ज्ञानपर अभंग - १९६ ते २००
संत बहेणाबाईचे अभंग
१९६.
सांसारिके ज्ञाने तरसी संसार । हा तुझ निर्धार जाय वाया ॥१॥
यालागी तू मूळ आत्मज्ञान साधी । तोडोनी उपाधी अंतरीची ॥२॥
स्वर्गाशी जाशील ते जरी साधिले । व्यर्थ तेणे गेले पूर्व तुझे ॥३॥
ब्रह्मांडी चढविला प्राणवायु जरी । व्यर्थ ते अवधारी जाईल रया ॥४॥
मंत्र उपासने साधिली दैवते । श्रम तोचि तेथे फळा आला ॥५॥
बहेणि म्हणे शोध करी आत्मत्वाचा । मग तुज कैचा जन्ममृत्यु ॥६॥
१९७.
नाही आत्मज्ञान हाटामाजी उभे । घेशील तें लोभें करूनिया ॥१॥
पाविजे विवेके सद्गुरूच्या संगे । कृपे पांडुरंगे पंढरीच्या ॥२॥
आत्मज्ञान शेती पेरोनीं ( न ) पाविजे । हिंडता ( न ) लाहिजे दाही दिशा ॥३॥
आत्मज्ञान तपी तीर्थी नव्हे प्राप्त । त्यजिसी जरी आप्त संसारीचे ॥४॥
आत्मज्ञान नव्हे पंचाग्नि साधिता । धुम्रपाने वृथा क्लेश होती ॥५॥
बहेणि म्हणे साधे सद्गुरूचे कृपे । रिघसी अनुतापे शरण जरी ॥६॥
१९८.
आत्मज्ञान डोळा दिसे ऐसे नाही । लक्षी जैसे पाही मने काही ॥१॥
बुद्धीचा उपरम होईल सर्वही । आत्मज्ञान ठाई पडे तेव्हा ॥२॥
आत्मज्ञान नव्हे सुवर्णाचा गोळा । चंद्र - सूर्य येळा सापडेल ॥३॥
बहेणि म्हणे ज्ञान साधेल संगती । संतांचे निश्चिती बुद्धि - योगे ॥४॥
१९९.
अग्नीविण काष्ठ जेवी नाही जाण । तैसे स्थूळ विणवस्तु नाही ॥१॥
परी ज्ञानेविण नव्हे आत्मबोध । केलिया संवाद न सापडे ॥२॥
कोणता पदार्थ अएस वस्तूविण । वायूचे स्पर्शन नसे कोठे ॥३॥
बहेणि म्हणे आत्मा सर्वांतरव्यापी । परी तो संकल्पी अंतरला ॥४॥
२००.
पिंड ब्रह्मांडाचा अक्रूनि उअगवू । मग तो अनुभवू होय तुज ॥१॥
विश्वी विश्वंभर विस्तारला जाण । पाहे याची खूण वेदशास्त्री ॥२॥
दुधामाजी तूप आहे निश्चयेसी । युक्ती काढायसी पाहिजे ते ॥३॥
बहेणि म्हणे देही आमत्व विचारी । ब्रह्म तुज उरी उरली नाही ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 21, 2017
TOP