संत बहेणाबाईचे अभंग - २१ ते २९
संत बहेणाबाईचे अभंग
२१.
भ्रतार म्हणतसे आम्ही की ब्राह्मण । वेदाचे पठण सदा करू ॥१॥
कैचा शूद्र तुका स्वप्नाची दर्शनी । बिघडली पत्नी काय करू ॥२॥
कैचा जयराम कैचा पांडुरंग । माझा झाल अभंग आश्रयाचा ॥३॥
आम्ही काय जाणो नाम हरिकथा । भक्ति हे तत्त्वता नसे स्वप्नी ॥४॥
कैचे संतसाधू कैची भावभक्ती । भिक्षुकाचे पंगति वसो सदा ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे चित्तात भ्रातरे । चिंतोनी निर्धारे विचारिले ॥६॥
२२.
विचारिले मनी भ्रतारे आपण । आता हे त्यागून वना जावे ॥१॥
ईस नमस्कार करितील जन । आम्ही ईस तृण वाटो परी ॥२॥
स्त्रियेसी बोलती अनुवाद कथेचा । आम्ही परि नीच ईस वाटू ॥३॥
पुसतची येती ईस पहा जन । आम्ही की ब्राह्मण मूर्ख जालो ॥४॥
इचे नाव घेती गोसावीण ऐसे । आम्हा कोण पुसे इजपुढे ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे भ्रतार मानसी । चितुनी चित्तासी बोध करी ॥६॥
२३.
म्हणे आता मना स्त्रियेची हे दशा । आता तू सहसा राहो नको ॥१॥
चाल वेगी जाऊ तीर्थासी वैराग्य । आमचे हे भाग्य वोडवले ॥२॥
सासू सासरियास केला नमस्कार । आहे स्त्री गरोदर मास तीन ॥३॥
आपण जातो तीर्थयात्रा करावया । देवलसी स्त्रिया यत्न कीजे ॥४॥
न पाहे मी मुख सर्वथा इयेचे । हीनत्व आमुचे कोण फेडी ॥५॥
भंडिमा सोसून कोण राहे येथे । ऐसिया स्त्रियेते कोण पाळी ॥६॥
बहेणि म्हणे ऐसे बोलिला भ्रतार । मज पडे विचार मनामाजी ॥७॥
२४.
भय म्या अदृष्ट करावे आपण । आले जे ठाकून सोसी येथे ॥१॥
वाही येत वारे आंगासी माझीया । घुमारीन काया नव्हे माझी ॥२॥
वधर्म आपुला रक्षूनिया मने । शास्त्राच्या श्रवणे देव साधू ॥३॥
भ्रताराची सेवा तोचि आम्हा देव । भ्रतार स्वयमेव परब्रह्म ॥४॥
तीर्थ भ्रतराचे सर्वतीर्थ जाण । तया तीर्थावीण निरर्थक ॥५॥
भ्रतारवचनासी उल्लंघीन जरी । पापे माझ्या शिरी पृथिवीची ॥६॥
धर्म अर्थ काम मोक्षासी अधिकारी । भ्रतार साचार वेद बोले ॥७॥
हा माझा निश्चय मनातील हेत । भ्रतारेसी चित्त लाविलेसे ॥८॥
भ्रतारसेवेने सांग हा परमार्थ । भ्रतारेच स्वार्थ सर्व आहे ॥९॥
भ्रतारा वाचून अन्य देव जरी । येईल अंतरी ब्रह्महत्या ॥१०॥
सद्गुरू भ्रतार साधन भ्रतार । हा सत्य निर्धार अंतरीचा ॥११॥
बहेणि म्हणे देवा भ्रताराचे मनी । तुवा प्रवेशोनी स्थिर केले ॥१२॥
२५.
भ्रतार गेलिया वैराग्य घेउनी । पांडुरंगा जनी जिणे काय ॥१॥
प्राणोविण देह काय पावे शोभा । रात्री विणप्रभा चंद्राचिये ॥२॥
भ्रतार तो जीव देह मी आपण । भ्रतार कल्याण सर्व माझे ॥३॥
भ्रतार जीवन मी मच्छ तयात । कैसेनी वाचत जीव माझा ॥४॥
भ्रतार तो रवी मी प्रभा तयासी । वियोग हा त्यासी केवी घडे ॥५॥
बहेणि म्हणे माझ्या जिवाचा निर्धार । बोले पै विचार हरी जाणे ॥६॥
२६.
माध्यान्ह जालीया पाहिजे ते अन्न । भ्रतार जाऊन ग्राम हिंडे ॥१॥
तव तेथे येक ब्राह्मण कोंडाजी । म्हणे ‘ तुम्ही या जी भोजनासी ’ ॥२॥
भ्रतार बोलिला ‘ आहो पाचजण । इतुकियासी अन्न कोण घाली ’ ॥३॥
येरु म्हणे ‘ तुम्ही आवघीच भोजना । यावे नारायणा काय चिंता ॥४॥
जावे स्थळ तुम्ही पाहोनी राहिजे । माध्यान्ही येईजे गृहाप्रती ’ ॥५॥
बहेणि म्हणे आला भ्रतार, अन्नासी । मेळविले त्यासी सांगितले ॥६॥
२७.
एके दिवशी वाटे देखिले आपण । मंबाजीसी पूर्ण हेतयुक्त ॥१॥
नमस्कार करावया गेले तेथे । येरू हा न सिवे दूरी पळे ॥२॥
म्हणे तुम्ही काय कोण याती नेणो । आम्ही शूद्र म्हणो तुम्हालागी ॥३॥
सोनार की तुम्ही गोळक यातीची । तुम्हा ब्राह्मणाची क्रिया नाही ॥४॥
तुम्ही कोठे जाल भोजनासी जरी । दिवाणात तरी घालीन मी ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे ऐकोनी आपण । भ्रतारासी पूर्ण सांगितले ॥६॥
२८.
न कळसी वेदा विबुधा शास्त्रा श्रवणाने । न पडसी ठाई अनेक - परिच्या मननाने । नेणति योगीजन ते इंद्रिदमनाने । ऐसे तव रूप बोधत सद्गुरुवचनाने ॥१॥
जयदेव जयदेव जयजी चित्सूर्या । प्रकाशघन हृद्भुवनी निजसाक्षी तुर्या ॥ध्रु०॥
शेषहि श्रमला स्तविता जिव्हा हे चिरली । ब्रह्मा वदता वाणी बुद्धि वोसरली । ध्याने शंकर श्रमला मग गंगा धरिली । अपार महिमा न कळे हे कीर्ति उरली ॥२॥
शब्दे न पडसी ठाई लक्षातित लक्षू । हेही न घडे अतीत वर्तासि निजचक्षू । उत्तम पुरुषा लक्षुनि टाकियला वृक्षु । बहणि उद्वय चरणी उत्तम हा पक्षू ॥३॥
आरती आत्मारामाची
२९.
हृद्विकसित पद्मी तू विलससि सर्वेशा । रविशशि लोपति तेजे अज तू अमरेशा । अचळा अमळा अरुपा अगुणा गगनेशा । तुजविण महिमा नेणेचि परेशा ॥१॥
जयदेव जयदेव जय अंतरसाक्षी । दीपवत् विश्वी वर्तासि जिवशिव दो पक्षी ॥ध्रु०॥
षड्विध चक्रे शोधुनि रोधुनिया चित्ता । बोधुनि कर्णी त्यागुनि शरिराची ममता । नवही नादा अनुभवी अनुभव त्यापरता । भेदुनि काकीमुख जै देही ये समता ॥२॥जय०॥
अकार उकार मकार निमती ते तुर्या । बिंदुस्थानी उन्मनी अनुभवि जे चर्या । अक्षरही साक्षर तू उत्तम गुणवर्या । बहेणि म्हणता वाणी न धरी मम धैर्या ॥३॥जय०॥
N/A
References : N/A
Last Updated : February 21, 2017
TOP