मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
३११ रे ३१८

टोणप्याचे अभंग - ३११ रे ३१८

संत बहेणाबाईचे अभंग

३११.
संत म्हणविता लाज नाही चित्ता । जवरी आसक्ति विषयांची ॥१॥
गाढवाचे परी दिसे जिणे त्याचे । काय त्या सोंगाचे घेउनी फळ ॥२॥
संत म्हणविता घडते पातक । जवरी भोगी सुख विषयांचे ॥३॥
रागद्वेषनिंदा भूतांचा मत्सर । तेणे न करावा उच्चार संत ऐसा ॥४॥
लोभ दंभ मान विषयांचा आदर । तो संत साचार बोलू नये ॥५॥
बहेणि म्हणे वृत्ति नाही जो विराल्या । तो संत - सोहळा अधःपाता ॥६॥

३१२.
कीटक - भृंगी - न्याये लागे जे धारणा । तोचि एक जाण ब्रह्मनिष्ठ ॥१॥
एर्‍हवी ते बोल बोलावे फुकाचे । काय सांगीवेचे शब्दज्ञान ॥२॥
चकोर - चंद्र - न्याये जै होय हे मन । तरी संतपदज्ञान सत्य जाणा ॥३॥
बहेणि म्हणे सिंधुलवण - न्याय - भेटी । घडे तेव्हा गोष्टी ब्रह्मत्वाची ॥४॥

३१३.
शस्त्राचे पै घाय सोसवती सदा । परी हे जननिंदा सोसवेना ॥१॥
ऐसिया साधने रोकडेचि फळ । ब्रह्म हे केवळ प्राप्त होय ॥२॥
करवते दान तप व्रत स्नान । जननिंदा जाण सोसवेना ॥३॥
योग याग तीर्थ करवेल अनुष्ठान । जननिंदा जाण सोसवेना ॥४॥
बहेणि म्हणे जन निंदोत सकळ । आत्मत्वी निश्चळ ठेवी मन ॥५॥

३१४.
आमुचे मिळणी मिळू नका कोणी । विषय सांगतिनी बाईयानों ॥१॥
नव्हे तैसे बळ विवेक विचार । नका करू चार जनामाजी ॥२॥
जवरी आहे तुम्हा मागील बोभाट । तवरी काही नीट होऊ नका ॥३॥
जन - लाज शेष आहे जो मनास । तोवरी उदास होऊ नका ॥४॥
सासुर माहेर जोवरी आहे तुम्हा । कुंथूनिया प्रेमा आणू नका ॥५॥
बहेणि म्हणे नका फजिती फुकाची । करू या जीवाची वायावीण ॥६॥

३१५.
मूर्खांसवे गुज अधमासी उपकार । स्त्रियांसी विचार सांगो नये ॥१॥
वाळूचियेपरी ( न ) शिरे पाणी जैसे । दुर्जनासी तैसे उपदेश ॥२॥
तक्षकासी दूध स्त्रियांसंगे गूज । खडकावरी बीज पेरू नये ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे जाणावे चांडाळ । हित त्या केवळ काय कळे ॥४॥

३१६.
आणिका उपदेश सांगे बरव्या रीती । आपण तो चित्ती न धरी काही ॥१॥
ऐसे ते जाणावे मतिमंद हीन । तया ब्रह्मज्ञान काय करी ॥२॥
वरवर लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण तैसे जाण न धरी चित्ती ॥३॥
बहेणि म्हणे तया नाही आत्मशुद्धि । येरा सांगे बुद्धि मूर्खपणे ॥४॥

३१७.
आम्हा जितेचि मरणे । मेलेपण जीत जाणे ॥१॥
काय करू ऐसे जाले । तुकारामे मज केले ॥२॥
शब्द आमुचा खुंटला । निःशब्दाचा उदयो जाला ॥३॥
बहेणि म्हणे शक्ती नाही । शक्तीविण वर्तू देही ॥४॥

३१८.
नव्हे करणीची आहाच । जीवे पायी जडलो साच ॥१॥
आता टाकिले करावे । शरण केशवासी जावे ॥२॥
देउनी प्रपंचासी काटी । पाय तुझे धरिले कंठी ॥३॥
वैरी गांजिती छळिती । परी हे तुझे पाय चित्ती ॥४॥
नखी देती जरी सुया । तुज न सोडी देवराया ॥५॥
जरी केलासी साहाकारी । बहेणि म्हणे दया करी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP