बोधपर अभंग - ५३५१ ते ५३६०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५३५१॥
हरिदासां सोपें वर्म । सर्व वर्म पाउलें ॥१॥
देव कडिये घे खांदीं । क्रीडा मांडी वैष्णव ॥२॥
सर्वकाळ आटाआटी । नाहीं लोटी लाभाची ॥३॥
तुका म्हणे समाधान । दास मन आमुचें ॥४॥
॥५३५२॥
साधु सज्जनासी सदा भेटों जाय । शठ वंदी पाय नम्रपणें ॥१॥
ज्याचे गिवसुनी गुणदोष पाहे । दुर्विनीत राहे तये ठायीं ॥२॥
तुका ह्मणे जाण सर्व ज्याचे भाव । देवा आदि देव पांडुरंग ॥३॥
॥५३५३॥
शिजलियावरी जाळ । वायां जाय त्याचें मुळ ॥१॥
ऐसा वारावा तो श्रम । नाहीं अतिशय काम ॥२॥
सांभाळावें वर्म । काळें उचिताचा धर्म ॥३॥
तुका ह्मणे कळे । ऐसा कारणाचे वेळे ॥४॥
॥५३५४॥
ऐसें बरें आलें मना । नारायणा या काळें ॥१॥
देव आह्मा प्राणसखा । झालें दु:खा खंडण ॥२॥
जन्मांतरीं पुण्यराशी । फळ त्यासी होईल ॥३॥
तुका ह्मणे निज ठेवा । त्यांत हेवा लाधल्या ॥४॥
॥५३५५॥
बोलविशी माझ्या मुखें । परि या जनां वाटे दु:ख ॥१॥
जया जयाची आवडी । तें तें तया चरफडी ॥२॥
कठीण रे तो काढा । बळें रोगी मेळवी दाढा ॥३॥
खाऊं नये तेंतें मागें । निवारितां रडूं लागे ॥४॥
पथ्य औषधाकारणें । नेदी जेवायासी अन्न ॥५॥
वैद्या भीड काय । अतिताई जिवें जाय ॥६॥
तुका ह्मणे यांत । आवडे ते करी मात ॥७॥
॥५३५६॥
काय देतील देणार । ध्यावा एक रघुवीर ॥१॥
आज दिलें उद्यां नाहीं । ऐशापाशीं मागों कायी ॥२॥
ऐसें मागों विठ्ठल धुरे । देतें कल्पांतीं न सरे ॥३॥
तुका ह्मणे बा अनंता । तुजवरी माझी सत्ता ॥४॥
॥५३५७॥
विश्वातें पाळीतां नाहीं उबगला । आमुची तयाला चिंता काय ॥१॥
पाषाणाचे पोटीं वहाती दर्दुर । त्यासी तूं साचार पुरविसी ॥२॥
पक्षी अजगर करिती संचिता । त्यासी तूं अनंता पुरवीसी ॥३॥
तुका ह्मणे त्यावरी भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु मज ॥४॥
॥५३५८॥
हा तो नोहे कांहीं निराशेचा ठाव । भलें पोटीं वाव राखिलिया ॥१॥
विश्वंभरें विश्व समाविलें पोटीं । तेथेंचि शेवटीं आह्मी असों ॥२॥
नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरीं उमटेल ॥३॥
तुका ह्मणे माझा स्वामी अबोलणा । पुरवूं खुणे खूणा जाणतसे ॥४॥
॥५३५९॥
करी आतां जागें मज । ऐसें सांगतों मी तुज ॥१॥
दोघे साह्य एकमेकां । होय गाऊनी हरि सखा ॥२॥
नाम गोविंदाचें वाचे । घेतां मग दु:ख कैचें ॥३॥
तुका ह्मणे ऐसें जेवीं । प्राण आवडतो तेवि ॥४॥
॥५३६०॥
ज्याचें होतांची दर्शन । नुरे भान देहींचें ॥१॥
समपदीं पडे मिठी । होय तुटी संसारा ॥२॥
मान दंभ अहंकार । जाय दूर पळोनी ॥३॥
तुका ह्मणे शुद्ध मन । हे चरण देखतां ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2019
TOP