मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
१ ते १०

संत बहेणाबाईचे अभंग - १ ते १०

संत बहेणाबाईचे अभंग

१.
देवगाव माझे माहेर साजनी । वेरूळ तेथोनी पूर्व भागी ॥१॥
देवांचा समूह सर्व जये ठाई । मिळालासे पाही देवगावी ॥२॥
हिमालयाहुनी चालिला अगस्ती । चातुर्मास्य वस्ती केली जेथे ॥३॥
तेथुनी पश्चिमे सिवनद वाहात । तीर्थ हे अद्भुत तीर्थांमाजी ॥४॥
लक्ष - तीर्थ जेथे येऊनी सर्वदा । लक्षायणी सदा वास तेथे ॥५॥
ते स्थळ पवित्र देखोनी अगस्ती । अनुष्ठाना येती दिनोदई ॥६॥
वरद दिधला ऋषी अगस्तीने । लक्ष तीर्थे जाण लाक्षाग्रामा ॥७॥
स्नान दान करी जप अनुष्ठान । सिद्धी तेथे जाण होय नरा ॥८॥
अगस्ती राहोनी देवगावी जाण । शिवनदीस्नान करी सदा ॥९॥
बहेणि म्हणे ऐसे देवग्राम । तेथे माझा जन्म जाला असे ॥१०॥

२.
आऊजी कुलकर्णी लेखक तये स्थळी । तयाचिये कुळी जन्म झाला ॥१॥
माता हे जानकी पिता आऊदेव । देवगाव नाव स्थळ त्यांचे ॥२॥
तयांचिये कुळी नाही जी संतान । करी जी संताना काही बाही ॥३॥
लक्षतीर्थी नित्य करुनिया स्नान । शिव - अनुष्ठान आरंभिले ॥४॥
कितेक दिवसात जाले स्वप्न तया । माझिया पितया आउजीसी ॥५॥
होईल संतान कन्या दोन पुत्र । ब्राह्मणे पवित्रे सांगितले ॥६॥
बहेणि म्हणे वरुषा येका मी उत्पन्न । नवमास पूर्ण कन्या जाले ॥७॥

३.
करिती उत्छाह वारसा ब्राह्मण । करुणी भोजन घरा गेले ॥१॥
पिता आऊदेव गेला अरण्यात । तव अकस्मात लाभ जाला ॥२॥
मोहर बांधली पितांबरी - गाठी । सापडली वाटी वेरुळाच्या ॥३॥
घरा येउनीया आनंदे बोलती । कन्या आम्हाप्रती लाभाईत ॥४॥
वीरेश्वर द्विज ज्योतिषी नेटका । तयाने पत्रिका संपादिली ॥५॥
होईल कल्याण इचेनि तुमचे । ऐसे पत्रिकेचे फळ वाची ॥६॥
देवलसी काही भाग्याची होईल । आयुष्याचे बळ फार आहे ॥७॥
बहेणि म्हणे ऐसे द्विजे सांगितले । तयासी दिधले वस्र गाई ॥८॥

४.
कन्यादान घडो हा अर्थ पाहोन । करावया लग्न द्विज आले ॥१॥
तव अकस्मात प्राक्तनासारिखा । सिऊराचा सखा येक आला ॥२॥
पूर्विल सोयरा लग्नाचा इच्छक । विवेक ( की ) पाठक रत्न नामी ॥३॥
लाउनी मागणे केले वाक्प्रदान । नेमुनिया लग्न संपादिले ॥४॥
तव बंधू जाला माझ्या पाठीवरी । अनुष्ठाना करी पूर्वीचिया ॥५॥
म्हणती हे सभाग्य बंधू पाठीवरी । जाला हे निर्धारी गुण इचा ॥६॥
बहेणि म्हणे णेसी जाली वर्षे तीन । त्यापुढे जे होणे तेही बोले ॥७॥

५.
मौनस गोत्र माझ्या पित्याचे वरिष्ठ । भ्रतारही श्रेष्ठ गौतम तो ॥१॥
शिवपुर नाम तेथील ज्योतिषीं मायबापे त्यासी समर्पिले ॥२॥
द्वितीयसमंधी वरुषा तिसाचा । नोवरा भाग्याचा ज्ञानवंत ॥३॥
बहेणि म्हणे त्यासी कन्यादान केले । आंदन दिधले सर्व काही ॥४॥

६.
लग्न संपोदोनी जाली वरुषे चारी ।  गोत्रजांचा वैरी पिता जाला ॥१॥
वृत्तीच्या समंधे कलह मांडला । माझा बोलाविला भ्रतार हा ॥२॥
“ गोत्रजांची फेडा बाकीसाकी रीण । मागती लिहून सेतमळा ॥३॥
आता येथोनिया जावे परदेसी । तरीच आम्हासी सुख होते ॥४॥
तू सखा सोयरा जावई मित्र तू । आमुचा हा अंतु पाहू नको ॥५॥
घातलेसे बंदी सोडवील कोण । तू सखा होऊन सोडवावे ” ॥६॥
मग त्या भ्रतारे काढिले बाहेरी । निशीचिया भरी मध्यरात्री ॥७॥
पिता माता बंधू मजही समवेत । गेले रातोरात गंगातीरा ॥८॥
प्रवरा - संगमी केले गंगास्नान । घेतले दर्शन सिद्धनाथे ॥९॥
बहेणि म्हणे पुढे चालिले तेथोनी । पाय वोसंतुनी महादेवा ॥१०॥

७.
गंगा देखोनिया सिद्धेश्वर देव । तेथोनिया जीव निघो नेणे ॥१॥
आवडीचा हेत पूर्वील संस्कार । श्रवणी आदर कीर्तनाचे ॥२॥
पुराण - श्रवण पूजा देवस्थान । ब्राह्मणपूजन प्रीति यांची ॥३॥
संन्यासी सज्जन संत महानुभाव । यांचे पायी जीव लागलासे ॥४॥
निघता तेथुन थोर वाटे दुःख । अदृष्ट करंटे काय कीजे ॥५॥
बहेणि म्हणे पुढे महादेवा जावे । भ्रतार गौरवे नेत आम्हा ॥६॥

८.
मागोनी भिक्षेसी क्रमितसे ’ वाट । सोसुनिया कष्ट नानापरी ॥१॥
मायबाप बंधू भ्रतारेसी जाण । महादेववन पाहावया ॥२॥
नरसिंहदर्शन घेउनी संपूर्ण । पांडुरंगस्थान देखियेले ॥३॥
भीमाचंद्र भागा पुंडलीक भक्त । वेणुनादी मुक्त प्राणिमात्रे ॥४॥
पद्मालयी स्नान देवाचे दर्शन । नामासंकीर्तन आइकिले ॥५॥
राही रखुमाई सत्यभामा सर्व । देखियेले पूर्वद्वारयुक्त ॥६॥
महाद्वारातूनी करित प्रवेश । वातले मनास महासौख्य ॥७॥
पांडुरंग - मूर्ति देखोनी पवित्र । संतोषले नेत्र इंद्रियेसी ॥८॥
केली प्रदक्षिणा महाहर्षयुक्त । चित्त हे विरक्त करूनिया ॥९॥
वाटे मनामाजी राहावे येथेची । परी प्राक्तनाची दशा नाही ॥१०॥
जीव जावो परी पंढरीचे स्थळ । न संडावे जळ ऐसे वाटे ॥११॥
बहेणि म्हणे पंचरात्री पंढरीस । केला आम्ही वास पुण्ययोगे ॥१२॥

९.
चैत्रपौर्णिमेस गेलो महादेवा । देव - यात्रा सर्वा पाहाविले ॥१॥
जाले समाधान देखोनी शंकर । मागे अभयकर भक्तियोगे ॥२॥
पंचरात्री तेथे क्रमोनिया जाण । सिंगणापूर स्थान तेथे आलो ॥३॥
कोरन्नीचे कण सहज मेळउ । तेणे सुखी जीउ होय माझा ॥४॥
अमृताचे परी वाटे गोड अन्न । पाप जळे जाण भक्षिलिया ॥५॥
बहेणि म्हणे माझे वय वर्ष नव । जाले आंतर्भाव सांगितला ॥६॥

१०.
भ्रतार विचारी सर्वास विचार । राहावया थार येथे नाही ॥१॥
ब्राह्मणाचे गावी जाउनी राहावे । ऐसे मनोभावे वाटतसे ॥२॥
रहेमतपुरी आहे ब्राह्मणसमुदाय । येथे वस्ती ठाय सर्व करू ॥३॥
बहेणि म्हणे पूर्व - प्राक्तनाचे योग । न सोडी स्थळ त्याग केलियाही ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP