मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
४०१ ते ४०७

अभंग - ४०१ ते ४०७

संत बहेणाबाईचे अभंग

४०१.
गुरुपरंपरा आम्हा चैतन्य बळी । तयाच्या स्मरणे आम्ही वैकुंठी बळी ॥१॥
नमस्कार हा तया साष्टांग माझा । वोवाळू जीवे साधु चैतन्य - राजा ॥२॥
चैतन्य हा सर्वगत व्यापकि गुरू । प्रगटला हा तुकाराम वेष दातारू ॥३॥
तयाचे हे ध्यान सदा माझे अंतरी । अंतरीचे ध्यान सबाह्याभ्यांतरी ॥४॥
नेणे स्नान दान जप आसन मुद्रा । सदा सर्वकाळ ध्याऊ चैतन्य पदा ॥५॥
बहेणि म्हणे आम्ही मुक्त गुरूचे ध्याने । प्रेमे भक्ति - भावे तया वोवाळू प्राणे ॥६॥

४०२.
ब्रह्माडं पंढरी हे आजी जाली खरी । मुखी नाम घेता हे हरिहरी ॥१॥
सुख सुखावले कोणा सांगू गे माये । जिकडे पाहे तिकडे हरि भरला आहे ॥२॥
सरली भ्रांति हारपला देहभाव । महदामहद नुरे जेथे ठावाठाव ॥३॥
गेले मीपण हारपला भावाभाव । बहेणि म्हणे देखियेला पंढरीचा राव ॥४॥

४०३.
जन्मोनिया जोडी जोडिली संसारी । सापडली तीरी चंद्रभागे ॥१॥
घनःश्याम मूर्ति सावळी डोळस । उभी सावकाश विटेवरी ॥२॥
नामरूपातीत चैतन्य शाश्वत । आत्मस्वरूपस्थित प्रगटली ॥३॥
वेदा अगोचर श्रुतीहूनी पर । निर्गुण निर्विकार पहाते गे ॥४॥
अखंड चिद्घन दिसे सर्वसाक्षी । बहेणि तया लक्षी हृदयामाजी ॥५॥

४०४.
लाचावले मन नव्हे त्या वेगळे । देखिले सावळे परब्रह्म ॥१॥
जाली तन्मयता हालेना पापणी । घेत असे धणी स्वरूपाची ॥२॥
विसरले मन आपले आपण । पडोनि ठेले शून्य मी - तूपणा ॥३॥
नाठवे मीपण पडला विसरू । इंद्रियव्यापारू पारूषला ॥४॥
राहिली इंद्रिये अचेतन वृत्ती । मना आत्मस्थिति लागलीसे ॥५॥
लागल्या पै वृत्ति खुंटली हे गती । बहेणि ते भोगिती आत्मसुख ॥६॥

४०५.
चालता पाऊल पंढरीच्या वाटे । ब्रह्मसुख भेटे रोकडेचि ॥१॥
पहाता ऐसे सुख नाही त्रिभुवनी । ते पहावे नयनी पंढरीसी ॥२॥
गाता हरिनाम वाजविता टाळी । प्रेमाचे कल्लोळी सुख वाटे ॥३॥
दिंडीचा गजर होजो जयजयकार । मृदंग सुस्वर वाजताती ॥४॥
हमामा टिपरी घालिती हुंबडी । होवोनिया उघडी विष्णुदास ॥५॥
बहेणि म्हणे ऐसा आनंद वाटेचा । कोण तो दैवाचा देखे डोळा ॥६॥

४०६.
चला झडझडा वोसंता हे वाट । पंढरी मूळपीठ दूरी आहे ॥१॥
सांडा आडकथा वोसंडा मारग । वाट पांडुरंग पहातसे ॥२॥
स्वहिताची जया असेल तातडी । तेणे घडीने घडी काळ साधा ॥३॥
गेलिया दिवस पडेल अंधारी । हे ना तैसी परी थार नाही ॥४॥
पडो देह राहो, धरावा निर्धार । पांडुरंगी भाव सांडू नये ॥५॥
बहेणि म्हणे आजी जावे वेळोवेळा । तरीच पर्वकाळा साधिजेल ॥६॥

४०७.
सर्वांगव्यापिणी भीमेचा महिमा । वर्णावया ब्रह्मा अनिर्वाच्य ॥१॥
धन्य ते दैवाचे पंढरीचे लोक । घेती प्रेमसुख विठोबाचे ॥२॥
भीमा - चंद्रभागा संगम जे ठायी । वानावा वो काई महिमा तेथे ॥३॥
त्याहीवरी जेथे पंढरीचा देव । काय सांगो भाव क्षेत्रमहिमा ॥४॥
तिहींचा संगम वसे जये ठायी । सांगावा तो काई महिमा त्याचा ॥५॥
एसिया क्षेत्राचा महिमा ऐकता । पापाची हे वार्ता स्वप्नीं नाही ॥६॥
स्नानदान घडे देवाचे दर्शन । तेथे जन्ममरण काय करी ॥७॥
फिरे सुदर्शन सदा सर्वकाळ । काळ आणि वेळ कैची तेथे ॥८॥
स्नानालागी देव येताती मिळोनी । बैसोनी विमानी माध्याह्नीके ॥९॥
ऐसा क्षेत्रमहिमा कोण वानी सीमा । नकळे अधमा असोनिया ॥१०॥
धन्य पुंडलीक धन्य त्याचा भाव । क्षेत्राचा अनुभव वाढविला ॥११॥
बहेणी म्हणे पुण्य पाहिजे ते गाठी । व्हावयाते भेटी विठोबाची ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP