मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
३९१ ते ४००

अभंग - ३९१ ते ४००

संत बहेणाबाईचे अभंग

३९१.
हरिभक्त निंदक जन्मले एके ठायी । वाटा तया पाही भागा आला ॥१॥
ज्याचे कर्म त्याने केलेचि पाहिजे । न करिता सहजे दोष होती ॥२॥
म्हणोनि निंदके निंदाचि करावी । तयासी तोचि जीवी आठो असे ॥३॥
हरिभक्ते भजन करावें आदरे । संतांची सादरे पूजा कीजे ॥४॥
कावळ्याचा धर्म टोचावे ढोपरा । मौक्तिकाचा चारा काय त्यासी ॥५॥
श्वानाचा स्वभाव गुरगुर करावी । पिसाळल्या जीवी प्राण घ्यावा ॥६॥
हंसाचा स्वभाव पय - पाणी निवडी । विष्ठा तो चिवडी काय घडे ॥७॥
बहेणि म्हणे तैसे ज्याचे कर्म तेणे । करावे म्हणणे न लगे तया ॥८॥

३९२.
हरिभक्ता सन्मार्ग दिधला हा वाटा । निजभक्ता - निष्ठा पुण्यवंत ॥१॥
दया हे करावी भक्ति - पुरस्कारे । रामनाम त्वरे मुखी गावे ॥२॥
संतांचे पूजन शास्त्रांसी सन्मान । अखंड अर्चन ब्रह्मपूजा ॥३॥
गंगा गोदावरी काशी तीर्थयात्रा । तेणेचि पवित्रा देह करी ॥४॥
भूतमात्री भाव सांडोनी मीपण । आठवी चरण राघवाचे ॥५॥
बहेणि म्हणे हेचि कर्म भागा आले । दुसरा न चले उपाय हा ॥६॥

३९३.
रासभासी कळा शिकविले ज्ञान । स्वधर्माचरण काय सांडी ॥१॥
तैसा जो स्वभाव निंदका हरिभक्ता । सांडी तो हे वार्ता स्वप्ना न ये ॥२॥
मर्कटासी जरी सुखासन दिधले । तरि काय सोहळे होती तया ॥३॥
श्वानाचिया अंगा लाविला चंदन । उकिरडा - शयन न करी काई ॥४॥
घुसी उंदरांसी वाउनी मंचकी । काय उकीर सेखी न काढिती ॥५॥
सर्पा - विंचवासी शर्करादि दूध । काय ते पा शुद्ध विष नोहे ॥६॥
वाघुळासी घरी आणुनि ठेविले । उफराटे टांगिले न सोडी ते ॥७॥
बहेणि म्हणे तैसे अभक्तांचे स्वभाव । शिकविल्या ठाव न सांडिती ॥८॥

३९४.
तैसी अभक्तासी गुरूकृपा जाली । सेखी व्यर्थ गेली फळेचिना ॥१॥
निंदाचि करिता वाचा आरायणा । तेथे नारायणा कोण स्मरे ॥२॥
श्वानाचे शेपूट शतवर्षे नलिके । घालिता न चुके वक्रदशा ॥३॥
गर्वे करोनिया मस्तक लवेना । तो संतचरणी केवी लागे ॥४॥
लोकांची अकर्मे विचारी मानसी । तेथे भगवंतासी कोण चिंती ॥५॥
ऐसा परोपरी अकर्माचि लागी । वाढलासे जगी द्वेषासाठी ॥६॥
बहेणि म्हणे ज्याचे कर्म तोचि करी । तयसी श्रीहरी काय करी ॥७॥

३९५.
भक्ताचे आचरित आपणचि होय । भगवंताची साय सारीच ना ॥१॥
कीर्तनी आदर शांति क्षमा वसे । देह जाता कैसे दंडळेना ॥२॥
भक्ति आणि ज्ञान वैराग्य वोतले । प्रेम वोसंडले सर्वकाळ ॥३॥
क्रिया कर्म जे जे अर्पी ईश्वरासी । अखंड वाचेसी रामराम ॥४॥
अर्वाचक बोल नयेचि मुखासी । केवी पतिव्रतेसी परपुरूष सीवे ॥५॥
सर्वांभूती भाव संततची धरी । नमस्कार करी भूतमात्रा ॥६॥
अगर्वता मनी संता लोटांगण । आठवी चरण श्रीगुरूचे ॥७॥
बहेणि म्हणे ऐसे भक्त आचरित । तयासी भगवंत जवळी असे ॥८॥

३९६.
भक्ता अभक्तांसी कोण गती होय । आइका उपाय तोही एक ॥१॥
कर्तृत्वासारिखे प्राप्त होय फळ । देतसे कृपाळ पाहोनिया ॥२॥
येणे क्रमे भक्त आचरे जरी हा । तरी तया पहा विष्णुपद ॥३॥
देहीच असता विदेही तो जाणा । सत्य सत्य खुणा वेदमते ॥४॥
भक्ता भवपाश बांधू न शकती । तयांसी श्रीपति रक्षितसे ॥५॥
बहेणि म्हणे भक्त तेचि जाण मुक्त । तयांसी भगवंत प्राप्त जाला ॥६॥

३९७.
निंदक तेही फळ घेती कर्तृत्वेसी । निंदिता संतांसी नानापरी ॥१॥
नसता अपराध संतजन निंदी । सहस्त्र गाई - वधी दोष थोडा ॥२॥
संतांसी मत्सर करी सर्व काळ । दोष ते सबळ आले अंगी ॥३॥
असले अपराध संता - अंगी घोर । तो बोलला अपार दोष होती ॥४॥
असता अपराध नये आणू मुखा । वदता त्रिदोखा पात्र झाले ॥५॥
एवढे अपराध थोर जरी जाले । भला जो बोले दोषी खरा ॥६॥
संतांचे महिमान न कळे कोणासी । म्हणोनि दोषासी नरोपाए ॥७॥
’बहेणि म्हणे असे दोषी तोचि नर । लटिके संतांवर घाली दोष ॥८॥

३९८.
लटिके दोष जरी संतांसी आरोपी । जाणावा तो पापी कुष्टी होय ॥१॥
तयाचिया कुष्टा नाहीच निवृत्ति । चंद्र - सूर्य फिरती जोवरी पाहे ॥२॥
नसतीचि संतांची छळना जो करी । जाणावा तो वैरी श्रीहरीचा ॥३॥
देखवेना डोळा उत्कृष्ट हे पाहे । रचितो उपाय नानापरी ॥४॥
निंदा वाद भेद वाढवी मत्सर । सदा करकर संतांसवे ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे अभक्तांचे गुण । सहजचि जाण उमटती ॥६॥

३९९.
नसतेचि दोष आरोपिती संता । जाती अधःपाता रौरवासी ॥१॥
जन्मोजन्मी किडे विष्ठेतील होती । क्षण एक विश्रांती नाही जीवा ॥२॥
कन्याविक्रयाचा दोष तोही थोडा । करिती जे पीडा साधकांसी ॥३॥
सहस्त्र वधिता गाई तेही पाप थोडे । निंदा संती जोडे अगणित ॥४॥
पिता - माता - वद करू बापा सुखे । दोष हे विशेष संतनिंदे ॥५॥
देउळे मोडिती अग्रहारे जाळिती । तेही दोष जाती क्षणमात्रे ॥६॥
परी संतनिंदा - दोष न जाय सर्वथा । नेतो अधःपाता ब्रह्मादिका ॥७॥
बहेणि म्हणे संतनिंदेने अभक्ता । रविशशी भ्रमत तोवरी पीडा ॥८॥

४००.
स्वधर्मे आपुल्या असता स्वगृही । कोन्ही निंदा पाही करू नये ॥१॥
निम्दिता तयाचा शस्त्राविण वध । केला हा वेवाद वेदमुखे ॥२॥
जेणे वाचे निंदा करावी संतांची । तये वाचे यमाची सुरी वाहे ॥३॥
जये वाचे निंदा वाकुल्या दाखवी । ते वाचा रौरवी पचे खरी ॥४॥
जया मुखे शिव्या द्यावा संतवृंदा । तया वाचे आपदा नानापरी ॥५॥
बहेनि म्हणे यासी नव्हे अप्रमाण । वेदाची हे खूण सत्य बापा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP