मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
५२१ ते ५३०

करूणापर अभंग - ५२१ ते ५३०

संत बहेणाबाईचे अभंग

५२१.
अमृतासी कोण घालील भोजन । किंवा त्या गगना पांघरूण ॥१॥
ज्याचे तोचि जाणे आपुले महिमान । इतरांसी दूषण जाणावया ॥२॥
कुबेराचे कोण फेडील दरिद्र । किंवा तो समुद्र - तृषा हारी ॥३॥
बहेणि म्हणे सूर्य प्रकासील कोण । पृथ्वीसी तुळण केवी घडे ॥४॥

५२२.
एकपत्नीव्रत चालविले रामे । यथानुक्रमे ब्रह्मनिष्ठा ॥१॥
ज्याचे तया शोभे येरा ते अलभ्य । जाणती हा गर्भ आत्मवेत्ते ॥२॥
परद्वारी कृष्ण लीलावेषधारी । भोगुनिया नारी अभोक्ता तो ॥३॥
साठी खंड्या भक्षी दुर्वास ब्राह्मण । निराहारी पूर्ण ब्रह्मवेत्ता ॥४॥
क्रोधाचे माहेर देखा तो जमदग्नि । ब्रह्मनिष्ठ जनी त्यासी साजे ॥५॥
बहेणि म्हणे कळी लाविजे नारदे । ब्रह्मनिष्ठ बोधे निश्चयाचा ॥६॥

५२३.
त्रैलोक्य हिंडोनी भागली विरक्ति । फार तिची शक्ति हीन जाली ॥१॥
मग तिचा केला अंगिकार संती । तेणे त्या महती थोर आली ॥२॥
भक्तिही सीणली कोन्ही अंगिकारा । न करिती निर्धारा कळो आले ॥३॥
बहेणि म्हणे धृति नाही तिसी ठाव । सांडोनिया गर्व आली येथे ॥४॥

५२४.
जपी तपी वृत्ती मौन्य अनुष्ठानी । साधिली पंचाग्नि धूम्रपान ॥१॥
ऐसे नाना क्लेश पीडिती शरीर । परि निर्विकार चित्त नोव्हे ॥२॥
वायो साधुनिया निरोधिती प्राण । षड्चक्र भेदून आसनी ते ॥३॥
बहेणि म्हणे शुष्क शरीर करोनी । एक पर्णाशनी निराहारी ॥४॥

५२५.
निर्विकार नोव्हे चित्त देवतीर्थी । हिंडलेती क्षिती जरी नाना ॥१॥
संत - समागमे शुद्ध होय चित्त । वासना विरक्त क्षणे होये ॥२॥
निर्विकार नोव्हे चित्त कर्मामाजी । गायी गज वाजी दिधलिया ॥३॥
बहेणि म्हणे याचे वरं संतसंगे । कळतसे अंगे साधनेचे ॥४॥

५२६.
तीर्थे केलियाने स्नान देहमळ । नासती सकळ निश्चयेसी ॥१॥
परी मनोमळ नाश नव्हे जाण । श्रीगुरूवाचून सत्य सत्य ॥२॥
प्रतिमा पूजलिया देहदंड जाला । सार्थकाला आला देह त्याचा ॥३॥
बहेणि म्हणे शुद्ध निर्विकार । होईल निर्धार गुरूकृपे ॥४॥

५२७.
चित्तासी विवेक वैराग्य यावया । ज्ञान साधावया मूळ हेचि ॥१॥
सद्गुरूचा हस्त मस्तकी घेसील । तरी पावसील ब्रह्मपद ॥२॥
सर्वत्र समान ब्रह्म परिपूर्ण । व्यापक चैतन्य तैच होय ॥३॥
बहेणि म्हणे चित्त स्थिर तैच घडे । ब्रह्मत्व आतुडे रोकडेची ॥४॥

५२८.
सद्गुरूवचनाचे करी अमृतपान । जन्ममृत्यु जाण नासतील ॥१॥
होसी तू अमर स्वामी इंद्रियांचा । मने काया वाचा शरण जाई ॥२॥
सद्गुरूचे तीर्थ अमृताची वाटी । नित्य सेवी तुटी नको आणू ॥३॥
बहेणि म्हणे जीवी होसील संतुष्ट । सद्गुरूवरिष्ठ पूजिलिया ॥४॥

५२९.
काजळासारिखी कस्तुरीही काळी । गुणे ती वेगळी आपुलाल्या ॥१॥
जाणता तो जाणे दोहीचा पारखी । सगुण विवेकी ज्ञानवंत ॥२॥
तक्र आणि दूध वर्ण ते समान । परि वर्म भिन्न भिन्न त्यांचे ॥३॥
बहेणि म्हणे गारा परिसही शुभ्र । नीर आणि अभ्र समत्वची ॥४॥

५३०.
उदर भरावया केले असे ढोंग । घरोघरी बोंब उपदेशाची ॥१॥
आपणा कळेना लोका सांगे ज्ञान । धरोनिया ध्यान बक जैसा ॥२॥
आपण बुडती लोका बुडविती । हात धरूनी जाती यमलोका ॥३॥
विठा म्हणे काय करू त्यांच्या कपाळा । पापाचा कंटाळा न करिती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP