मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
२११ ते २२०

ज्ञानपर अभंग - २११ ते २२०

संत बहेणाबाईचे अभंग

२११.
संत तेची देव संत तेची देव । संत तेचि राव साधनांचे ॥१॥
ऐसा हा निर्धार जयाचे मानसी । फळेल तो त्यासी भव नेणे ॥२॥
संत तेचि तप संत तेचि जप । संत ते स्वरूप ईश्वराचे ॥३॥
बहेणि म्हणे संत कृपेचे सागर । तीर्थाचे माहेर तीर्थरूप ॥४॥

२१२.
संतांचे सेवनी होय आत्मज्ञान । शांतिक्षमा पूर्ण वोळंगती ॥१॥
म्हणोनि सेवेसी असावे तत्पर । बुद्धि निर्विकार होईल ते ॥२॥
संतचि संगती होय चित्तशुद्धि । अष्टमहासिद्धि द्वारपाळ ॥३॥
बहेणि म्हणे संत कृपाळ जै होती । तैच ब्रह्म - स्थिती प्रगट होय ॥४॥

२१३.
संतांचे सन्निध पालटे संचित । नवी सृश्टी होत क्षणे एके ॥१॥
ऐसे जाण संत अगाध गुणांचे । कायामनेवाचे शरण होय ॥२॥
संतांचे वचनी भनुतेजवृष्टी । दर्भा - अग्री सृष्टी ठेवियेली ॥३॥
बहेणि म्हणे संत जै होती कृपाळ । तैच पर्वकाळ येती घरा ॥४॥

२१४.
शिष्य नव्हे तोचि जाणावा निश्चये । सद्गुरूसी जो पाहे फार बोले ॥१॥
शिष्य नव्हे जाण करी तोंडपिटी । अखंड चावटि ज्ञानगर्वे ॥२॥
साधु नव्हे तो हा गुरूसी विन्मुख । नाही ज्या विवेक साधु नव्हे ॥३॥
बहेणि म्हणे साधु नव्हे तो सहसा । जयाच्या मानसा सुख नाही ॥४॥

२१५.
निवृत्तीसी नाही प्राक्तनाच बळ । अनुभवी केवळ जाणती ते ॥१॥
निर्धारिती आपुले असत्य शरीर । मानुनी विचार सार घेती ॥२॥
नाही दंड जैसा निःस्पृही रायाचा । तैसा प्राक्तनाचा निवृत्तीसी ॥३॥
बहेणि म्हणे पाहे प्राक्तन वरिष्ठ । प्रवृत्ति हे श्रेष्ठ मानी तया ॥४॥

२१६.
शरीराचे माथा वर्तते प्राक्तन । शरीर ते जाण प्रकृतीचे ॥१॥
ज्ञानियांचे मत देहचि हा मिथ्या । प्राक्तनाची कथा तेथे कोण ॥२॥
प्राक्तन भोगवी भोग तो शरीरी । ज्ञानिया अंतरी सुखरूप ॥३॥
बहेणि म्हणे देह - प्राक्तन तोवरी । विचार अंतरी निश्चयाचा ॥४॥

२१७.
जळाले ते वस्त्र कैसे पांघरेल । देठी का जडेल पक्कपत्र ॥१॥
तैसे ज्ञानियाचे भासते शरीर । बाधील संसार केवी तया ॥२॥
जळातील सूर्य प्रकाशेल काई । चित्रीचा तो पाही अग्नि जाळी ॥३॥
बहेणि म्हणे देह - प्राक्तन तोवरी । विचार अंतरी निश्चयाचा ॥४॥

२१८.
भाजले ते बीज अंकुरेना कदा । न मिळेचि दुधामाजी लोणी ॥१॥
पैसा तो ज्ञानिया जन्म न घे जाण । वासना भाजून वर्ततसे ॥२॥
परिसासी लागता लोह पालटले । काळिमा हे भेटे पुन्हा कैसी ॥३॥
बहेणि म्हणे गोदा मिळाली सागरी । न येची माघारी त्र्यंबकाते ॥४॥

२१९.
माझिया हो मने घेतला उच्चाट । पाहावे वैकुंठ पंढरी हे ॥१॥
सांडोनिया सर्व काम धाम धंदा । वेधले गोविंदा गोपीराजा ॥२॥
आधारापासोनी भेदियेली चक्रे । इंद्रिये ही एकत्रे करोनिया ॥३॥
प्राणांचा निरोध करोनी पाहिले । निश्चये गाइले नाम तुझे ॥४॥
तव पुढे नाद गर्जताती नाना । तेथील धारणा ठाकियेली ॥५॥
सोऽहं शब्द तोही आरूताचि पाहे । लक्ष्यी लक्ष जाय मिळोनिया ॥६॥
सद्गदित कंठ दाटताचि मन । करोनिया स्नान चंद्रभागा ॥७॥
बहेणि म्हणे देव विठ्ठल पाहिला । द्वैतभाव गेला हारपोनी ॥८॥

२२०.
विश्वचि विठ्ठल विस्तारला सर्व । विकारेचि देव अंतरला ॥१॥
ठकुनिया बुद्धि ठसावली माया । ठमकत गेलीया श्रुति मागे ॥२॥
लंघिली साधने लक्ष हरपले । लघुत्व घेतले साधनांनी ॥३॥
बहेणि म्हने तो हा विठ्ठल पाहता । आली अद्वयता सहज मना ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP