मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
४९१ ते ५००

करूणापर अभंग - ४९१ ते ५००

संत बहेणाबाईचे अभंग

४९१.
किती एक लोक मागताची मेले । तैसे हे न चाले पांडुरंगा ॥१॥
घेईन निश्चये न सोडी सर्वथा । विश्वास हा तआता काय तुझा ॥२॥
अवचिता येथे पाहिलासे दृष्टी । पहाता ये सृष्टीअकस्मात ॥३॥
आता कोण तुझा दरील विश्वास । बहु हो आयुष्य पुंडलिका ॥४॥
फार सीण त्याचा घेतला अच्युता । त्याच पुण्ये आता देखिलासी ॥५॥
बहेणि म्हणे लोभ आता सांडी हरी । थोरपणा धरी पांडुरंगा ॥६॥

४९२.
अनामिक क्रिया दिसे तुझे अंगी । बुडविले संगी सर्व माझे ॥१॥
जीवहत्या तुझे माथा होती फार । हत्यारी साचार नाम तुझे ॥२॥
उदंडांची घरे बुडविली वाटोळ्या । किती बाळ्या भोळ्या नागविले ॥३॥
बहेणि म्हणे तुझे नाम निसंतान । होईल जे कोण वाचे गाती ॥४॥

४९३.
सत्यभामा ऋण मागता न देसी । दिधले द्विजासी दान तिने ॥१॥
परि तू ठेवणे न देसी लोभिष्ठ । आइकता मोठा खेद वाटे ॥२॥
देवकी वसुदेव भागले मागता । जालासी तत्त्वता पुत्र त्यांचा ॥३॥
बहेणि म्हणे गाई राखिसी नंदाच्या । ठेवणे कोणाच्या हता न ये ॥४॥

४९४.
तुझ्या थोरपणा कोण लावी हात । वाटते मनात धरवेसे ॥१॥
धरोनिया बंदी द्यावे हृदयात । सोडवील तेथे कोण दुजे ॥२॥
विवेक राखण ठेवीन जवळी । हृदयाची टाळी देऊनिया ॥३॥
बहेणि म्हणे माझे देई भांडवल । एकोनिया बोल आता तरी ॥४॥

४९५.
बाप षड्गुण - ऐश्वर्ये थोर तू जालासी । नावडे आम्हासी काय तैसे ॥१॥
लक्षुमी यश कीर्ति औदार्य वैराग्य । ज्ञानाने ते सांग सर्व आले ॥२॥
हेचि भांडवल तुझे आहे हाती । याने तू श्रीपती म्हणविसी ॥३॥
करूनि अकर्ता तू जैसा आहेसी । मज काय तैसी कळा नये ॥४॥
तू जैसा व्यापक सर्वाठायी हरी । मी काय विचारी नव्हे तैसी ॥५॥

४९६.
पुरोनिया धन बांधिले विटाने । न निघे ठेवणे बोल तर्‍ही ॥१॥
कोण्यापाडे उगा राहिलासी नेणो । महाग बोलणे फार जाले ॥२॥
पन्नासा चिरियाने बांधिले माचोनी । निघेना म्हणोनी बोल तरी ॥३॥
कारण - देहाच्या पडिले अंधारी । निघेना बाहेरी काय काजा ॥४॥
नाही आराणुक पहावया मज । काही तरी गुज बोल एक ॥५॥
बहेणि म्हणे नका आता व्यर्थ पीडू । काय जोड जोडू भागलासी ॥६॥

४९७.
तुम्हा आम्हा चौघे सांगतील आता । चला पंढरीनाथा उठा वेगी ॥१॥
बहु भीड केली आमुचे उचित । भलेपण येण कोण पुसे ॥२॥
सा चौघे अठरा सांगू दोघेजण । घातलीसे आण उठा वेगी ॥३॥
बहेणि म्हणे जाणे बाहेर लागले । घरात बुडविले कोण सोसी ॥४॥

४९८.
थोरपणा आम्ही दिधली तिलांजुळी । तुज वनमाळी पाहिजे तो ॥१॥
तुजहुनी बरे आम्ही एकापरी । पहाता विचारी आपुलिया ॥२॥
बद्धमुक्त कोणा न म्हणे सर्वथा । तुजपाशी कथा हेचि असे ॥३॥
बहेणि म्हणे लोक विस्तारणे तुज । आम्ही तो सहज वर्ततसो ॥४॥

४९९.
भांडणाची रीती आयकिली संती । सोडवील हाती धरूनिया ॥१॥
हा काय देइल विचारी मनासी । येणे कोणत्यासी रोख दिल्हे ॥२॥
निवृत्तीचे हाते पावले हे तया । ज्ञानदेवाचिया सोई पाहे ॥३॥
वसिष्ठाचे हाते पावले श्रीरामा । ऐसे काय तुम्हा ठावे नाही ॥४॥
नारदाचे हाते दिधले बहुता । रोख नाही देता झाला कोणा ॥५॥
चांगदेवाप्रती मुक्ताईकडून । देवविले जाण ज्याचे त्यासी ॥६॥
बाबाजीचे हाते तुकोबाचे रिण । फेडविले जाण येणे खरे ॥७॥
ऐसे किती सांगो युगायुगी तुज । बोलियेले गुज संतसाधु ॥८॥
बहेणि म्हणे आता त्या तरी दाविजे । येथे रोख माझे फेडावया ॥९॥

५००.
असो चिंताग्रस्त प्रेमाचिया आशे । वाढो देव ऐसी कृपा करो ॥१॥
प्रवेशोनी अंतरी कोणाचिया तरी । कोण म्हणे धरी कास माझी ॥२॥
नासील हे माझी कोण दरिद्रता । कोण भवव्यथा निवारील ॥३॥
बहेणि म्हणे ऐसी सदा चिंताग्रस्त । काय करी नाथ पंढरीचा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP