बोधपर अभंग - ५१५१ ते ५१६०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥५१५१॥
जन देव तरी पायांचि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥१॥
अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोन नेतां नये ॥२॥
तुका ह्मणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥३॥
॥५१५२॥
भूत भविष्य कळों यावें वर्तमान । हें तो भाग्यहीन त्यांची जोडी ॥१॥
आह्मी विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धें ॥२॥
जगरुढीसाठीं घातलें दुकान । जातो नारायण अंतरोनी ॥३॥
तुका ह्मणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रिद्धिसिद्धी ॥४॥
॥५१५३॥
लोहो परिसासीं रुसलें । सोनेंपणासी मुकलें ॥१॥
येथें कोणाचें काय गेलें । ज्याचें तेणें अनहित केलें ॥२॥
गंगा आली आळशावरी । आळसी देखोनि पळे दूरी ॥३॥
गांवा खालील ओहळ । रागें गंगेसी न मिळे ॥४॥
तुका केशवाचा दास । गुरुसी न भजे शिष्य ॥५॥
॥५१५४॥
तीर्थे केलीं व्रतें केलीं । चित्तीं वासना राहिली ॥१॥
पृथ्वींतले देव केले । चित्त स्थिर नाहीं झालें ॥२॥
नग्न मौनी जटाधारी । राख लाविली शरीरीं ॥३॥
करी पंचाग्नि साधन । ठेवी मस्तकीं तो प्राण ॥४॥
नर होऊनी पशू झाले । तुका ह्मणे वांयां गेले ॥५॥
॥५१५५॥
मुक्त तो आशंका नाहीं जया अंगीं । बद्ध मोहोसंगीं लज्जा चिंता ॥१॥
सुख पावे शांती धरुनि एकांत । दु:खी तो लोकांत दंभ करी ॥२॥
तुका ह्मणे लागे थोडाच विचार । परी हे प्रकार नागविती ॥३॥
॥५१५६॥
नरदेहा यावें देवदास व्हावें । तेणें चुकवावें जन्ममरण ॥१॥
नाहीं तरी वांया शिणविली माय । नरकासी जाय दीर्घकाळ ॥२॥
देवाचेंचि ध्यान देवाचें पूजन । ऐसें हें साधन साधकाचें ॥३॥
तुका ह्मणे मुखीं ह्मणा देवराय । तुक्या सुख होय नाहीं पार ॥४॥
॥५१५७॥
काय शूकरासी घालुनी मिष्टान्न । खरासी लेपन चंदनाचें ॥१॥
काय शेजे वाजे मर्कटा विलास । अलंकार नास करुनी टाकी ॥२॥
तुका ह्मणे काय पाजुनी नवनीत । सर्पा विष थित अमृतचि ॥३॥
॥५१५८॥
धणी करी शेत चारा चर पक्षी । टोला लागे वृक्षीं हकनाक ॥१॥
हात करी चोरी टोले पाठीवरी । दोष हा पदरीं संगतीचा ॥२॥
तुका ह्मणे ऐसे दुष्टाचे संगती । गेले अधोगती भले भले ॥३॥
॥५१५९॥
एक आठवचि पुरे । सुख अवघे मोहरे ॥१॥
कळों आलें माझ्या जिवें । मज माझियाचि भावें ॥२॥
एक भाव चित्तीं । तरी कांहीं न लगे युक्ती ॥३॥
तुका ह्मणे मन । पुजा इच्छी नारायण ॥४॥
॥५१६०॥
ढवळलें जगदार । तो अंधार हरपला ॥१॥
लपूं जातां थारा नाहीं । प्रगट पाही पसारा ॥२॥
तुका ह्मणे याजसाठीं । आतां तुटी जिवाची ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 03, 2019
TOP