मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
२४१ ते २५०

ज्ञानपर अभंग - २४१ ते २५०

संत बहेणाबाईचे अभंग

२४१.
गुरूमंत्र देवऔषध भावार्थे । फळे, एक - चित्ते पाहे ऐसे ॥१॥
हेचि निर्धारूनी भावर्थेसी भज । हृदयीचे गुज सांगितले ॥२॥
पाषाणप्रतिमा भावार्थे भजलीया । इच्छितसे तया पावे फळ ॥३॥
बहेणि म्हणे ज्याचा भावार्थ चोखट । तयाची वैकुंठ रोकडेची ॥४॥

२४२.
भावार्थ वाल्मिका आला तो फळासी । जाले सत्य ऋषी भावर्थेची ॥१॥
यालागी भावार्थ असावा साधका । करितसे रंका राज्यनिधी ॥२॥
कौशिकासी भाव फळा आला सत्य । भावार्थ अगत्य पाहिजे तो ॥३॥
बहेणि म्हणे भाव इच्छेचा फळदानी । पाववी निर्वाणी मोक्षपदा ॥४॥

२४३.
भक्तिबळे इच्छा पुरवितो देव । आला अनुभव पुंडलीका ॥१॥
म्हणोनिया भक्ति असावे कारण । आहे नारायण भाव तेथे ॥२॥
पक्क तुळसीपत्रा - आत प्रवेशून । तुळेसी तो देव तुका न ये ? ॥३॥
द्रौपदीची वस्त्रे स्वये जाला देव । पोह्यांसाठी गाव सोनियाचा ॥४॥
भाजीचिया पाने तृप्त केले ऋषी । भावे गणिकेसी वैकुंठ ते ॥५॥
बहेणि म्हणे भाव तोचि आम्हा देव । नाही या संदेह अणुमात्र ॥६॥

२४४.
भावार्थाचे दावे देवाचिया गळा । तयासी मोकळा कोण करी ॥१॥
विचारिता जन्म सोसी गर्भवास । द्वारपाळ त्यास करी बळी ॥२॥
भावार्थाच्या खुंटी बांधिला हा देव । सोडी ऐसा राव कोण आहे ॥३॥
बहेणि म्हणे भावतंतु कोण सांडी । भावार्थ - परवडी देव जाणे ॥४॥

२४५.
पाचाही विषयांचा समूह एकत्र । होउनी परत्र अंतरले ॥१॥
यालागी संगती उपाय ते भले । आपणही केले तरावया ॥२॥
कुरंग तो जाण नादासी वेधला । प्राणासी मुकला क्षणामाजी ॥३॥
स्पर्श करोनिया सापडला हस्ती । मारिजे माहोती पहासी तू ॥४॥
पतंग रूपासी भुलोनी दीपकी । प्राणे गेला दुःखी होउनिया ॥५॥
रसनेचा लोभ धरोनिया मीन । न लागता क्षण जीवे गेला ॥६॥
भ्रमर गुंतला कमळामाजी गंधे । गेला प्राण वेधे तत्क्षणी ॥७॥
बहेणि म्हणे पाचा विषय पाचजण । वेचुनियाप्राण न सुटती ॥८॥

२४६.
तपाचे सामर्थ्य आहे बहु मोठे । पाहे तू वरिष्ठ मागील ते ॥१॥
विश्वामित्रे सृष्टी केलीसे दुसरी । जाण तपावरी गायत्रीच्या ॥२॥
वसिष्ठे धरित्री दर्भाचिये अग्नी । ठेविली सामुग्री तपाची हे ॥३॥
सूर्यतेज आले समक्ष साक्षीसी । तयाच्या तपासी कोण वर्णी ॥४॥
अगस्तीने केले आचमन सिंधूचे । तप हे तयाचे महा उग्र ॥५॥
बहेणि म्हणे तप जयापासी असे । तयासी सायास कासयाचे ॥६॥

२४७.
वर्णामाजी एक ब्राह्मण वरिष्ठ । ऐसे मागे श्रेष्ठ बोलियेले ॥१॥
म्हणोनि ब्राह्मण पूजावे आदरे । मोक्ष याचि द्वारे प्राणियासी ॥२॥
ब्राह्मणाचे मुखी सदा वसे वेद । जाणती ते भेद अर्थ त्याचा ॥३॥
बहेणि म्हणे देव वाहे ज्याची लाथ । हृदयी विख्यात असे ठावें ॥४॥

२४८.
ब्राह्मणाचे मुखे तृप्त होय देव । पहा अनुभव रोकडा हा ॥१॥
यालागी ब्राह्मण वंदावे मस्तकी । शास्त्रे समस्त की बोलताती ॥२॥
ब्राह्मणाचे मंत्रे पाषाणी प्रतिष्ठा । धरलिया निष्ठा प्रगटे देव ॥३॥
बहेणि म्हणे देव कलियुगी हेचि । ऐसी हे वेदांची असे साक्ष ॥४॥

२४९.
ब्राह्मणाचे तीर्थ प्राप्त होय जया । पृथ्वीचीही तया घडती तीर्थें ॥१॥
यालागी ब्राह्मण श्रेष्ठ सर्वांपरी । जयाचिये द्वारी सर्व सिद्धि ॥२॥
ब्राह्मणाची कृपा होय जयावरी । कल्याण तो वरी कल्पकोटि ॥३॥
बहेणि म्हणे ज्याचे दर्शनेचि पाप । जाये आपोआप जळोनिया ॥४॥

२५०.
ब्राह्मणाची सेवा घडे एक क्षण । इच्छा होय पूर्ण अंतरीची ॥१॥
म्हणोनी तयासी भजाने पूजावे । आदरे घालावे लोटांगण ॥२॥
ब्राह्मणाचे काजी वेचलिया प्राण । इंद्रपदी जाण वास तया ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे ब्राह्मण हे थोर । मोक्ष हा किंकर तयापासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP