मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
शिवदासतनयकृत पद

शिवदासतनयकृत पद

अनेककविकृत पदें.


धांवे पावे गा श्रीहरी ! विनवि सुंदरी द्रौपदी कुमरी यादवराया ।
कौरवसभेंत गांजिती पांडवजाया ॥ध्रुवपद.॥
अजातशत्रु नृप धर्म जाणुनि अधर्म खेळुनी द्यूत सर्वस्व हारवित ।
सह राज्य द्रव्य कुंजर अश्वासहित ॥
दुर्बुद्धि खळ दुर्योधन शकुनि कर्ण सभेसि बैसत ।
आणविली मग सभेंत द्रौपदी मात ॥
द्रोणादिक भीष्म श्रेष्ठ विदुर धृतराष्ट्र मुनि वरिष्ठ सभेसी असतां ।
कोणाची मती न चाले उगेची बसत ॥
चाल ॥ द्रोपदी म्हणे, ‘ भगवंता ! रक्षीं या दुष्ट समया ।
अनाथनाथ दिनबंधु धांवे पांडवसखया ! ।
कौरव गांजिती मजला नेणसी का यादवराया ! ।
भक्तकाजकैवारी ! ये लौकरी धाउनियां ॥
उठाव ॥ आगमगुणसागरा ! पाव श्रीधरा श्यामसुंदरा केशवराया ! ।
ऋषिमनुजन विहारा कमळाप्रिया ! ’ ॥धांव०॥१॥
कौरवसभा घनदाट बैसले श्रेष्ठ महावरिष्ठ दुर्जन सकळ ।
सभेसी पाणुनि गांजिती द्रौपदी बाळ
पांचाळिस अवलोकून म्हणे सुयोधन, ‘ तुज हरून बैसले निखळ ।
पांडव पाहे तूं दीन महादुर्बळ ॥
आझुनि काय पाहसी ? बैस मांडिसी, नाहिं तर दासी होसिल सकळ ।
जाणोनि मान्य करि बोलिलों हें सकळ. ’ ॥
चाल ॥ ऐकुन दुष्ट वचनासी द्रौपदी, ‘ म्हणे नष्टा !
भीमगदा बैसे तव अंकीं पाहे तूं पापिष्ठा ! ।
उन्मत्ता ! वदसि हें वाक्य ऐकसी नृपश्रेष्ठा ! ।
तव स्त्रिया दासि होतील जेव्हां पांडव बळकटा, ॥
उठाव ॥ ऐकुनि वचन स्पष्ट सुयोधन नष्ट बोले क्रोधाविष्ट दुःशासनाला, ।
‘ फेडीं इचें वस्त्र सभेसी म्हुन बोलिला. ’ ॥धांवे०॥२॥
ऐकुनि खळ दुःशासन उठे हांसून करि धरिं वसन द्रौपदीसतिचें ।
पाहोनि चकित भीष्मद्रोणादिक महामतिचे ॥
द्रौपदी म्हणे, ‘ जगदीशा ! माझी हे दशा पाहसी कशा निश्चयें मनींचे ।
प्राणांत जाहलिया प्रेत पाहासि भगिनीचें. ’ ॥
ऐकुनि करुणावचन उठे जगजिवन त्वरें येऊन पांचाळीचे, ।
‘ पृष्ठीसी उभा मी भय न धरीं कवणाचें. ’
चाल ॥ ऐकुनि अभववचनासी द्रौपदी फिरून पाहे ।
स्वयं शंखचक्र आयुधें चौकरीं शोभताहे ।
आरक्त नेत्र करुनियां कौरवाकडे पाहे ।
भीष्मद्रोणविदुरासी प्रत्यक्ष दिसताहे ॥
उठाव ॥ ते, म्हणती, ‘ दुर्योधना ! खळा दुर्जना ! ऐक वचना श्रेष्ठ मान्याचे ।
अपमान न करी, ’ म्हणतां नाइके कवणाचें ॥धांव०॥३॥
दुर्बुद्धि पती दुःशासन स्वहस्तें करून फेडी बहु वसन अनेका परिचें ।
सेंदरी खांबाईत नव रंग कळस बुट्याचे ॥
मंदील सुरंग चौघडी बुटा चुनवडी वेल वांकडी पातळ जरिचें ।
पैठनि रंगाईत आंत बहु मोलाचें ॥
ममईचे हिरवे जोट शिलारेथेट साडी रुद्रघाट रेशिम धडिचे ।
अलकापुरि पाटा उथेर बुट्याचें ॥
चाल ॥ सोनेरि रुपेरी रंग साड्या बहु विचित्र ।
धेनुवत्समनुष्याकार रंगिव बहु चित्र ।
ताम्र नीलपीतवर्ण द्विपांवर पवित्र ।
नवखंडाची रचना चित्र पवित्र महाक्षेत्र ॥
उठाव ॥ ऐशा परि वसन हरिनें निर्मुन नेसवि आपण अनंत हस्तें ।
पाहोनि चकित दुःशासन काय करिल दो हस्तें ॥धांवे०॥४॥
अनेक वस्त्र फेडितां बहु निर्मिता पाहे अनंत क्रोधयुक्त ।
नेसवी पितांबर चक्र धरणि सहित ॥
प्रकाश बहु घनदाट सभा वरिष्ठ होते पापिष्ठ मूर्च्छित पडत ।
भीष्मद्रोणविदुरादिक हरिस नमित ॥
निरसलें विघ्न बहुत दुष्ट उन्मत्त अधोमुख पाहत ।
उगेचि बसत पांडव कृष्ण द्रोपदी तेथुनि निघत ॥
चाल ॥ आनंद फार देवांसि सुमनांचि वृष्टि करिती ।
संतोष सधुसज्जना ‘ जय जय ’ शब्द वदती ।
आनंदें पांडव म्हणती, ‘ रक्षिलें त्वां यदुपती ! ’ ।
द्रौपदी म्हणे, ‘ भगवंता ! रक्षिलें ये क्षिती. ’ ॥
उठाव ॥ हे सभेची कथा कोणी ऐकतां निरसि भवव्यथा तारिल भगवंत ।
शिवदासतनय हरिचे चरण वंदित ॥धांवे०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP