मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
४३० ते ४३३

आरती - ४३० ते ४३३

संत बहेणाबाईचे अभंग

४३०.
जय माय ज्ञानदेवी । शब्द - रत्न - जाह्नवी । प्राशिता तोय तुझे । सुख होतसे जीवी ॥धृ०॥१॥
अनर्घ्य साररत्ने । सिंधु मथुनी गीता । काढिली भूषणासी । वैराग्यभाग्यवंता ॥जय०॥२॥
अमृतसार वोवी । शुद्ध सेविता जीवी । जीवचि ब्रह्म होती । अर्थ ऐकता तेही ॥जय०॥३॥
नव्हती अक्षरे ही । निजनिर्गुणभूजा । बहेणि क्षेम देती । अर्थ ऐकता बोजा ॥जय०॥४॥

४३१.
पूजावे कशाने जेथे जेथे तू देवा । अन्नगंध पुष्प धूपदीपादी सर्वा ॥धृ०॥१॥
पूज्य पूजक जगदाभास जाला सगुणी । म्हणानिया तूते भजी कोदंडपाणी ॥२॥
दुजे तुजविण देखो तरीच अर्पावे । सर्वाठायी वोतप्रोत व्यापिले देवे ॥३॥
बहेणि म्हणे तुझे तुज अर्पिता लाज । वाटे रामा पुरी तुझे राखावे गूज ॥४॥

४३२.
ठेविन मी मस्तक त्याचे चरणी । लाविल मज स्मरणी । ध्याइन मी निश्चळ अंतःकरणी । निज दाविल नयनी ॥१॥
आता सद्गुरू स्वामी आणा । माझिया प्राणा ॥धृ०॥
ज्याचे दर्शने द्वैत निरसे । माया न स्पर्शे । अमृतवृष्टि ज्यावरी वर्षे । आनंदे हर्षे ॥२॥
खंती वाटती त्याची मज गे । किती सांगू मी तुज गे । सांगेल मुक्तिचे निजबीज गे । बहेणि म्हणे मग गे ॥३॥

४३३.
मुक्तचि शरीर दग्धपट जैसा । उरला तो तैसा देह - संगे ॥१॥
ऐसे साधुसंत वोळखावे कैसे । अखंडित पिसे नामी जाले ॥२॥
जनाहिसारखे वर्तती वेवहारी । असोनी संसारी देहातीत ॥३॥
बहेणि म्हणे नामी अखंडित लीन । देह हे भूषण कधी नेणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP