अर्थालंकार - विरोधाभास
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
अनुष्टुप्-
विरोध भासतो जेव्हां विरोधाभास त्या ह्णणा ॥
हारावाचूंनि हे तीचे कुच हारी च वाटती ॥१॥
श्लोक-
प्रतीप-भूपाल भयें जयाचे । भेदक्रिया सोडून देति साचे ॥
अमित्रजिन्मित्रजिदेवतेजें । विचारदृक् चारदृगेव साजे ॥२॥
आर्या -
संतत मुसलालागुन घरचीं कामें करुन बहु नृपते ॥
द्विजपत्नी कर कठिणचि तूं असतां कमलमृदु जहाले ते ॥३॥
कृष्णार्जुनानुरक्ता दृष्टी कर्णावलंबिनी तरि हे ॥
विश्वासभूमि होइल कैशी ? हें मंजुभाषिणी पाहे ! ॥४॥
गद्य-
काव्यादर्शकारांच्या मतें, दोन विरुद्ध क्रियांचें एके ठिकाणीं वर्णन केलें असतांही हा अलंकार होतो:- जसें.
आर्या--
हो मद - मंजुल - कूजित जास्ती जास्तीच राजहंसाचें ॥
होतें शरदृतूंतहि कमती कमतीच रुत मयूराचें ॥४॥
गद्य-
यासच विरुद्ध गुनन्यास किंवा इंग्रजींत आंटिथिसिस ह्णणावें, तें मला वाटतें. कैलासवासी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनीं विरुद्ध
गुणन्यासाचें उदाहरण दिलें आहे तें येणेप्रमाणें:--
श्लोक -
ज्याचा शत्रुकुळीं अकुंठ परशू त्याचाहि जेता जरि ॥
पंडूच्या कुमरीं शरीं निजविला बाधा न झाली तरि ॥
प्रौढांनीं बहुतीं अशस्त्र समरीं जो श्रांतही जाहला ॥
एकाकी अभिमन्यु बाळ वधितां राजा सुखा पावला ॥६॥
हा अलंकार पृथक् न मानितां, विरोधाभास विशषोक्ति व विभावना यांचा संकर मानावा हें माझे मतें ठीक दिसतें. हा अलंकार सर्वच
ग्रंथकारांनीं घेतला नाहीं याबद्दल मला शास्त्रीबाबाप्रमाणें आश्चर्य वाटत नाहीं. कारण, सर्व इंग्रजी ग्रंथकारांनींही हा पृथक् घेतला आहे
असें नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP