मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
४२७

अभंग - ४२७

संत बहेणाबाईचे अभंग

ऐका तुम्ही भाविक सज्जन । काही एक बाळकवचन ॥ आत्म्या - काये लागले भांडण । साधुसंती द्यावे निवडून ॥१॥
काया म्हणे आत्मयासी “ पाहे । मज स्वामी मोकलिसी काये ॥ हे तो तुज उचित पै नव्हे । आधी बरे विचारी का हे ॥२॥
मर मर आत्मया रे नष्टा । मज येथे सांडिसी पापिष्टा ” ॥ येरू म्हणे “ ऐक काय माझे । देह तव लटिके सहजे ॥३॥
आत्मा अविनाश श्रुति गर्जे । का बा व्यर्थ भांडिसी सांगिजे ॥ सोडी मज वेडिये अज्ञाने । तुज मज वेगळीक ज्ञाने ” ॥४॥
काया - “ ऐके स्वामी आत्मया जिवलगा । मजसंगे सुख तुज की गा ॥ नानापरी सोसुनी की गा । सेखी मज सांडुनी जासी गा ” ॥५॥
आत्मा - “ ऐक वेडे नाव हे समुद्री । प्राण्यालागी नेत पैलतीरी ॥ नाव राहे उदकी जयेपरी । तैसे तुज जाहाले सुंदरी ” ॥६॥
काया - “ तुजमज वियोगचि नाही । जाण्याआधी सांगेन तुज पाही ॥ टाकावे हे उचितचि नाही । सेवा मजपासुनिय घेई ” ॥७॥
आत्मा - “ अश्वावरी पार्थिव बैसला । नेउनिया स्वस्थानी उतरला । आंतरसुख काये, प्राप्त त्याला । अश्वा प्राप्त झाली अश्वशाळा ” ॥८॥
काया - “ रतिसुख आत्म्या मजसी । नानापरी घेतले विशेषी ॥ इंद्रियद्वारे सुख घेसी । सेखी मज पापिष्टा सांडिसी ! ” ॥९॥
आत्मा - “ लोहारासी अग्निचाड आहे । म्हणउनिया फुंकिती उपाये ॥ कार्य झाल्या टाकील सर्व हे । तैसे तुझे काम आम्हा काये ॥१०॥
लोहोसंगे अग्न भासे परी । घण पडिती लोहाचेच शिरी ॥ तैसे तुझे संगती माझारी । असोनिया अलिप्त सुंदरी ” ॥११॥
काया - “ आम्ही तव पतिव्रता नारी । स्वामी जाता जाळून शरीरी ॥ तू रे तव नष्ट सर्वांपरी । भोगुनिया चालिलासी वरी ” ॥१२॥
आत्मा - “ तुझे नाव पाहता तुकडी । तुज आम्हासंगती आवडी ॥ निज आत्मा निर्गुण निर्वडी । जाय परती आहेसी तू वेडी ” ॥१३॥
काया - “ मजआत कासया वर्तसी । अंती आम्हा सांडुनिया जासी ॥ सुखभोग सर्वही तू घेसी । अलिप्त हे नाम मिरविसी ” ॥१४॥
आत्मा - “ तुजमज संगतीच मूळ । जैसा चंद्र उदकीच सोज्ज्वळ ॥ भासे परी अभिन्न केवळ । तैसा कायेमध्ये हा गोपाळ ” ॥१५॥
ऐसा आत्मा बोलता आपण । मग कुडी पडियेली जाण ॥ आत्मा आहे व्यापक परिपूर्ण । देही आहे परी विलक्षण ॥१६॥
देह - आत्मा संबंधुचि नाही । गुरूकृपे करूनिया पाही ॥ तुकारामी निष्ठा पूर्ण तेही । बहेणि हे मुळी नाही ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP