मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४७८१ ते ४७९०

बोधपर अभंग - ४७८१ ते ४७९०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४७८१॥
काय एकां झालें तें कां नाहीं ठावें । काय हें सांगावें काय म्हूण ॥१॥
देखतील डोळां ऐकतील कानीं । बोलिलें पुराणीं तेंहि ठावें ॥२॥
काय हें शरीर साच कीं जाणार । सकळ विचार जाणती हा ॥३॥
कां हें कळों नये आपुलें आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ॥४॥
कां हें आवडलें प्रियापुत्रधन । काय कामा कोण कोणा आलें ॥५॥
कां हें जन्म वायां घातलें उत्तम । कां हे रामराम न ह्मणती ॥६॥
काय भुली यांसी पडली जाणतां । देखती मरतां आणिकांसी ॥७॥
काय करिती हे बांधलिया काळें । तुका ह्मणे बळें वज्रपाशीं ॥८॥

॥४७८२॥
जेणें नाहीं केलें आपुलें स्वहित । पुढिलांचा घात इच्छीतसे ॥१॥
संचितासी जाय मिळोनियां खोडी । पतनाचे ओढीवरी हांव ॥२॥
बांधलें गांठीं तें लागलें भोगावें । ऐसियासी देवें काय कीजे ॥३॥
तुका ह्मणे जया गांवां जाणे जया । पुसोनिया तया वाट चाले ॥४॥

॥४७८३॥
परमार्थी तो न ह्मणाया आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥१॥
थोडाचि स्फुलिंग बहुत दावाग्नि । वाढतां इंधनीं वाढविला ॥२॥
पितियानें तैसा वंदावा कुमर । जयाचें अंतर देवें वसे ॥३॥
तुका ह्मणे शिरीं वाहावें खापर । माजी असे सार नवनीत ॥४॥

॥४७८४॥
पोट लागलें पाठीशीं । हिंडवितें देशोदेशीं ॥१॥
पोटाभेणें जिकडे जावें । तिकडे पोट येतें सवें ॥२॥
जप तप अनुष्ठान । पोटासाठीं झाले दीन ॥३॥
पोटें सांडियेली चवी । नीचापुढें तें नाचवी ॥४॥
पोट काशियानें भरे । तुका ह्मणे झुरझुरुं मरे ॥५॥

॥४७८५॥
असत्य वचन होतां सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥१॥
जाईल पतना गासि संदेह नाहीं । साक्ष आहे कांहीं सांगतों ते ॥२॥
वदविलें मुखें नारायणें धर्मा । अंगुष्ट त्या कर्मासाटीं गेला ॥३॥
तुका म्हणे आतां सांभाळा रे पुढें । अंतरीचें कुडें देईल दु:ख ॥४॥

॥४७८६॥
आलें देवाजीच्या मना । तेथें कोणाचे चालेना ॥१॥
हरीश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबाघरीं पाणी ॥२॥
पांडवांचा साहाकारी । राज्यवरोनि केले दुरी ॥३॥
तुका म्हणे उगेचि राहा । होईल तें सहज पाहा ॥४॥

॥४७८७॥
सांगावें तें बरें असतें हें पोंटीं । दु:ख देते खोटी बुद्धि मग ॥१॥
आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥२॥
नाहीं मागें येत बोलिलें वचन । पावावा तो सीण बरा मग ॥३॥
तुका ह्मणे बहु भ्यालों खटपटे । आतां देवा खोटे शब्द पुरे ॥४॥

॥४७८८॥
पैल घरीं झाली चोरी । देहा करी बोंब ॥१॥
हाबा हाबा करिसी काये । फिराऊनि नेय्यां वायें ॥२॥
सांडुनियां शुद्धी । निरजलासी गेली बुद्धि ॥३॥
चोरीं तुझा काढिला वर । वेगळें भावा घातलें दूर ॥४॥
भलतियासी देसी वाव । लाहेसी तूं एवढा ठाव ॥५॥
तुका ह्मणे अझुनी तरी । उरलें तें जतन करी ॥६॥

॥४७८९॥
किती वेळा खादला दगा । अझून कां गा मागसी ना ॥१॥
लाज नाहीं हिंडतां गांवें । दु;ख नवें नित्य नित्य ॥२॥
सवें चोरा हातीं फांसे । देखतां कैसे न देखसीं ॥३॥
तुका ह्मणे सांडिती वाट । तळपट करावया ॥४॥

॥४७९०॥
मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥१॥
आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं तजिलें ॥२॥
एके सांते सरिखीं वित्तें । हानि हित वेगळालीं ॥३॥
तुका ह्मणे हित धरा । नव्हे पुरा गांवढाळ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP