|
अ.क्रि. बैठक मारणें . ढुंगण , गुडघा , घोटा इ० च्यावर टेंकणें . खालीं बूड टेंकणें ; उपविष्ट होणें ; बसक घेणें ; पंख आकुंचित करुन राहणें ; विश्रांतीसाठीं खालीं टेकणें ( पशु , पक्षी यानीं ). उद्योगधंदा , काम वगैरेशिवाय असणें ; रिकामटेकडा , निरुद्योगी असणें . फुकट वेळ घालविणें . खुर्ची इ० बैठकीवर अधिष्ठीत होणें . ( शब्दश : व ल० ) वर पडणें , असणें . अंगावर धूळ बसली . ( विशेषत : ल० ) एखाद्यास भारभूत होणें ; एखाद्यावर अवलंबून असणें . तळीं जाणें ; स्थिरावणें . खालावणें ; कमी होणें ( नदीचें , विहिरीचें पाणी ). बोथट होणें ( शस्त्राची धार ). स्थिरावणें ( एखाद्या मार्गांत , स्थितींत ); ( ल० ) रमणें . तदुपरि मग तीचें चित्त कोठें बसेना । - सारुह ३ . ५९ . स्थिरावणें ( पाऊस , उष्णता , ताप ). र्हास , अपकर्ष होणें ; खालावणें ; काढतें घेणें ; श्रेष्ठता गमाविणें ; वैभव कमी होणें . संवयीनें निष्णात किंवा तरबेज होणें ; अंत : प्रवेश होणें ( हाताचा , दुसर्या अवयवाचा , बुद्धीचा , ज्ञानाचा ); चांगलें समजणें . हें गाणें माझें बसलें . ( ल . ) अंगावर येणें ; पडणें . मार - खर्च - तोटा - बसला . योग्य होणें ; विवक्षितपणें जुळणें ; मिळणें ; पटणें ; जडणें ; बरोबर होणें ; लागू पडणें ( सांधेजोड , युक्ति , हिकमत , हिशेब ). खचणें ; बुडणें ; बिन किफायतीचा होणें ; नासणें ; तोटा येणें ( व्यापार , धंदा यांत ). घोगरा , बदसूर , खोल व अस्पष्ट होणें ; बिघडणें ( कंठ , गळा , घसा , आवाज ). स्थापित होणें ( अम्मल , सत्ता ). जोम , जोर मिळविणें ( पिकानें ). पार जाणें ; समूळ नाहींसें होणें . दबणें ; कमी होणें ; चेपणें ( गळूं ). आरंभ करणें . प्रमाण ठरणें . प्रहार लागू पडणें ; फटकारा लागणें ( चाबूक इ० चा ). [ सं . उपविश ; प्रा . उवइस , बइस ; फ्रें जि . बेश ; आर्मेजि . वेस ] म्ह० बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे = ज्याला कोठें व कसें बसावें हें कळतें त्याला ऊठ म्हणून कोण म्हणेल ? बसतां लाथ उठतां बुक्की , उठतां लाथ बसतां बुक्की - सर्वदा मार . बसलेघडीचा , बसलेल्या घडीचा - वि . पुष्कळ दिवस एकसारखा घडी घालून ठेवलेला व त्यामुळें कोरेपणा व झकपकपणा गेलेला कोरा ( कपडा ). याचे उलट ताण्याचा = कोराकरकरीत . [ बसणें + घडी ] बसले राहून - क्रिवि . बसून . महाराज खिडकींत नेहमीं बसले राहून दिवस मोजीत . - विक्षिप्त १ . १३१ . बसल्या महिना - वि . चाकरी न करितां दरमहाचा दरमहा मिळणारा ( पगार ). बसांत आणणें - सक्रि . स्वत : च्या ताब्यांत आणणें . दहाजणी मी बसांत आणिल्या प्रेमाचें पाजुन पाणी । - पला १४ . बसून आंतील टांग , बसून आंतील टांग मारणें - स्त्री . ( मल्लविद्या ) जोडीदारानें आपल्यास खालीं धरल्यास आपल्या एका हातानें जोडीदाराच्या कोपरावरुन हात घालून त्याचा हात घट्ट धरुन ज्या हातानें आपण जोडीदाराचा हात धरला असेल त्याच बाजूच्या आपल्या पायानें जोडीदारास वर ढकलून व त्याच्या हातास आपल्याकडे ओढून झटका देऊन त्यास चीत्त करणें . बसून बाहेरील टांग , बसून बाहेरील टांग मारणें - स्त्री . ( मल्लविद्या ) जोडीदारानें आपल्यास खालीं धरल्यास जोडीदाराच्या कोंपरावरुन आपला हात घालून त्या हातानें त्याचा हात घट्ट धरुन त्याच बाजूच्या आपल्या पायानें जोडीदाराच्या पिंडरीस बाहेरुन आपला पाय टेकून त्याच्या धरलेल्या हातास एकदम आंत झटका देऊन त्यास चीत करणें . ( टांग = गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा पायाचा भाग ). बसणें - न . बसण्यासाठीं पसरलेली , ठेवलेली कोणतीहि वस्तु ; बैठक . बसता - वि . बसण्याच्या उपयोगी ( घोडा , बैल इ० ).
|