मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
२७१ ते २८०

ज्ञानपर अभंग - २७१ ते २८०

संत बहेणाबाईचे अभंग

२७१.
ब्रह्म जाणे तोचि बोलिजे ब्राह्मण । वेदींचे वचन साक्ष यासी ॥१॥
पहा अनुभव आपुलिया देही । शास्त्रासीही ग्वाही करोनिया ॥२॥
द्वादशकुळांचे जया अंगी तेज । सूर्य तो सहज न बोलता ॥३॥
राजचिन्हे अंगी राजा तोचि एक । करी जो कनक परीस तो ॥४॥
पुरवील कामना तेचि कामधेनू । वारील मरणु अमृत ते ॥५॥
बहेणि म्हणे तैसा ब्रह्माचा जाणता । ब्राह्मण तत्त्वता तोचि एक ॥६॥

२७२.
ज्ञाननिष्ठा सदा लक्षी लक्षयुक्त । चित्त ते विरक्त विषयभोगी ॥१॥
तोचि एक जगी ब्राह्मण निर्धार । पहा चमत्कार मनामाजी ॥२॥
फळाचीच आस नाही जयामाजी । वर्ततो सहजी स्वधर्मेचि ॥३॥
बहेणि म्हणे दुजे न देखे आणिक । ब्राह्मण तो एक वोळखावा ॥४॥

२७३.
भक्ति ज्ञान आणि वैराग्य मानसी । जाण वेद ज्यासी प्राप्त जाले ॥१॥
तोचि रे ब्राह्मण जाण ब्रह्मवेत्ता । आणिक तत्त्वता द्विजोत्तम ॥२॥
विरक्ति हे सत्य जया अंगी भार्या । ज्ञानाग्नि ज्ञानिया साग्निक जो ॥३॥
गुरूवचनी सर्व नित्यनैमित्तिक । अखंड विवेक आत्मयाचा ॥४॥
शांति क्षमा दया भाव तो निजबोध । अपत्ये प्रसिद्ध जया होती ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे देखोनिया चिह्न । तयासी ब्राह्मण वेद बोले ॥६॥

२७४.
सद्गुरूचे वाक्य तेचि अग्निरूप । समिधा ते रूप वासना ते ॥१॥
ऐसा तो साग्निक बोलिजे ब्राह्मण । विषयांसी हवन शेषभोक्ता ॥२॥
अविद्या-अस्मिता-काम-क्रोध-मुक्त । होऊनी यथोक्त आश्रमी तो ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे ब्राह्मण ते सत्य । वेदार्थ निश्चित हाचि खरा ॥४॥

२७५.
सद्गुरूवचनी ज्ञानाग्नि प्रगटला । हृदयी राहिला जयांचिया ॥१॥
तयासीच जगी ब्राह्मण म्हणावे । सांगितले स्वभावे मनासी या ॥२॥
विषयांचा होम ज्ञानाग्नीत करी । पूर्णाहुती खरी मनाची ते ॥३॥
अवभृतस्नान केले ज्ञानगंगे । शेष ते विभागे सेवियेले ॥४॥
बहेणि म्हणे ऐसे चिह्नी जे चिह्नत । ब्राह्मण निश्चित तेचि एक ॥५॥

२७६.
एक ते ज्योतिषी एक ते पाठक । अग्निहोत्री एक तीर्थाटनी ॥१॥
परब्रह्म जाणे तोचि की ब्राह्मण । देव तो आपण प्रत्यक्षचि ॥२॥
एक ते पंडित वैदिक ते एक । गायत्री नेटक ब्राह्मण ते ॥३॥
बहेणि म्हणे एक वीर्यमात्र द्विज । ऐसे ते सहज सांगितले ॥४॥

२७७.
पिंडब्रह्मांडासी करोनिया ऐक्य । मनी महावाक्य - बोध जाला ॥१॥
तयासी ब्राह्मण बोलिजे साचार । ब्रह्मसाक्षात्कार प्रत्यक्ष हा ॥२॥
तत्त्वमसि पदीचा शबलांश सांडिला । जीव शिव केला ऐक्य - ज्ञाने ॥३॥
महाकारणादि देह चार पाहे । शोधोनिया जाये तुर्यपदा ॥४॥
सोऽहं हंस मंत्र अखंड उच्चार । समाधि साचार अखंडत्व ॥५॥
बहेणि म्हणे ब्रह्मवेत्ते हे ब्राह्मण । यांचिया दर्शने मुक्ति जोडे ॥६॥

२७८.
एकाचा निश्चय गुरूवचनी मुक्ति । एक ते मांडिती निर्गुणध्यान ॥१॥
परि आहे मोक्ष वेगळाचि जण । ज्ञानी ते निर्वाण साधिती हो ॥२॥
सगुणचि मोक्ष एकाचिया मते । आकाररहित मोक्ष म्हणती ॥३॥
एक ते भाविती मोक्ष भक्ति ज्ञान । वैराग्य साधन म्हणती मोक्ष ॥४॥
एक ते सिद्धीते म्हणताती मोक्ष । शास्त्रज्ञाते मोक्ष म्हणती एक ॥५॥
एक ते स्वाचारे मोक्ष प्रतिहिती । फलत्यागे भाविती एक मोक्ष ॥६॥
मनोजय एक कल्पिताती मोक्ष । ध्यानाचिय पक्षे मुक्ति म्हणती ॥७॥
एक महत्तत्व विचारे स्थापिती । मद्यमांस घेती मोक्षहेतु ॥८॥
एक ते इंद्रिये आचरती यथेष्ट । तोचि मोक्ष, भ्रष्ट मानिताती ॥९॥
एक ते वेदाचे पठणे म्हणती । मोक्ष एक भाविती प्रपंचाते ॥१०॥
एक क्लेशे जाणा दंडिती देहासी । म्हणती मोक्षासी हेतु हाचि ॥११॥
एक ते पंचाग्नि धूम्रपान वनी । मोक्ष हाचि जनी भाविताती ॥१२॥
एक ते संन्यासी जटिल तापसी । मोक्ष हा तयासी स्थापिती ते ॥१३॥
एक पंचीकरणे पहाती सर्वदा । म्हणती मोक्षपदा हेचि मूळ ॥१४॥
एक मौनी जपी तपी अनुष्ठानी । भाविती ते जनी येणे मोक्ष ॥१५॥
एक पंचमुद्रा लाविती आपणा । म्हणती मोक्ष जाणा येणे होय ॥१६॥
एक ते दैवते ध्याती नानापरी । मोक्ष हा अंतरी मानिताती ॥१७॥
बहेणि म्हणे मोक्ष आहे तो वेगळा । जाणती ते कळा ज्ञानवंत ॥१८॥

२७९.
नानापरी जन कल्पिताती मोक्ष । परी तो प्रत्यक्ष नसे कोणा ॥१॥
वासनेच्या क्षये मोक्ष तो सापडे । तत्त्वमसे जोडे आत्महित ॥२॥
त्वंपद - तत्पद ऐक्य जै होईल । ‘ असि ’ पदी मूळ सापडेल ॥३॥
बहेणि म्हणे वृत्ति होती जै निश्चल । तै तुटे पडळ प्रपंचाचे ॥४॥

२८०.
श्रोत्र आणि त्वचा चक्षु जिह्वा घ्राण । ज्ञानेंद्रिये जाण पाच ऐसी ॥१॥
याहुनी वेगळा आत्मा तो निश्चये । अनुभवे तू पाहे मनामाजी ॥२॥
वाचा आणि पाद शिश्न आणि गुद । कर्मेंद्रिये सिद्ध पाच ऐसी ॥३॥
अंतःकरण मन बुद्धि चित्त चौथे । अहंकार येथे पाचवा तो ॥४॥
शब्द स्पर्श रूप रस गंध जाण । विषय दारूण पाच ते हे ॥५॥
बहेणि म्हणे ऐसा पंचाविसा शोध । तत्पदीचा बोध करी मना ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP