मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
माधवकृत पदें

माधवकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
लागला तोबा, तोबा मज बाई ! हरि हर विठ्ठल रखुमाई ! ॥ध्रुवपद.॥
यात्रा भरली, भरली आषाढीची । स्वारी आली श्रीमंतांची ॥
दाटी जाली, जाली दुदाराची । तोबे उडति ठायीं ठायीं ॥लागला०॥१॥
दर्शन होय ना, होय ना देवाचें । देवळाभोंवता मी नाचें. ॥
पाय पाहिले, पाहिले रुक्मिणीचे । वदनीं नाम विठ्ठलाचें ॥लागला०॥२॥
माधव आत्मा, आत्मा सकळांचा । श्रुति गर्जती वेदवाचा ॥
करुणासिंधु, सिंधु भक्तांचा । हेत पुरवी जडजीवांचा. ॥लागला०॥३॥

पद २ रें
मानवा ! त्वां साधन केलें काय रे ! । चुकुनि आपला निजठाय रे ! ॥
भावें धरिं सद्गुरुपाय रे ! । तेणें चुकती अपाय रे ! ॥ध्रुवपद.॥
प्रथम साधन सज्जनाचा संग रे ! । विषयिं होशिल निःसंग रे ! ॥
व्यर्थ मायाजाळ जलतरंग रे ! । सांडुनि सेविं हरिरंग रे ! ॥मानवा०॥१॥
केव्हां मनीं धरशी अनूताप रे ! । तेणें चुकति त्रिविधताप रे ! ॥
ज्ञानाविना सर्व कर्म पाप रे ! । मनीं वळखें आपेआप रे ! ॥मानवा०॥२॥
सद्गुरुविना देह गांव वोस रे ! । जाण कैसा भव वोसरे ॥
भावें धरीं माधवाची कास रे ! । आतां न लावीं अवकाश रे ! ॥मानवा०॥३॥

पद ३ रें
माझ्या रामाला आण इकोणी जा गे ! ॥ध्रुवपद.॥
रुप सांवळें सकुमार बाई ! । खडे कंटक रुततील पायीं ।
कशी कैकयीला दया येत नाहीं नाहीं ॥माझ्या०॥१॥
कधीं न्हाणियलें नाहिं रघुनाथा । नाहिं स्नेहानें माखियला माथा ।
तें दुःख आठविलें राम वना जातां जातां ॥माझ्या०॥२॥
राम चालिला जीव झाला घाबरा । उभय नेत्रीं वाहती अश्रुधारा ।
रामावांचुनि नाहीं मला थारा थारा ॥माझ्या०॥३॥
कशी अंधाची हिरुन नेली काठी । कशी दुर्बळाचि सुटुन पडली गांठी ।
तैसें कैकयीनें केलें मला कष्टी कष्टी ॥माझ्या०॥४॥
पूर्वि पंक्तिसि केला असेल भेद । साधुसंतांसीं केला असेल वाद ।
म्हणुनि कैकयीनें केला मशीं रोध रोध ॥माझ्या०॥५॥
अखंड माधव ह्मणे शरण जावें कोणा । सद्गुरुवांचोनि नाहीं कोणी शहाणा ।
तो मज दाखविल आज रघूराणा राणा ॥माझ्या०॥६॥

पद ४ थें
चतुराकर नट हरी ।
झनननननन मुरली वाजवि प्रातःसमयो बरी. ॥ध्रुवपद.॥
अरुणोदय गगनीं ।
झगमग झगमग प्रकाश पडला उगवला तरणी ॥
गोपांगना मिळोनी ।
लगबग लगबग जागृत झाल्या दामोदरालागुनी ॥
चाल ॥ अजिंक्य सर्वेश्वरा ! । उठिं उठिं बा अजरंबरा ! ।
मुखमार्जन तुम्ही करा । भोजन करा गिरिधरा ! ॥
तोड ॥ टपटप टपटप धेनु सोडिती प्रभात फटकांवरी (?) ॥चतुरा०॥१॥
गोपीनाथ उठले ।
भंभंभंभं शंख वाजवित तेहतीस कोटी देव आले ॥
साधु संत मिळालें ।
धंधंधंधं देवकीचें भाग्य पाहतां भलें ॥
चाल ॥ अनंत रवि मुगुटीं । कस्तूरी लल्लाटीं ।
पंवच्या मनगटीं । मुद्रिका करबोटीं ॥
तोड ॥ चमचम चमचम चमके कानीं नागोत्र साजनी ॥चतुरा०॥२॥
देवादिकां कळेना ।
नटनट नटनट गाइ चारितो उभा वृंदावना ॥
ब्रह्मयाचा भुलवना ।
लुटुलुटु लुटुलुटु खेळे सौंगड्यांमध्यें रूप चीमणा ॥
चाल ॥ कुजा बुजा बोबडा । निपट अंग चीपडा ।
ढेरपोटा वांकडा । पोराचा जुंबाडा ॥
तोड ॥ थैथैथैथै नाचत कन्हैय्या गौळण आरती करी ॥चतुरा०॥३॥
प्रतिदिनिं द्वारावती ।
नित्य उठुनि दो प्रहरीं ..................... पुष्प वर्षती ॥
नारद तुंबर गाती ।
धिमिकिति धिमिकिति टाळ मृदंग गीत गोविंद गाती ॥
चाल ॥ नाचति नृत्यांगना । ऋषि करिती कीर्तना ।
तुह्मी राधा माधव म्हणा । नित्य सांगतों जना ॥
तोड ॥ गुरुपदीं बा ................. राम त्रिवर्ग एक अक्षरी ॥चतुरा०॥४॥

पद ५ वें
प्रीति धरीं हरिपायीं मना रे ! ॥ध्रुवपद.॥
या नरदेहीं सार्थक हेंची । संतसमागमीं राहीं । मना रे ! ॥प्रीति०॥१॥
चंचल हे गति सोडुनि देईं । स्वरुपीं निश्चल राहीं । मना रे ! ॥प्रीति०॥२॥
माधवस्मरणीं सुखरूप होसी । न शिरे अन्य उपाईं । मना रे ! ॥प्रीति०॥३॥

पद ६ वें
विठाबाई माय माझी पंढरीची । दयाळू बहुत अंतरींची ॥ध्रुवपद.॥
नामदेवाची प्रीति भारी । भोजना बैसे बरोबरी ।
दासी जनीचें काम करी । निजगुज बोलतसे द्वारीं ।
पाहेना जाती उंच नीची. ॥विठाबाई०॥१॥
धान्य लुटविता दामाजी । धन्याची झाली इतराजी ।
तेथें न चले कोणाची अर्जीं । झाली बहुतचि बेमर्जी ।
रसीद पोंचवी वेदराची ॥विठाबाई०॥२॥
चोख्या महार नाई सेना । कबीर कमाल मोमीन ।
ब्रीद उडतां जेठागण (?) । नरहरि आवडिला मन ।
भरली हुंडी मेहत्याची ॥विठाबाई०॥३॥
माधव आत्मा भक्ताचा । दास्य करी निजदासांचा ।
शेत पेरिलें बोधल्याचें । भुलोनी निजकीर्तनीं नाचे ।
आवडी असे बहु प्रेमाची ॥विठाबाई०॥४॥

पद ७ वें
विठोबा नारायण हरी ! । भय भजकांचें हरीं. ॥ध्रुवपद.॥
शंकर महाराज योगी । स्मशानवासी वितरागी ।
चर्चिलें चिताभस्म आंगीं । गिरिजा शोभे अर्धांगीं ।
तो हा हृदयीं ध्यान धरीं. ॥विठोबा०॥१॥
ब्रह्मस्वरूप जरि झालें । घालुनि षड्रिपुवरि घाले ।
बोध सुरसाचे प्याले । सनत्कुमारादिक धाले ।
शुक मुखीं कीर्ती उच्चारी. ॥विठोबा०॥२॥
माधव आत्मा गुणरासी । भुलला प्रेमळ भजनासी ।
प्रगटे स्वसगुण स्वरुपासी । तो हा पंढरपुरवासी ।
अनाथावरि कृपा करी ॥विठोबा०॥३॥

पद ८ वें
रामकृष्ण नरहरी, विठोबा रामक्रुष्ण नरहरी ।
कधिं रे ! कधिं रे ! कधिं रे ! डोळां दाखविसिल पंढरी. ॥ध्रुवपद.॥
प्रपंच पसरे कसा, विठोबा ! प्रपंच पसरे कसा ।
वनीं वाघुरें पसरि पारधी पिसे चिलकडे तसा ॥
ह्मणती कोणि न बसा, विठोबा ! म्हणती कोणि न बसा ।
कुटुंबपरिवाराचे साठीं कुजनीं पसरी पसा ॥
वाहलों मी भवपुरीं, विठोबा ! वाहलों मी भवपुरीं. ॥कधिं०॥१॥
भवाब्धि बुडवी मला, विठोबा ! भवाब्धि बुडवी मला ।
तुजवांचुनियां तारक न दिसे धांव, लौकरी चला ॥
काळमगर पातला, विठोबा ! काळमगर पातला ।
उडि घालुनि ओढितसे मजला बहुतचि दिसतो भला ॥
पडुनि राहिलों घरीं, विठोबा ! पडुनि राहिलों घरीं. ॥कधिं०॥२॥
माधव आत्मा खरा, विठोबा ! माधव आत्मा खरा ।
मी तों पतित पातकी आहें वरिवरि दिसतों बरा ॥
दिसे स्वहित तें करा, विठोबा ! दिसे स्वहित तें करा ।
पतीतपावन ब्रिदावळी हे संतत हृदयीं धरा ॥
वाहलों मी भवसरीं, विठोबा ! वाहलों मी भवसरीं. ॥कधिं०॥३॥

पद ९ वें
यदुराज सखा रुसला आतां तो कैसा समझे ॥ध्रुवपद.॥
प्रेमसुधारस सेविति याहुनी । गोरस आवडीला हरीला ॥यदुराज०॥१॥
मेळवुनि अबला सबळा आणि श्रीपति । बांधियला उखळा ॥यदुराज०॥२॥
माधव सद्गुरु लाविन ईक्षण । कां हृदयींहुन त्यजिला ॥यदुराज०॥३॥

पद १० वें
यदुपती गोवळरूप धरितो भक्तजनांस्तव ॥ध्रुवपद.॥
वसुदेव देवकिच्या जन्मोनि उदरीं । ह्मणवी नंदकिशोर हरी तो ॥यदु०॥१॥
नंद यशोदा पाववि मोदा । गोपीमानसचोर धरीतो ॥यदु०॥२॥
मारुनि मामा ने निजधामा । यादवकुळीं तिळपोर धरीतो ॥यदु०॥३॥
माधव रे ! तो तारिल तुजला । वारिल हा भव घोर हरी तो ॥यदु०॥४॥

पद ११ वें
कशि मथुरेसी जाऊं पदरीं । झोंबतो हरि लाज न धरी सये ! ॥ध्रुवपद.॥
नंद न यातें मंद निवारी । मस्करी गरतीची करितो सये ! ॥कशि०॥१॥
वाट न सोडी बाट मुरारी । चुंबितो झगडोनि अधरिं सये ! ॥कशि०॥२॥
माधव आत्मा त्रिजगाचा तूं । चला जाऊं रघुनाथनगरीं सये ॥कशि०॥३॥

पद १२ वें
वदनीं वदाल कृष्ण जरी तो । कीर्तनीं अघ सर्व हरी तो ॥ध्रुवपद.॥
अर्जुना रथीं झाला सारथी । अश्वाचे करीं दोर धरीतो ॥वदनीं०॥१॥
कुब्जादासी कंसगृहींची । पाहुनि भाव तिसीं धरितो ॥वदनीं०॥२॥
माधव राघवनामस्मरणीं । संसृतिभय दूर करितो ॥वदनीं०॥३॥

पद १३ वें
आला हरि मनमंदिरीं । आतां तो जाइल कसा ॥ध्रुवपद.॥
बोधरुपें हा फारचि भुलला । बसला जैसा पिसा ॥आला०॥१॥
शांतिविटेवर बसणें जाणें । केला पंढरिवसा ॥आला०॥२॥
माधव म्हणे गुरुकृपेचा । घालुन बळकट फांसा ॥आला०॥३॥

पद १४ वें
मुद्रिके सखे ! त्वां कां त्यजिलें रामाशी ॥ध्रुवपद.॥
पंचवटींत होतों तिघे सुखाच्या योगें ।
सुवर्णमृगाच्या पाठीं धाडिले दोघे ।
दशकंठ हरीता झाला झडकरि वेगें ।
चोरुनि मला घेवोनि निघाला संगें ॥
चाल ॥ जटायुनें युद्ध केलें । मुद्रिके ! ।
ते प्राणाशि आपुल्या गेले । मुद्रिके ! ।
ऋष्यमूकावरुनि मजला आणलें । मुद्रिके ! ।
अशोकीं मला ठेविलें । मुद्रिके ! ।
तोड ॥ हे त्रिजटा राक्षसी ठेवियली मजपाशीं ॥मुद्रिके०॥१॥
अवचित हातांत पडलें सखये बाई ! ।
मोकळले रामलक्ष्मण कवणे ठाईं ।
घडीभर धीर धरवेना करुं मी काई ।
मज दाखीव रघुरामाचे पाई ॥
चाल ॥ किंवा संन्याशी झाले । मुद्रिके ! ।
श्रीराम कोणीकडे केले । मुद्रिके ! ।
किंवा त्यांना व्याघ्रें वधिलें । मुद्रिके ! ।
............................... । मुद्रिके ! ।
तोड ॥ दैत्य दुर्मती घेउनि गेले त्यांशी ॥मुद्रिके०॥२॥
मुद्रिके सखे ! तूं रामाचे करिंची ।
आज कशि आलिस या ठाईं अंतरिंची ।
कोठें राम लक्ष्मण सांग सुद वो त्यांची ।
मज मोठी आवड त्यांचे भेटीची ॥
चाल ॥ आज कशी आलिस या ठाया । मुद्रिके ! ।
सोडोनि दिलें रघुराया । मुद्रिके ! ।
धन्य धन्य गे ! माझे सखये ! । मुद्रिके ! ।
..................................... । मुद्रिके ! ।
तोड ॥ धाडिलें तुज मज पाहावया अशोक वनाशी ॥मुद्रिके०॥३॥
कीं राम वनामधें फिरत असेल मजसाठीं ।
साबरी धरी डोंगर कवटाळुन पोटीं ।
कीं माझी गे ! रघुरायाला आवड मोठी ।
मग तोडी कुरळे केश जानकी झोटी ॥
चाल ॥ घे प्राण माझे सत वती । मुद्रिके ! ।
मग चरणीं लागे मारुती । मुद्रिके ! ।
त्याशि बोले सीता सती । मुद्रिके ! ।
.......................................... । मुद्रिके ! ।
तोड ॥ माधव करी विनंती श्रीरामाशी ॥मुद्रिके०॥४॥

पद १५ वें
क्यों करता मगरूरी काफर । भजता क्यों नही रामधनी. ॥ध्रुवपद.॥
रामनाम जप उलटा । वाल भये वाल्मीकिमुनी. ॥क्यों०॥१॥
जब सागरमे पथर तर गये । बंदर अठराक्षोणी. ॥क्यों०॥२॥
शूर्पनखा और कुंभकर्णसो । शिगयेस्तक भयो कर्दमुनी. ॥क्यों०॥३॥
खरदूषण और त्रीसुरा अहिमहि । रावणकी क्या रहि बनी. ॥क्यों०॥४॥
किष्किंधदेशका राज गमाया । भई वालीकी धूरधुनी. ॥क्यों०॥५॥
घरघर भिक्षा मागे भर्तृहरी । महालमुलख सब त्यज रानी. ॥क्यों०॥६॥
गोपीचंद सोळासौ रानी । छड मंदिर है सातखणी. ॥क्यों०॥७॥
अमना हिसाब हिसाब करले । अखंड माधव कर्दमुनी. ॥क्यों०॥८॥

पद १६ वें
प्रातःसमय रघुबीर जगावें कौसल्या महतारी ।
उठो लालजी ! भोर भयो है संतनको हितकारी ॥ध्रुवपद.॥
बंदीजन गंधर्व गुण गावे नाचे थै थै तारी ।
शैलसुता शिव द्वारे ठाडे होत कोलाहल भारी ॥उठो०॥१॥
सुरनरमुनिब्रह्मादि देवता सनकादिक ऋषि, चारी ।
बेदबानीविप्र जस गावे रघुकुल जस बिस्तारी ॥उठो०॥२॥
सुन प्रिय बचन उठे रघुनंदन नैनन पलख उधारी ।
चीतवन अभय देत भक्तनको मुक्त भए नरनारी ॥उठो०॥३॥
भरत छत्रुघन छत्र चवर लिये जनकसुता लियो झारी ।
मेवा पान लियो कर लछीमन भर कंचनकी थारी ॥उठो०॥४॥
कर अस्नान दान नृप दिन्हे गो गज कंचन भारी ।
जयजयकार करत धन्य माधव रघुकुल जस बिस्तासी ॥उठो०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP