अर्थालंकार - श्लेष
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
अनुष्टुप्-
नानार्थ निघती जेथें श्लेष त्या ह्णणती बुध ॥
निघे कीलाल बहु ज्या शोभला वाहिनीपती ॥१॥
गद्य-
याचे प्रकृतानेक - विषय, अप्रकृतानेक विषय, प्रकृता-प्रकृतानेक विषय, असे तीन भेद आहेत.
अनुष्टुप्-
शिलीमुखांनीं लुब्धांनीं आकुलीभाव प्राप्त जे ॥
तुझे नेत्र वनीं वृद्ध - कमला सारिखेच कीं ॥२॥
अहो आरुढ उदयीं कांतिमान रक्त मंडल ॥
हरितो हृदया राजा लोकांचे मृदुलीं करीं ॥३॥
श्लोक-सूर्यकांत धरि मंद अग्नितें । दावितें तमहि पुष्टतेस तें ॥
नेत्रही तिमिरदोष सेविती । औषधीश जरि हो न हे गती ॥४॥
आर्या-
हा अतिजरठ बहुत गुरु युक्तचि मोठे पयोधरांनी हो ॥
परिणत-दिक्करिकांही अगम्य रुपा तटी धरि पहा हो ॥५॥
श्लोक-
दयार्द्र चित्तें जरि शत्रुरुपी । काकोदरा रक्षियलें तथापी ॥
जो पूतनामारण शूरदेव । राखो मला ईश्वर तो सदैव ॥६॥
तूं मीलन कुटिल नीरस जडहि पुनर्भवपणोंहि कच साच ।
धरिला शिरींहि न स्वप्रकृतिगुण त्यजिसि नाम कच साच ॥७॥
आदिपर्व.
श्लोक-
होतलि नंदनविलास जयास तो हा ।
आहे धनंजयहि धर्महि जाणतो हा ॥
रत्नाकरीं तुजविराजविता विहारी ।
हा पाहिजे तरि वरी नळरुपधारीं ॥८॥
रघुनाथपंडित.
गद्य-
पहिले श्लोकांत " कीला," व "वाहिनीपती" हे दोन शब्द श्लिष्ट आहेत. "कीलाल," शब्दाचा अर्थ जल व रक्त; आणि "वाहिनीपती" शब्दाचा अर्थ समुद्र व सेनापती असे आहेत. दुसरे श्लोकांत " लुब्ध," "शिलीमुख," वनींवृद्ध," व "कमल" हे चार शब्द श्लिष्ट असून त्यांचा अर्थ कमलपर व हरिणपर आहे. तिसरे श्लोकांत " उदय," "रक्तमंडल, " " राजा," व " "कर" हे चार शब्द श्लिष्ट असून त्यांचा अर्थ नृपवर व चंद्रपर आहे. चवथे श्लोकांत चंद्र व वैद्य जवळ नसल्यामुळें ज्या ज्या गोष्टी घडतात त्यांचें वर्णन श्लिष्ट पदांनीं केले आहे.
पांचवा श्लोक माघांत रेवतकगिरि वर्णन करितांना घातला आहे. परंतु यांतील पदें श्लिष्ट असल्यामुळें या श्लोकापासून एक वृद्ध वेश्या
परहि अर्थ निघतो.
सहावा श्लोक रामपर व कृष्णपर आहे. यांत "काकोदर" व "पूतनामारणशूर" हीं पदें श्लिष्ट आहेत. यांत "काकोदर" याचा अर्थ रामपर करतांना (काक:अदर) अशीं पदें पाडावीं ह्णणजे "निर्भय कावळा" असा अर्थ होतो. या ऐंद्र काकविषयीं कथा रामायणांत दिली आहे. दुसरा काकोदर याचा अर्थ " कालियासर्प" असा आहे. दुसर्या श्लिष्ट शब्दाची (पूतनामा-रनशूर) अशी पदें पाडावी ह्णणजे अर्थ रामपर लावितां येतो. कृष्णपर अर्थ करावयाचा असतां (पूतना-मारण-शूर) असें समस्यंत पद घेऊन विग्रह करावा.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP