टोणप्याचे अभंग - ३०२ रे ३१०
संत बहेणाबाईचे अभंग
३०२.
मूर्खासी बोलता कोण सुख चित्ता । म्हणऊनी वार्ता सांडावी ते ॥१॥
असावे आपुल्या आनंदी सर्वदा । करावी गोविंदासवे मात ॥२॥
उचलोनी दगड पाडावा चरणी । तैसी मात जनी घडो नये ॥३॥
बहेणि म्हणे सदा दावा या दोघांसी । आहे परमार्थासी प्रपंच्याचा ॥४॥
३०३.
जयासी स्वहित करणे असे मनी । तेणे द्यावी जनी पाठी जगा ॥१॥
म्हणो का मग जग वेडे अथवा मूर्ख । आपुले ते सुख सांडो नये ॥२॥
सांडावी ते लाज जन - लोकाचारी । जयासी श्रीहरि पाहिजेल ॥३॥
म्हणवावे जनी प्रपंची भ्रष्टला । परी त्या स्वहिताला सांडू नये ॥४॥
बहेणि म्हणे जन त्रिविध प्रकार । आपुले साचार सांडू नये ॥५॥
३०४.
आकाश कडकडी मेरू हा लडबडी । परी ते सुख - गोडी सांडू नये ॥१॥
ऐसीया निर्धाराजवळी आहे देव । न धरावा संदेह अरे मना ॥२॥
पृथ्वी जरी बुडे डगमगती दिशा । तरी या जगदीशा सोडू नये ॥३॥
शीत उष्ण जरी वरूषे हा पाऊस । तरी कासावीस होऊ नये ॥४॥
वायु जरी सुटे ब्रह्मांडही हे आटे । तरी आत्मनिष्ठे भंगू नये ॥५॥
बहेणि म्हणे तेथे जीव तो कायसा । ऐसी पूर्ण दशा आचरावी ॥६॥
३०५.
भ्वावे जो शरीरा तो शरीर हे मिथ्या । तेथे आता चिंता कासयाची ॥१॥
विचारावे मना आपुल्या आपण । धरावे निर्वाण निजरूपी ॥२॥
जिवासी ते भ्यावे अविनाश दिसे । जन्ममरण फासे कोण भोगी ॥३॥
बहेणि म्हणे येथे लटिके मीपण । करी जन्ममरण वेरझारा ॥४॥
३०६.
जिवाचा उदार देहाचा जुंझार । तयासी संसार काय करी ॥१॥
परी निर्धार असावा कारन । मग तो नारायण जवळी भेटे ॥२॥
कायावाचामने दृढ जाला जीवे । तयासी आघवे हेचि नव्हते ॥३॥
बहेणि म्हणे सती उभी सिळेवरी । तियेसी माघारी काय खंती ॥४॥
३०७.
तोवरी ह्या गारा झगमगती सैरा । जवरी नाही हिरा दृष्टीपुढे ॥१॥
मग तो निवाडा आपोआप कळेल । जाळावे ते बोल वायावीण ॥२॥
तोवरी ह्या सिंपी दिसती सोज्वळ । जवरी न कळा मोतियांची ॥३॥
बहेणि म्हणे नाही फुकाचे बोलणे । करोनी दाविण क्रिया तैसी ॥४॥
३०८.
वरवरी सांग सांगाव्या त्या गोष्टी । जवरी नाही भेटी आत्मज्ञानी ॥१॥
कासयासी वेष धरी नाना सोंग । थोडी तैसी जगी श्वान खरे ॥२॥
काय सांगोनिया लांब लांब गोष्टी । जवरी नाही भेटी आत्मत्वाची ॥३॥
बहेणि म्हणे मज दिसती कथन्या । जवरी नाही मना अनुतप ॥४॥
३०९.
बोलवती बोल फुकाचे प्रबळ । परि ते प्रेम - बोल दुर्लभ हे ॥१॥
काय त्या सांगाव्या नुसत्या ज्ञानगोष्टी । जवरी नाही भेटी स्वानुभवी ॥२॥
ज्ञान सांगवेल ब्रह्म दाखवेल । स्वानुभव - बोल दुर्लभ ते ॥३॥
नाना जपतप करिती अनुष्ठान । परि ब्रह्मज्ञान न कळे कोणा ॥४॥
षड्दर्शनाची दाखविती सोंगे । वैराग्यही आंगे बोलवेल ॥५॥
बहेणि म्हणे कळा दावेल ज्ञानाने । परि ते प्रेम - खूण वेगळीच ॥६॥
३१०.
करवेल भगवे वागविती जटा । परी ते आत्मनिष्ठा वेगळीच ॥१॥
ते खूण जाणाया बहु पुण्य पाहिजे । मग वरी साजे बाह्यक्रिया ॥२॥
करवेल मुंडन विषय - भोग - त्याग । परि न कळे अंग अनुभवाचे ॥३॥
टाकवेल शिखासूत्र घरदार । परी अनुभव साचार अगम्य तो ॥४॥
लय लक्ष मुद्रा कळेल आसन । परि अनुभव जाण वेगळाची ॥५॥
बहेणि म्हणे येथे नलगे परिहार । नळे तो विचार बोलताची ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 22, 2017
TOP