करूणापर अभंग - ५११ ते ५२०
संत बहेणाबाईचे अभंग
५११.
गुळेविण कैची गोडी । जाणॊ येईल आवडी ॥१॥
तैसा देव भावेवीण । केवी जाणावा आपण ॥२॥
पुष्पेविण न कळे वास । त्याचे ज्ञान पडे वोस ॥३॥
बहेणि म्हणे जनी देव । वोळखावा स्वयमेव ॥४॥
५१२.
जन तेचि जनार्दन । ऐसे श्रुतीचे वचन ॥१॥
म्हणवोनी जनी आहे । देव विवेके तू पाहे ॥२॥
चंदनाचे खोडी । आहे सुगंध परवडी ॥३॥
बहेणि म्हणे जळी रस । तंतूमध्ये जी कापूस ॥४॥
५१३.
मृगजळी तृषा हरे । हे तो वाउगी उत्तरे ॥१॥
तैसे नाशवंत देव । मानिलिया ज्ञान वाव ॥२॥
चित्रातील रवी । भावे अंधारे उगवी ॥३॥
बहेणि म्हणे दृश्य जाये । तेथे देव कैचा राहे ॥४॥
५१४.
देव न लभे तानमाने । शब्दज्ञाने सर्वथा ॥१॥
संत समागमाविण । नारायण साधेना ॥२॥
देव न लभे तीर्थयात्रे । कुरूक्षेत्रे हिंडता ॥३॥
बहेणी म्हणे वर्म थोडे । मूर्ख वेडे जाणेना ॥४॥
५१५.
संतसमागमी राहे । त्यासी काय उणे हो ॥१॥
पाहिजे ते निष्ठाबळ । हेचि अढळ मानसी ॥२॥
संत केवळ ते ज्ञान । निज खूण दाविती ॥३॥
बहेणि म्हणे संतापासी । सिद्ध दासी कामाच्या ॥४॥
५१६.
मोक्ष संतांचे वचने । प्राप्त क्षणे तो होये ॥१॥
परी तुवा काया - वाचा । करी साचा संकल्प ॥२॥
मागसी ते ते देती संत । निमिषात पै एका ॥३॥
बहेणि म्हणे दाने संत । हाचि अर्थ वेदाचा ॥४॥
५१७.
संत पूर्ण कृपानिधि । स्थिर - बुद्धि स्वरूपी ॥१॥
साए वोळखावे चिन्ह । दया पूर्ण भूतांची ॥२॥
संत सदा तृप्त मनी । अनुसंधानी सर्वदा ॥३॥
बहेणि म्हणे पर - उपकारी । दीनावरी कृपाळ ॥४॥
५१८.
संतुष्ट मानसी सदा सर्वकाळ । हृदय निर्मळ जेवी गंगा ॥१॥
संत ते जाणावे ब्रह्मप्राप्ती लागी । धन्य तेचि जगी शरण त्यासी ॥२॥
सर्वभूती बुद्धि समान सारिखी । आपुली पारिखी चिंतू नेणे ॥३॥
बहेणि म्हणे द्वेत हारपूनी गेले । अद्वैत बिंबले ब्रह्म डोळा ॥४॥
५१९.
आपुलिया दुःखे जैसे होती क्लेश । इतरांचे चित्तास तेचिपरी ॥१॥
असे जे जाणती आपुले मानसी । संत निश्चयेसी वोळखावे ॥२॥
पराविया सुखे सुख मानी मनी । देखे जनी वनी जनार्दन ॥३॥
बहेणि म्हणे तोय तैसे त्यांचे मन । संतांचे लक्षण हेचि एक ॥४॥
५२०.
कापुराचे जैसे अंतर्बाह्य शुद्ध । किंवा ते प्रसिद्ध रत्न जैसे ॥१॥
तैसे ज्याचे चित्त सारिखे सर्वदा । संत तया वदा सर्वभावे ॥२॥
सूर्याचिया आंगी जैसा नाही मळ । चंदनी निश्चळ दृती जैसी ॥३॥
बहेणि म्हणे पूर्ण - ब्रह्म निर्विकार । तेचि हे साकार संत जाणा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 05, 2017
TOP