मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५१८१ ते ५१९०

बोधपर अभंग - ५१८१ ते ५१९०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५१८१॥
सत्य तेंचि धर्म सत्य तेंचि नेम । सत्यामुखीं नाम सर्वकाळ ॥१॥
सत्या घडे भक्ति सत्या जोडे शांतीं । सत्यापाशीं मुक्ति तिष्ठतसे ॥२॥
सत्य तेंचि त्प सत्या घडे जप । सत्य तेंचि रुप सद्भक्तीचें ॥३॥
सत्य तोचि धीर सत्य कुळाचार । सत्य तोचि सार ज्ञानमार्गा ॥४॥
सत्याचार शीळ सत्य तें प्रबळ । योग तो सफळ सत्य होय ॥५॥
सत्यापाशीं देव उभा स्वयंमेव । तुका ह्मणे देव भक्तां साह्य ॥६॥

॥५१८२॥
शांती जया अंगीं बाणली तयासी । देहभान त्यासी नाहीं जाण ॥१॥
शत्रु मित्र बंधु ब्रह्मांड सोयरे । नाहीं मानींत रे भेद बुद्धी ॥२॥
काम क्रोध लोभ नये दंभ चित्ता । न धरी सर्वथा आशापाश ॥३॥
जयासी सकळ दया सर्वाभूतीं । तुका ह्मणे चित्तीं तोचि देव ॥४॥

॥५१८३॥
एकांतींचा वास आवडला मना । बोडिली वासना समुळेंसी ॥१॥
होउनी नि:शंक सेवावें अरण्य । जोडी करा पुण्य वैराग्याची ॥२॥
पोटा लागे तरी समयीं वनांत । फळ पुष्प पत्र कांहींतरी ॥३॥
धीर करुं संगीं नाम गावें सदा । हृदयीं गोविंदा सांठवूनी ॥४॥
नसावें भाषण दुजा अक्षरेसी । रामकृष्ण ऐसीं वांचोनियां ॥५॥
तुका ह्मणे ऐसा धरावा निर्धार । भवनदी पार तोचि एक ॥६॥

॥५१८४॥
ऐका सेट धरणींत । गोपीनाथ सावध ॥१॥
खोटा चाकर चाकर किटी कर समत्व ॥२॥
कामकाजधंदा गोड । ते पवाडे ऐकताम ॥३॥
तुका ह्मणे तोचि धणी । नारायणीं साक्षात ॥४॥

॥५१८५॥
पोटासाठीं ज्ञानी । कीर्ति थोराची वाखाणी ॥१॥
असो कोठील मी कोण । करुं विचार हा नेणें ॥२॥
आहे उभा जवळीच । देवा मागणें तें साच ॥३॥
तुका ह्मणे स्तुती । करी नर धिग माती ॥४॥

॥५१८६॥
पोटा न मिळे खावया । जाय वायां न करी ॥१॥
कर्म सांडुनियां धर्म । व्यर्थ श्रम करीत ॥२॥
नाना सोंगें द्रव्यासाठीं । करी आटी आर्जव ॥३॥
तुका ह्मणे नेणे वर्म । जोडी कर्म पातक ॥४॥

॥५१८७॥
गृह धन मोह त्यागियला देह । झाला उर्ध्व बाहो शुद्ध बुद्ध ॥१॥
देव राखे जैसें ठेविलिया ठायीं । निश्चळ हृदयीं राहे तेथें ॥२॥
वन दारा राहे हिंडे इच्छा करी । आवडती परी त्याग केला ॥३॥
तुका ह्मणे कदां नाहीं धैर्या भंग । तेथें चि श्रीरंग वस्ती राहे ॥४॥

॥५१८८॥
निर्वाहाकारणें वृक्षाची संगती । न बैसेचि क्षीत थाडेश्वर ॥१॥
सोसीतसे जाच शरीर क्लेशासी । धरुनी मानसीं नारायण ॥२॥
पोटाची विपत्ती सांगों नेणें जना । अंतरीं भावना दुजी नाहीं ॥३॥
तुका ह्मणे काया कष्ट अनुष्ठान । तया नाहीं येणें जाणे कोठें ॥४॥

॥५१८९॥
अवघ्या पदार्थी त्यजियली भ्रांती । या नांवें विरक्ति अंगा आली ॥१॥
स्वप्नांत हीं नेणें जनांचें सौजन्य । सेविलें अरण्य एकांतीया ॥२॥
असो नसो खाया वांचो मरो देहे । न पाहेचि सोये जीवित्वाची ॥३॥

॥५१९०॥
दाविले प्रकार निवंडिलें सार । आश्चर्य साचार जनालागीं ॥१॥
आणियेली पानें बैसलासे हाटीं । गिर्‍हाइक दृष्टी आणिताती ॥२॥
जयासी पाहीजे तितुकेंच दिलें । कृपाया विठ्ठलें केली तैसी ॥३॥
तुका ह्मणे ज्याचे पोटीं असे वाव । त्यांनीं तैसा देव जोडियेला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP