मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
६१ ते ७०

भक्तिपर अभंग - ६१ ते ७०

संत बहेणाबाईचे अभंग

६१.
विषयाचा संग नावडे जयासी । वैराग्य मानसी संचरल्या ॥१॥
मग काय उणे सुखालागी तया । सर्वदा सुखिचा तोचि एक ॥२॥
नावडे ज्या संग स्त्रियापुत्रधन । इंद्रियाचरण नावडेची ॥३॥
नावडे पाहाणे बोलणे ऐकणे । नावडे मिष्टान्ने भोग भोगू ॥४॥
नावडे संपत्ति गणगोत काही । नावडेचि देही अहंपण ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे होईल मानस । प्रपंचाची आस तैं तुटे ॥६॥

६२.
भ्रतारेही गावा गेलियाने सती । भोग ते लागती विषाऐसे ॥१॥
अनुताप तैसा संचरे शरीरी । आत्मा हा अंतरी वोळखता ॥२॥
अपूर्ण हा काम जालिया कामुका । भोग सर्व विखापरी होती ॥३॥
धनलोभियाचे धन नेता चोरी । क्षणही अंतरी सुख नाही ॥४॥
मीन उदकातुनी काढिलियावरी । विष सर्वपरी होत तया ॥५॥
बहेणि म्हणे तैसे ब्रह्मप्राप्तीविण । जाय एक क्षण युगाऐसा ॥६॥

६३.
परलोक नावडे इंद्राची संपत्ती । इहलोक वाटे विष जैसे ॥१॥
तो एक विरक्त ज्ञानासी अधिकारी । ब्रह्मप्राप्ति खरी होय तया ॥२॥
सर्व सिद्धि येता घरासी सर्वथा । नावडती चित्ता विरक्तीने ॥३॥
रंभा तिलात्तमा उर्वशी मेनिका । नावडती एका हरीविण ॥४॥
चंदन आगरु नाना उपचार । गमती बिखार हरीविण ॥५॥
बहेणि म्हण पूर्ण विरक्त मानसी । ज्ञान हे तयासी वोळंगण ॥६॥

६४.
प्रपंच असत्य कळो आला जया । विषय हे तया नावडती ॥१॥
उदासीनापरी वर्ततो प्रपंची । आशा हे मनांची सांडोनिया ॥२॥
मनाचा स्वभाव संकल्प विकल्प । होय साक्षिरूप तयांचा ही ॥३॥
बुद्धीचा निश्चय अनुसंधानी चित्त । अहंकारी हेत अहंतेचा ॥४॥
सर्वही माईक व्यवहार जाणती । निश्चय अद्वैती ठेवोनिया ॥५॥
बहेणि म्हणे माया सत्य ना असत्य । श्रीगुरूने तत्थ्य सांगितले ॥६॥

६५.
असत्य हे माया म्हणो जाता दिसे । सत्य म्हणता नसे ज्ञानदृष्टी ॥१॥
ऐसा हा संदेह निवारी सद्गुरू । विवेक निर्धारु करूनिया ॥२॥
ब्रह्माहरिहर मायेचेचि गुण । माया ब्रह्मी जाण बोलो नये ॥३॥
माया काल्पनिक अकल्पित ब्रह्म । नकळे याचे वर्म कोणेपरी ॥४॥
माया हे सावेव किंवा निरावेव । न कळे याचे ठाव कोणेपरी ॥५॥
बहेणि म्हणे याचे कर्म कळावया । वोळंगावे पाया सद्गुरूच्या ॥६॥

६६.
ब्रह्मापासुनिया जाली म्हणो माया । उपाधी हे तया केवी घडे ॥१॥
करावा निवाडा सद्गुरुवाचन । भेद निरसून विकल्पाचा ॥२॥
माया ब्रह्मी नाही ऐसे म्हणो जरी । स्वतंत्रता तरी म्हणो नये ॥३॥
बहेणि म्हणे ऐसा संदेह मायेचा । निरसी जो साचा तोचि गुरु ॥४॥

६७.
ब्रह्म तो अद्वय श्रुतीचे संमते । वेगळी माया ते म्हणो कैसी ॥१॥
कोणासी पुसावे मायेचे ठिकाण । सद्गुरुवाचून सत्य जाणा ॥२॥
सुवर्णा कांकण नाममात्र भिन्न । ज्ञानदृष्टी जाण वोळखावे ॥३॥
तोय तरंग भेद नाममात्र । ऐक्य हे सर्वत्र ज्ञानदृष्टी ॥४॥
सूत वस्त्र दोन्ही ऐक्यता सहजे । ज्ञानदृष्टी वोजे पाहिलिया ॥५॥
बहेणि म्हणे ऐसा पाहाता विवेक । सहजची ऐक्य मायब्रह्म ॥६॥

६८.
असत्य हे माया म्हणता प्रत्यक्ष । मायेचा हा पक्ष दृश्य आवघे ॥१॥
काय ते धरावे काय ते सोडावे । राहावे अनुभवे कोण्यापरी ॥२॥
ब्रह्माहरिहर नाम अवतार । मायेचा बडिवार दिसतसे ॥३॥
बहेणि म्हणे माया असत्य म्हणता । गुणांच्या अवस्था दिसताती ॥४॥

६९.
सत्य म्हणो माया ज्ञाने निरसत । अनुभवे अद्वैत होउनी ठेले ॥१॥
सत्य म्हणो जाता नसे हे सर्वथा । आता काय चित्ता बोध करू ॥२॥
सूर्यापूढे काय अंधकार राहे । विवेक हा ठाये न दिसे इच्या ॥३॥
बहेणि म्हणे सत्य म्हणो नये कदा । संत आत्मबोधा पावलिया ॥४॥

७०.
गुरुकृपा पूर्ण जयासी लाधली । माया ही निरसली तया मनी ॥१॥
येर ते अज्ञान पडिले भ्रमणी । संसार - जाचणी अनिवार ॥२॥
जयांचा विकल्प निरसला निश्चित । तोच ब्रह्मभूत होउनी ठेले ॥३॥
जयांची वासना निमाली अंतरी । तेचि निर्विकारी सहज जाले ॥४॥
जयांचा हा हेत निरसला देहीचा । रावो ब्रह्मांडीचा तोचि एक ॥५॥
बहेणि म्हणे काय सांगावे कवणा । मायेचा देखणा विरुळा असे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP