मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
३८० ते ३९०

अभंग - ३८० ते ३९०

संत बहेणाबाईचे अभंग

३८०.
धन्य ते गोकुळ धन्य ते गोपाळ । धन्य लोकपाळ पुण्यशीळ ॥१॥
धन्य तोचि देश धन्य तोचि वंश । जेथ हृषीकेश अवतरले ॥२॥
धन्य तेचि माता धन्य तोचि पिता । जन्म कृष्णनाथा ज्याचे कुशी ॥३॥
धन्य त्या गोपिका कृष्णी तन्मयता । धन्य ते सरिता कृष्ण पोहे ॥४॥
धन्य वृंदावन धन्य गोवर्धन । चारी नारायण गायी सदा ॥५॥
धन्य तो दिवस धन्य तोचि मास । जन्मला अविनाश कृष्णसखा ॥६॥
बहिणी म्हणे धन्य नरनारी बाळके । घेती कृष्णसुख सर्वकाळ ॥७॥

३८१.
बाटविले तुवा अवघे गोकुळ । क्रिया हे आकळ तुझी देवा ॥१॥
ऐसा तू लाघवी क्रियानष्ट जाण । ब्रह्म तुज ऐसिया म्हनती जन ॥२॥
चोरटा खाणोरी देहाचा पाईक । शिंदळांचा नाईक क्रिया तुझी ॥३॥
निलाजिरे जिणे हेडसाविती नारी । न संडी हे खोडी तुझी देवा ॥४॥
संपादिसी मुखे झाकिसी अक्रिया । लटिके करिसी तया साक्षीभूत ॥५॥
बहेणि म्हणे हरि न कळे तुझी लीला । ऐसा तू गोपाळा अनाचरी ॥६॥

३८२.
आघवी कुळकोटी आहे मज ठावी । विश्वाचा गोसावी कोण शोभा ॥१॥
न बोलावे आता हे लाज आपणासी । अगा हृषीकेशी मायबापा ॥२॥
आघवी परंपरा जाणवली मज । वाया योगिराज म्हणवितोसी ॥३॥
मुळीचा गोवळ गोवळ्यांची क्रिया । भजे तुज ऐसिया कोण साजे ॥४॥
घुरटे घाणेरे वोंगळे गोवळी । खासी उष्टावळी मुखींची त्यांच्या ॥५॥
बहेणि म्हणे देवा न बोलावे वर्म । सांगता तुझे धर्म लाज वाटे ॥६॥

३८३.
आगम तो कैसा विचारूनि पाहे । सद्गुरूचे पाय धरोनिया ॥१॥
गुरूकृपेवीण साधिसी आगम । तरी तो दुर्गम होय तुज ॥२॥
सत्रावीचे जीवन तेचि प्रथम जाण । द्वितीयेची खूण इंद्रिय - शुद्धि ॥३॥
मःनशुद्धि तेची तृतीय पै जाण । सोहं मंत्रज्ञान चतुर्थ ते ॥४॥
पंचमी ते जाणा पंचम अवस्था । भोगुनी मोक्षपंथा जावे तुवा ॥५॥
सत्य सांगितला आगम तो हाची । चुकू नये येथींची वर्मखूण ॥६॥
रसनाविषयावरी ठेवुनिया चित्त । आमगी म्हणवीत जनामाजी ॥७॥
वर्म चुकोनिया आचारती आमग । जना म्हणती सुगम मार्ग हाचि ॥८॥
ते गुरू न म्हणावे सत्य वेद - वाणी । वेद - विरूद्ध करणी काय काज ॥९॥
आगमी तो जाणे आगमाची कळा । इतर ते गोंधळालागी करिती ॥१०॥
बहेणि म्हणे साधी गुरूवचने आगम । नाहीतरी श्रम पावसील ॥११॥

३८४.
कोणी एक म्हणती मायाचि प्रमाण । ऐसे हे वचन नाइकावे ॥१॥
होई सावधान पाहे निरखून । सांगता हे मन घाली बरे ॥२॥
समब्रह्म म्हणती करिती संकर । ऐसे ते पामर जाणा येथे ॥३॥
विषयसुखभक्ति मान ते मुक्ति । ऐसे जाणा चित्ती पापदेही ॥४॥
माता आणि भगिनी स्वपन्तीसमान । ऐसे एक ज्ञान पतनवासी ॥५॥
अवघे ब्रह्म जेथे कैसा धर्म तेथे । आचरती मते चांडाळाची ॥६॥
मद्यमांस एका पूजनी प्रधान । सत्कर्माची आण असे तया ॥७॥
अधर्म अकर्म अनाचार पाहे । हा जयासी आहे कुलधर्म ॥८॥
रजस्वला मांगी दैवत जयाचे । ऐसे ये कलीचे ज्ञान पाहे ॥९॥
सत्याचा कंटाळा हिंसेचा पसारा । कंटक तो खरा विष्णुदास ॥१०॥
वरिवरी टिळेमाळा राम उच्चारिती । लौकिक राखिती मैंद जैसे ॥११॥
बहेणि म्हणे ऐसे जाणावे ते लंड । न पहावे तोंड स्वप्नीं त्यांचे ॥१२॥

३८५.
प्रसंगासारिखे बोलवितो देव । देखोनिया भाव जना ऐसा ॥१॥
काय करू यासी दुर्बुद्धीचे कोडे । भोगणे हे पुढे आहे पाप ॥२॥
ब्राह्मण म्हणविती मद्यमांस घेतीखाती । मेसाई पूजिती वश्य - कर्मीं ॥३॥
जारण मारण स्तंभन मोहन । जीवहिंसा करणे विषयालागी ॥४॥
आपुला स्वधर्म सांडोनिया मागे । सेवेलागी - रागे अधर्माचे ॥५॥
संकर करिती गुरूकृपा म्हणती । पाप न मानती परद्वारी ॥६॥
ज्याचे खाती तया आंगोठा दाविती । शंका न धरिती स्वामियाची ॥७॥
बहेणि म्हणे ऐसे न पडावे दृष्टी । ज्याच्याने हे सृष्टी सर्व बुडे ॥८॥

३८६.
अवतारांच्या पंगती हे लीला कवणाची । जाणती हे चासी स्वानुभवी ॥१॥
आणिकांसी न कळे जाले थोर थोर । पाहिजे तो शूर ज्ञानवंत ॥२॥
सत्रावीस काय उन्मनी बोलती । प्रेम वाहे म्हणती कोणा सांगो ॥३॥
मूळमाया निवृत्ति गुणसाम्य प्रकृति । कोणासी म्हणती सांग कैसे ॥४॥
अद्वय जे होते द्वैतासी आणिले । हे कोणाचेनि आले जाणावया ॥५॥
एकी हा अनेक अनेकी हा एक । अन्वय व्यतिरेक कैसा सांग ॥६॥
बहेणि म्हणे याची केली ब्रह्मकळा । म्हणोनि अंबेला शरणांगत ॥७॥

३८७.
देहयंत्र वाहे हरी । निजतसे वाजवी कुसरी ॥१॥
वाचा - तारा लाविल्या हारी । येके स्वरे वाजवी चारी ॥२॥
इंद्रियरंध्रे केली प्रगट । मनसारी लाउनी नीट ॥३॥
ॐकारध्वनि सूक्ष्मनाद । मातृका पिळोनी शुद्ध ॥४॥
बहेणि म्हणे अनुभव घ्यावा । वाजवी कोण तो पहावा ॥५॥

३८८.
निंदक हरिभक्त हे माझे सांगाती । जीवाहुनी प्रीती भेटी होता ॥१॥
तयांचा संभ्रम होतसे मज घरी । वैकुंठ - पायरी वेंघावया ॥२॥
जैसेचि आतिथ्य हरिभक्ता करावे । तैसेचि स्वभावे निंदकासी ॥३॥
बहेणि म्हणे माझे दोघेही जिवलग । कर्मयोगे भोग वाटा आला ॥४॥

३८९.
हरिभक्त तेचि जाणावे पा तुम्ही । जे का भागवतधर्मी विधियुक्त ॥१॥
वेदविधिमार्गा नुल्लंघिती सर्वथा । अखंड हे आस्था भूतमात्री ॥२॥
कर्म वोसंतिती देहाचेनि छंदे । अखंड आनंदे क्रीडताती ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे जिवलग ते माझे । भेटता सहजे सुख होय ॥४॥

३९०.
निंदक भेतता दुणावे हारिख । भक्ताही विशेष सुख वाटे ॥१॥
निंदक सांगाती येणेपरी बापा । करिती निष्पापा गुरूभक्ता ॥२॥
सुवर्णाचा मळ काढिताचि पुटी । पडियेली तुटी हीणा जेवी ॥३॥
आरसा उजाळ करिताती देख । मळ तो निःशेष जाय जेवी ॥४॥
निंदके निंदिता कर्ताकर्म जळे । आम्हासि आकळे परब्रह्म ॥५॥
बहेणि म्हणे निंदक देखे जेव्हा डोळा । आनंद सोहळा करितसे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP