मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
४५६ ते ४६९

ज्ञानपर अभंग - ४५६ ते ४६९

संत बहेणाबाईचे अभंग

४५६.
आत्म्यावरी जग विस्तारले सर्व । विश्वामाजी ठाव असे तया ॥१॥
पहा अनुभवे आपुलिया मनी । ब्रह्मी ब्रह्मापणी ब्रह्मानंदे ॥२॥
उदकी तरंग उठावले परी । तृषा ते न करी हरण की ॥३॥
बहेणि म्हणे बीजी वृक्ष आहे खरा । विवेके चतुरा पाहे बापा ॥४॥

४५७.
काष्ठामाजी अग्न जैसा असे गुप्त । आत्मा सर्वगत तैसा असे ॥१॥
विवेके करूनी पडिजेल ठायी । महावाक्य पाही शोध लागे ॥२॥
जळीं सूर्यबिंब दिसतसे जैसे । आत्मत्व हे तैसे वोळखावे ॥३॥
बहेणि म्हणे आत्मा सर्वही व्यापक । परी तो निष्ठंक वेगळाची ॥४॥

४५८.
रविसि उदय होता वर्तती लोक कर्मे । करि सकळ जनांची पुण्यपापे कुकर्मे ॥ न लगती परि सूर्या जाण कर्मे तयांची म्हणत बहेणि तैसी या स्थिती आत्मयाची ॥१॥

४५९.
चुंबक चालवी लोखंडा प्रत्यक्ष । क्लेश हे तयास जेवी नाही ॥१॥
तेवी आत्मा सर्व करोनि अकर्ता । पाहे तू स्वचित्ता वोळखोनि ॥२॥
सूर्याचेनि जेवि भासे मृगजळ । जनक्रिया सकळ सूर्ययोगे ॥३॥
बहेणि म्हणे आत्मा ऐसा जया कळे । तयाचा मावळे जन्ममृत्यु ॥४॥

४६०.
पद्मपत्र जैसे उदकात असोन । लिप्त नव्हे जाण जेणेपरी ॥१॥
तैसाची तो आत्मा विश्वाकार भासे । ज्ञानियासी दिसे वेगळाची ॥२॥
दुधामाजी लोणी असोनी अलिप्त । नभ अखंडित घटी भासे ॥३॥
बहेणि म्हणे आत्मा वोळखिजे ऐसा । सद्गुरू - परेशा वोळंगूनी ॥४॥

४६१.
माया कोठूनिया जालीसे निर्माण । इचे अधिष्ठान वोळखावे ॥१॥
सात्त्विक बुद्धीने सद्गुरूची कृपा । वेदार्थ घेई पा विवेकसी ॥२॥
कोठेनिया जाली कैसी विस्तारली । माया विवंचिली पाहिजे ते ॥३॥
बहेणि म्हणे माया सत्य की असत्य । विचारूनि तथ्य स्वीकारिजे ॥४॥

४६२.
स्फूर्तिरूप तेथे मायेचा उद्भव । प्रपंचासी ठाव मूळ तेथे ॥१॥
ब्रह्म एकले ते गमेना म्हणोनि । स्फूर्ती हे चिंतनी स्वसंवेद्य ॥२॥
उदकी बाबुळ होऊनि निर्माण । तेणेचि ते जाण आच्छादिले ॥३॥
तैसे जाले जाण, ब्रह्मीचीच माया । लपोनिया तया प्रगटली ॥४॥
अग्नीचे पासाव धूम्राची उत्पत्ति । तयाची प्रदीप्ती लोप करी ॥५॥
डोळ्यांचे पडळ डोळियासी रोधी । काजळी ते बाधी दीपकासी ॥६॥
आम्रवृक्षी होय कावरे निर्माण । तयासीच जाण आच्छादले ॥७॥
बहेणि म्हणे तैसी माया आच्छादित । सद्गुरूचा हस्त नाही तरी ॥८॥

४६३.
सत्य म्हणो जरी मायेसी तत्त्वता । तरीं निश्चितार्था असत्यची ॥१॥
न कळेचि पार इचा विधितिया । वेदान्ताही ठाया नये खरी ॥२॥
असत्य म्हणता प्रत्यक्ष दिसत । कोण इचा अंत घेऊ शके ॥३॥
बहेणि म्हणे वाचा खुंटली वर्णिता । कोण ता तत्त्वाचा शोध करी ॥४॥

४६४.
सत्यासत्यातीत मायेसी म्हणता । आलीसे तत्वता नागवण ॥१॥
बीजेविण वृक्ष की द्विजेविण पक्ष । वळेविण दक्ष केवी घडे ॥२॥
सूर्याविण रश्मी जळेविण तरंग । पुष्पेविण भृंग केवी पाहे ॥३॥
बहेणि म्हणे माया सत्य ना असत्य । दोहीसी अतीत केवी घडे ॥४॥

४६५.
वांझेच्या पुत्रासी नपुंसककन्या । दिधली त्यांच्या लग्ना चला जाऊ ॥१॥
तैसी जाण माया सत्य ना असत्य । तिचे ते शाश्वत केवी बापा ॥२॥
मृगजळे जेवी तृषा बोळविली । जीवे मेल्या भरली तरळ तैसी ॥३॥
बहेणि म्हणे मिथ्या म्हणो नेदी कदा । सत्य याचि शब्दा स्तब्ध ठेले ॥४॥

४६६.
ऐसा होय व्यवहार । जेणे राहे मन स्थिर ॥१॥
हेचि मायेचे निरसन । जाणे गुरूगम्य खूण ॥२॥
राहिलिया तळमळ । तोचि उपदेश सबळ ॥३॥
शब्दज्ञाने करिसी सोस । तेथे कैचा माये - नाश ॥४॥
बहेणि म्हणे राहे मौन । हेचि स्थिरप्रज्ञखूण ॥५॥

४६७.
तळमळ निराकारी । जाली माया तेचि खरी ॥१॥
हा तो अनुभव संतांचा । पाहे ग्रंथी आहे साचा ॥२॥
रूपी वेद जाला मुका । इतरांचा कोण लेखा ॥३॥
नाही शब्दाचे ते काम । पाहा शेषे केला श्रम ॥४॥
बहेणि म्हणे शय्या जाला । तेव्हा अंगीकार केला ॥५॥

४६८.
हाचि पुराणी विचार । केला बुद्धी करी स्थिर ॥१॥
करी गुरू उपदेश । तेथे मौन्येची प्रवेश ॥२॥
शब्दमाया नाही भिन्न । श्रुती सांगितली खूण ॥३॥
शब्द नव्हे रामराम । पार्वतीला सांगे शिव ॥४॥
बहेणि म्हणे ब्रह्मरस । सेवी का रे सावकाश ॥५॥

४६९.
म्हणे राम ब्रह्मरूप नाही । तोचि खळवादी पाही ॥१॥
नामरूप दोन्ही एक । हाचि वेदींचा विवेक ॥२॥
उपनिषदांचे सार । रामरूप निर्विकार ॥३॥
नाना इतिहास वार्ता । नामरूपचि तत्त्वता ॥४॥
बहेणि म्हणे नाम सार । हेचि उन्मनी निर्धार ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP