मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४७६१ ते ४७७०

बोधपर अभंग - ४७६१ ते ४७७०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४७६१॥
आपुलाल्या तुह्मी रुपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥१॥
हें तों नव्हे देहबुद्धींचें कारण । होईल नारायणें दान केलें ॥२॥
बब्रूचिया बाणें वर्मासि स्पर्शावें । हें तों नाहीं ठावें मोकलित्या ॥३॥
तुका म्हणे बहु मुख्य हा वचना । सत्याविण जाणा चाल नाहीं ॥४॥

॥४७६२॥
विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दूरी तो सोंवळा ॥१॥
गद्यें पद्यें कांही न धरावी उपाधी । स्वाधिनचि बुद्धि करुनी ठेवा ॥२॥
विचाराचें कांहीं करावें स्वहित । पापपुण्यांचीत भांडवल ॥३॥
तुका ह्मणे न लगे जावें वनांतरा । विश्व विश्वभरा सारिखेंचि ॥४॥

॥४७६३॥
धन्य तें संसारी । दयावत जे अंतरी ॥१॥
येथें उपकारासाठी । आलें घर ज्या वैकुंठीं ॥२॥
लटिकें वचन । नाहीं देही उदासीन ॥३॥
मधुरा वाणी ओटीं । तुका ह्मणे वाव पोटी ॥४॥

॥४७६४॥
मोकळें मन रसाळ वाणी । या चि गुणी संपन्न ॥१॥
लक्ष्मी ते ऐशा नांवें । भाग्ये ज्यावें तरि यांनीं ॥२॥
नमन नम्रता अंगीं । नेघे रंगी पालट ॥३॥
तुका ह्मणे त्याच्या नांवें । घेतां व्हावें संतोषीं ॥३॥

॥४७६५॥
केलें पाप जेणें दिलें अनुमोदन । दोघांसी पतन सारिखें चि ॥१॥
विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥२॥
देखिलें ओढाळ निघालिया सेता । टाळावें निमित्ता थैक म्हूण ॥३॥
तुका ह्मणे जोडे केल्याविण कर्म । देखतां तो श्रम नमविता ॥४॥

॥४७६६॥
अभिमानाची स्वामिनी शांति । महत्व घेती सकळ ॥१॥
कळोनिही न कळे वर्म । तरि श्रम पावती ॥२॥
सर्व सत्ता करितां धीर वीर्या वीर आगळा ॥३॥
तुका ह्मणे तिखट तिखें । मृदसखें आवडी ॥४॥

॥४७६७॥
आर्तभूतांप्रति । उत्तम योजाव्या त्या शक्ति ॥१॥
फळ आणि समाधान । तेथें उत्तम कारण ॥२॥
अल्पें तो संतोषी । स्थळीं सांपडे उदेसी ॥३॥
सहज संगम । तुका ह्मणे तो उत्तम ॥४॥

॥४७६८॥ आणुनियां मना । आवघ्या धांडोळिल्या खुणा ॥ देखिला तो राणा । पंढरपूरनिवासी ॥१॥
यासी अनुसरल्या काय घडे ऐसें वांयां जाय ॥ देखिले ते पाय । सम जीवीं राहाती ॥२॥
तो देखावा हा विध । चिंतनें तें कार्य सिद्ध ॥ आणिकां संबंध । नाहीं पर्वकाळासी ॥३॥
तुका ह्मणे खळ । होती क्षणेंचि निर्मळ ॥ जाऊनियां मळ । वाळवंटी नाचती ॥४॥

॥४७६९॥
बहुत सोसिलें मागें न कळतां । पुढती काय आतां अंध व्हावें ॥१॥
एकाचिये अंगी हें ठेंवावें लावून । नये भिन्ना भिन्न चांचपडो ॥२॥
कोण होईल तो ब्रह्मांडचाळक । आपणचि हाक देईल हाके ॥३॥
तुका ह्मणे दिलीं चेतवूनि सुनी । कौतुकांवांचूनि नाहीं छळ ॥४॥

॥४७७०॥
वाहलियां मान न मनावी निश्चिती । भूतांचिये प्रीति भूतपण ॥१॥
म्हणऊनि मना लावावी कांचणी । इंद्रियांचे झणी ओढी भरे ॥२॥
एका एकपणें एकाचिये अंगी । लागें रंग रंगी मिळलिया ॥३॥
तुका म्हणे देव निष्काम निराळा । जीवदशे चाळा चळणांचा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP