आरती श्रीकृष्णाची - ६१८ ते ६५०
संत बहेणाबाईचे अभंग
६१८.
जयदेव जयदेव जय राजिवनेत्रा । देवकीसुत नामोचित यादवकुळयात्रा ॥धृ०॥
लौकिक वचने वदती, “ श्रीपति हा योनी - । द्वारे जन्मत ” अच्युत देखियला नयनी । परि तो अयोनिसंभव अनुभवज्ञानी । जाणति सज्जन, विरहित - जन्मांतर - योनी ॥१॥
अंबऋषीच्या गर्भालागुनि अवतारी । बळिरामचि हा झाला राहिणिच्या उदरी । तू तव योनीसंभव न होसि निर्धारी । धन्य तव रूप - महिमा गोवर्धनधारी ॥२॥
अद्भुत बालक देवकी देखुनी ती । आनंदती पै दोघे नाचति निजनंदी । युग परिमित पै भुजा दिसती गोविंदी । दशअवतारातीत हरि ( हा ) देखियला बंदी ॥३॥
कर सर्वा वहिले हरि संकट जनसे ( अपूर्ण )
६२२.
जय जय कृष्ण कृपाळा मोहनमानस दीनदयाळा ॥धृ०॥
मंजुळ वेणू सुस्वर वाजत । मोहियल्या ब्रजबाला ॥१॥
यमुनाजळ अतिनिर्मळ वाहत । तन्मय गोधनमेळा ॥२॥
रविशशिमृग अहि जीवतरूतृण । भूली पडे सकळाला ॥३॥
नेणती देह, ध्वनी श्रवणी, नयनी । पहाती, हो हरिलीला ॥४॥
बहिणी म्हणे श्रुती नेणती हे याती । जातनती भेद लयाला ॥५॥
६२३.
जयजय परमानंदा । राजीवलोचना मुकुंदा ॥धृ०॥
रत्नखचित शिरी मुकुट विराजित । कंठी माला सुगंधा ॥१॥
पीतवसन पीतगंध - विलेपन । मानस भूलत धंदा ॥२॥
चंदनचर्चित अंगविलेपन । देखुनिया सुख नंदा ॥३॥
पाचही जाण आयुधे शोभती । गायन करी निज छंदा ॥४॥
बहिणी म्हणे मन तोषत देखुनि । ते रूप मस्तकी वंदा ॥५॥
आरती आत्मरामाची
६२४.
सर्वांठायी देव एकचि अनेक । विस्तारले नाना सुंदर कौतुक । सर्व क्षेत्रे तीर्थे अंती गतिदायक । भिन बघता पिंडी ब्रह्मांडी एक ॥१॥
जयदेव जयदेव जय चित्सुखधामा । जय आत्मारामा । आरती वोवाळिते निजहित विश्रामा ॥धृ०॥
हरिहर ब्रह्मादिक चिन्मात्रे तूचि । आगमानिगमा सीमा नकळे गणनेची । पूर्वापूर्व आत्माराम मूळरूप तू हेच । तुजविण बघता दुसरे अन्यहि नाहीच ॥२॥
तारक नाम तुझे ब्रह्म हे गाजे । अर्धचंद्र उदयो होऊनि विराजे । तेणे आत्मज्योती विश्व हे साजे । तो तू गुरू भवहारक वंदित बहिणी गर्जे ॥३॥
६२५.
या रे पंढरिसारिखे क्षितिवरी आणीक सांगा दुजे । मुक्तीमोक्ष मुमुक्षु तीर्थगण हे संसृत्य ज्याचेनि जे ॥ वाजे साट सदा कसा यम - शिरी आनंद वाटे जना । ऐसे क्षेत्र तपोबळी अकल हे ये ना कदा वर्णना ॥
६२६.
अशी चंद्रभागा अशी भीमगंगा । असा गरूड ऊभा पुढे पांडुरंगा ॥ विटी नीट ऐसा उभा देवराणा । दुजे क्षेत्र ऐसे जगी नान्य जाणा ॥
६२७.
असा पुंडलीक असे वाळवंट । असे पद्मतीर्थ महामुक्तिपंथ ॥ सदा गर्जना नाचती प्रेमछंदे । बहिणी वदे देव कोटी विनोदे ॥
६२८.
काळासी दपटी भवासि निवटी मृत्यूसि धाके पिटी । शत्रूच्या कपटी अघासि तगटी जन्मासि पाडी तुटी ॥ ठेला पैल तटी पहा कर कटी कांती दिसे गोमटी । बहिणीचा किरीटि स्मरा हृदघटी तारील तो संकटी ॥
६२९.
काली पापरूषी कळोनी हरीसी । म्हणोनी धरी वास या पंढरीसी ॥ अनाथे दिने पापभारे बुडाली । तयाकारणे मूर्ति निर्माण झाली ॥
६३०.
उभा नीट वीटी तटी चंद्रभागा । कटी हात ठेवूनिया दिव्य गाभा ॥ पहा पुंडलीकी कशी एक दृष्टी । असा देखता ही सुखी होय सृष्टी ॥
६३१.
गुणातीत हे रूप ज्याचे विराजे । असे पंढरी आणि ते रूप साजे ॥ विठो नाम हे धाम वैकुंठवासी । बहिणीसखा अंतरात्मानिवासी ॥
६३२.
कळेना कसा कोण हा वेषधारी । गमेना मना वर्णिता वेद चारी ॥ पहाता जया नेत्र ततस्थ होती । प्रभा दिव्य ऐसी असे कोण मूर्ती ॥
६३३.
न हाले न चाले न बोले न पाहे । न नेघे न नेदी उभा तिष्ठताहे ॥ दिसे योगमुद्रा महा दिव्यराशी । मना नेणवे भ्राति वाटे मनासी ॥
६३४.
लिलाविग्रही रूप हे जाणवेना । मना आणिका सर्वथा चोजवेना ॥ असे रूप हे वेगळे कोण आहे । सखे सांग गे कोण आता उपाये ॥
६३५.
रूपाची मना लागली खंति भारी । असा कोण आहे कुशंका निवारी ॥ करू काय आता जिवा राहवेना । पुसावे जना तत्त्व ते सांगवेना ॥
६३६.
उभा नीट वीटि कटि हात दोन्ही । हिरे साजती कुंडले दोहि कर्णी ॥ समे पाडिले दृष्टि पै नायिकाग्री । असा ना दिसे पाहता वेदशास्त्री ॥
६३७.
गुणातीत क्रीया विराजे शरीरी । करोनी अकर्तेपणाची उभारी ॥ दिसे ज्ञानवैराग्य भक्तीसमेत । मनी बैसला सांडिना त्यासि चित्त ॥
६३८.
सूर्याए निजतेज सार श्रुतिचे जे गूढ या सृष्टिचे । ज्ञानी पंडित मानभाव तपसी तत्त्वार्थ या जीविचे ॥ ब्रह्मा शंकर आदि ध्यान करिती सारैक या राशिचे । ती ही मूर्ति भिमातिरी प्रगटली जे बीज वेदांति ॥
६३९.
निरखित कशि बाला दृष्टि लावोनि भाला । उलटुनि नयनाते लक्षि त्वा विश्वपाला ॥ वदनि स्तवित वाचा मौन आले श्रुतीला । अनुपम बहिणीसी लाधला सौख्यगोळा ॥
६४०.
गुरूने मुझे ग्यानप्याला पिलाया । हुवा मस्त बंदा उन्याकू जलाया ॥ किया एकतारी दिनानाथ जीसू । रहे खेलता दील राजी उसीसू ॥
६४१.
ज्याचा कंठ निळा त्रिपुंड्र पिवळा रूंडादि माळा गळा । भस्माचा उधळा कडेसि अबला व्याघ्रांबरी उसीसू ॥
६४२.
त्रिशुळडमरूधारी भूतप्रेतासि वारी । अरिकुलदलमारी विश्वलोकांसि तारी ॥ भवतम परिहारी शंभु हा योगधारी । अभिनव निजज्ञाने बहिणिचाअंगिकारी ॥
६४३.
शिव शिव शिव काशी नाम हे पापनाशी । हृदयकमलकोशी साठवा रे प्रीतीसी ॥ अळस दुरि करा रे शीव ऐसे म्हणावे । अभिवन सुख घ्यावे शेष बहिणीस द्यावे ॥
६४४.
मुक्तीची नगरी नसेल दुसरी या ऐसि पृथ्वीवरी । सेवायासि बरी अपाय न करी काशीच पावे सरी । पापे सर्व हरी पतीत उतरी रक्षोनि नानापरी । अंती मुक्त करी म्हणोनि बहिणी सेवा म्हणे पंढरी ।
६४५.
सांगा का सोमयागादि मख करितसा व्यर्थ जाता प्रयागा ॥ उद्धारी तेचि गंगा अधिक कलियुगी आजि ही चंद्रभागा ॥ येथे येता न भागा त्वरितहर जगा तीर्थ आले उपेगा । वंदा या पांडुरंगा म्हणतहि बहिणी मुक्तिभोगार्थ मागा ॥
६४६.
परब्रह्म हे लक्षिता लक्षवेना । स्वसंवेद्य हे शास्त्र श्रुती साहवेना ॥ करू काय हो अर्थ कैसेनि साधे । बहिणी म्हणे भाव हा त्यासि बाधे ॥
६४७.
मौन्येचि जाण स्तविता तयासी । नसोनिया सन्निध सिद्ध पासी ॥ दावील नेत्रेच न रूप डोळा । बहिणी म्हणे येथिला हाचि भोळा ॥
६४८.
निराकार हे रूप साकारलेसे । पहा कोंडणी रत्न जैसे प्रकाशे ॥ काशी दिव्य शोभा रवीकोटि भासे । दिशा व्यापुनी अंबरी कोंदलासे ॥
६४९.
पहा किरीट झकमके जसि विद्युल्लता गगनी चमके । दिसतसे चिमणी रमणी कसि चालत हंसगती उभी ठाके ॥ मोडित नेत्र हे हास्य वक्त्र विचित्र चरित्र अगम्य जियेचे । विठ्ठली लाघव लावुनिया प्रीति बोलत बहिणी सुख मनिचे ॥
६५०.
ऊठ सत्वर विठ्ठला । भेट देई रे आम्हाला । वाट पाहाती सकळा । सखिया तटस्थ नयनी ॥१॥
वाटसी नयनी पाहावा । जन्मोजन्मी विठ्ठल व्हावा । म्हणोनि वाट पाहाती भावा । भेटी दे रे विठ्ठला ॥२॥
नयना आस थोर आहे । कै भेटेल विठ्ठल माये । काया बहु इच्छित पाहे । क्षेम दे रे झडकरी ॥३॥
हात ठेवोनिया कटी । कै हा देखेन विठ्ठल दिठी । डोळेभरी जगजेठी । हृदय - पेटी सांठवीन ॥४॥
विठ्ठल जपता मानसी । ( अपूर्ण )
N/A
References : N/A
Last Updated : March 06, 2017
TOP