१९३॥
जयाचे स्मरणें वारिती दुरीतें । भवसिंधू रितें होय नामें ॥१॥
जन्म जया कुळी वंश वंशावळीं । तारिले सकळी नाम घेतां ॥२॥
अवचट नाम स्मरे वाचे राम । तया नाहीं धाम यमाचेंही ॥३॥
तुका ह्मणें त्याची कोटी कुळें जात । नित्य गात गीत वैकुंठासी ॥४॥

॥५१९४॥
असत्या विटाळ हा नव्हे मत्सर । सांगतों साचार आइकावें ॥१॥
येऊं नका रागा शिकवणेसाठीं । उपेगाची गोष्टी पुढें आहे ॥२॥
लटिक्याच सोंगें नेली सीता सतीं । कुळेंसह होती भस्म राज्य ॥३॥
असत्यानें छळी पंडुचिया पुत्रां । कुंभपाकीं यात्रा दुर्योधना ॥४॥
तुका म्हणे ऐसें सांगों किती मागें । बहुतां प्रसंगें दु:ख दिलें ॥५॥

॥५१९५॥
भाग्य पुरुषाची देखिली संपदा । आपली आपदा जाइच ना ॥१॥
कुणब्याचें शेत पाहे डोळेभरी । आपलें तें घरीं अन्न नाहीं ॥२॥
देह कष्टवीना ज्ञानाचा अभाव । कैसी देवराव कृपा करी ॥३॥
ओळखीकारणें अर्जव करिती । तेव्हां त्याची रिती कळूं लागे ॥४॥
तुका ह्मणे आशा दुराशा त्यजावी । मुक्तीची पदवी पावतसे ॥५॥

॥५१९६॥
सर्व देव साधा । परी अवगुण बाधा ॥१॥
नव्हे ह्मणवूनि सरी । राहे एका एक दुरी ॥२॥
उंस कांदा एक आळा । परी गोडीचा निराळा ॥३॥
तुका ह्मणे नव्हे सरी । विष अमृताचे परी ॥४॥

॥५१९७॥
शुद्ध गौरवापुरतें । फळ सत्यत्व संकल्पें ॥१॥
योगा कठिण त्या क्षेम । होतो वोकल्यानें श्रम ॥२॥
हात पावे शिवे पाशीं । क्लेश उरत ते क्लेशीं ॥३॥
तुका ह्मणे बहु आणी । खोटे निघालीया रणीं ॥४॥

॥५१९८॥
सर्व दुर्बळ हे जन । नारायणें विन्मुख ॥१॥
हात सांडुनियां जाती । पात्र होती दंडासी ॥२॥
शिदोरी ते पाप पुण्य । सवें शिण भिकेचा ॥३॥
तुका ह्मणे नाहीं नाश । आह्मा म्हणविल्या दास ॥४॥

॥५१९९॥
सर्वा पुरे ऐसा वाण । आलें धन घरासी ॥१॥
घ्यारे फुका मोलेंविण । नारायण न भुला ॥२॥
ऐसा कळलियां मन । श्रोते कान सादर ॥३॥
तुका ह्मणे हरी । यत्न प्रल्हादासी करी ॥४॥

॥५२००॥
काय नसे दैन्यवाणें । कांहीं तुमच्या कृपेनें ॥१॥
हेचि तयाचि ओळखी । धाले संतोष त्या मुखीं ॥२॥
वांयां जात नाहीं । प्रीतिवचन तें कांहीं ॥३॥
तुका ह्मणे देवा । सत्य येतें अनुभवा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP