मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४७४४ ते ४७५०

बोधपर अभंग - ४७४४ ते ४७५०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४७४४॥
अधिकार तैस दावियेला मार्ग । चालतां हें मग काळों येतें ॥१॥
जाळूं नये नांव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥
तुका ह्मणे रोग वैद्याचे अंगी । नाहीं करी जनी उपकार ॥३॥

॥४७४५॥
आहे ते सकळ कृष्णाची अर्पण । न कळता मन दुजें भावी ॥१॥
ह्मणऊनी पाठी लागतील भूते । येती गवसीत पांचजणें ॥२॥
ज्याचें त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥३॥
तुका ह्मणे काळें चेंपियेला गळा । मी मी वेळोवेळी करीतसे ॥४॥

॥४७४६॥
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥
न करितां परनिंदा परद्रव्य अभिलाष । काय तुमचें यास वेचे सांगा ॥२॥
बैसकिये ठायीं ह्मणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥४॥
खरे बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास तुमचें सांगा ॥५॥
तुका ह्मणे देव जोडे याचसाठीं । आणीक ते आटी न लगे कांही ॥६॥

॥४७४७॥
चित्त समाधानें । तरी विष वाटे सोनें ॥१॥
बहू खोटा अतिशय । जाणां भले सांगो काय ॥२॥
मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळें ॥३॥
तुका ह्मणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥४॥

॥४७४८॥
परिमळ म्हणून चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥
काय एक नव्हे धरितां अंतरी । कासवीचे परी वेळोवेळां ॥२॥
मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनी नाद पाहूं नये ॥३॥
कर्मफळ ह्मणुनी इच्छूं नये काय । तुका ह्मणे वर्म दावूं लोकां ॥४॥

॥४७४९॥
दुर्जनासि करी साह्य । तो ही लाहे दंड हे ॥१॥
शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥२॥
येर येरा कांचणी भेटे । आगी उठे तेथूनी ॥३॥
तुका ह्मणे कापूं नाकें । पुढे आणिकें शिकविती ॥४॥

॥४७५०॥
करावी ते पूजा मनोंचि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥१॥
कळावें तयासि कळे अंतरींचें । कारण तें साचें सावा अंगी ॥२॥
अतिशया अंती लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥३॥
तुका ह्मणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP