भक्तिपर अभंग - १०१ ते ११०
संत बहेणाबाईचे अभंग
१०१.
शब्दाचे बोलणे दृश्य हे तोवरी । अदृश्य हे जाण हरपले ॥१॥
तेथे हा श्रीगुरु बोधील समर्थ । दाखवोनी अर्थ श्रुति शास्त्रे ॥२॥
बुद्धीचे बोधक चित्ताचे चिंतन । अदृश्य हे जाण हरपले ॥३॥
इंद्रियांचे सर्व आकारी बोलणे । निराकारी जाण हरपले ॥४॥
बहेणि म्हणे जेथे अनिर्वाच्य बोली । सद्गुरू माऊली तोचि दावी ॥५॥
१०२.
पाचाचे उसने घेऊनी शरीर । आलासी ते सार ब्रह्म साधी ॥१॥
कासया काबाड वाहतोसी ओझे । लटिके ते तुझे नोव्हे रया ॥२॥
अस्थि मांस त्वचा नाडी आणि रोम । ज्याचे त्यासी वर्म समर्पावे ॥३॥
लाळ मुत्र स्वेद शुक्र हे शोणित । आपाचे हे सत्य गुण पाच ॥४॥
क्षुधा तृषा निद्रा आळस मैथुन । तेजाचे गुण जाण पाच ॥५॥
धवन वळण निरोध आकोचन । पाच गुण जाण वायूचे ॥६॥
राग द्वेष भय लज्जा आणि मोह । पाच गुण होय आकाशाचे ॥७॥
ऐसे हे पंचवीस पाचाचे जाणून । ब्रह्मप्राप्ति जाण साधी पा रे ॥८॥
ऐसे हे शरीर घेऊनी आलासी । साधी आत्मयासी येथे बापा ॥९॥
बहेणि म्हणे नको भुलो त्या अनित्या । वोळखोनी सत्या रापे पा रे ॥१०॥
१०३.
पिंड ब्रह्मांडासी करूनी ऐक्यता । होय या परता साक्षीरूप ॥१॥
सर्व तूचि होसी सर्वाही वेगळा । ऐसी साध कळा सद्गुरूमुखे ॥२॥
हिंग - हिरण्यासी ऐक्य करूनिया । जाय तू अद्वया ब्रह्मपदा ॥३॥
आशा तृष्णा माया एकरूप दोनी । करोनिया जनी वर्ते सुखे ॥४॥
सर्वही प्रपंच ऐकतेसी आणी । तूचि जनी वनी होउनी राहे ॥५॥
बहेणि म्हणे सर्व हारपली मुळी । ते रूप न्याहळी ज्ञानदृष्टी ॥६॥
१०४.
प्रारब्धाआधीन शरीर लागले । आत्मत्व निराळे वेगळेचि ॥१॥
सुखदुःख हे याचे नाणावे अंतरी । पूर्ण साक्षात्कारी स्थिर राहे ॥२॥
केले ते भोगील आपुले आपण । होय उदासीन सर्वभावे ॥३॥
बहेणि म्हणे त्याचे सांगेन विंदान । सद्गुरूचरण साधी पा रे ॥४॥
१०५.
शरीर असत्य पहाता विवेके । त्याची सुखदुःखे कोण मानी ॥१॥
सत्य हा न्रिधार ज्ञानियाचे मत । अकळ शाश्वत चित्त ज्याचे ॥२॥
प्रापंचिक सर्व असत्य वेव्हार । लाभालाभ फार कोण मानी ॥३॥
बहेणि म्हणे जेथे त्रिपुटीच नाही । प्रारब्ध ते काई तेथे सत्य ॥४॥
१०६.
आकार विकार निमाला विचार । एक निरंतर निर्विकल्प ॥१॥
त्वंपद तत्पद असि पदातीत । अनादि अनंत अरूप ते ॥२॥
ज्ञान ना अज्ञान अभाव ना भाव । आनंदासी ठाव मूळ नसे ॥३॥
बहेणि म्हणे जो हा इतुका तितुका । तूचि सर्व लोका अंतर्बाह्य ॥४॥
१०७.
काळे - गोरेपण धुतलिया जाये । दाहकपण काय अग्नि सांडी ॥१॥
तैसे ते प्राक्तन न सोडी सर्वथा । ज्ञानियाच्या माथा साट वाजे ॥२॥
शीतलता उदक काय सांडी गुण । चंचलत्व मन केवि सांडी ॥३॥
बहेणि म्हणे याचे सागेन विंदान । सद्गुरूचरण पाहलिया ॥४॥
१०८.
निरसिता निरसले अवचिता स्वरूप । तेचि भरले रूप नयनी माझ्या ॥१॥
झाडीता झाडेना काढिता काढेना । नेणो काय मना केले येणे ॥२॥
जे जे पडे दृष्टी ते ते पडे मिठी । नवल या गोठी कोण जाणे ॥३॥
बहेणि म्हणे माझे व्यापिले मानस । लावियेले पिसे काय सांगो ॥४॥
१०९.
निशीचिये भरी दिवस ना राती । प्रकाश ना ज्योती कैसी माये ॥१॥
हे सुख जाणते जाणती स्वभावे । पूर्ण कृपा देवे केली ज्यासी ॥२॥
बिंबी बिंब कैसे सामावोनी ठेले । स्वरूप कोंदले दशदिशा ॥३॥
बहेणि म्हणे तेथे बोलावे ते काये । मज माजी पाहे हारपले ॥४॥
११०.
पाहो जो गेलिया मीच हरपलिये । नवल कैसे जाले बाईयांनो ॥१॥
काय सांगो कैसे विपरीत चोज । पडिले माझे मज ठक कैसे ॥२॥
देखत देखता अंगी संचारले । नाठवसे जाले मी हे माझे ॥३॥
बहेणि म्हणे नवल सांगो कोणापासी । माझे मी मानसी लाजिलिये ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 21, 2017
TOP