वासुदेवस्वामीकृत पदें
अनेककविकृत पदें.
पद १ लें
विसरशी प्रियतम हरितें काई ।
प्रकाशुनी जडजगासी स्फुरतसे सबाहीं ॥ध्रुवपद.॥
देहद्वयजड अवस्थात्रयाहि । पर जो चिदात्मा ।
शोधुनि जाणुनि अहंकृति पर त्या ॥विसरशी०॥१॥
बुद्धिप्रकाशक ब्रह्मांडकोटिच्या । सम जो तरंगी ।
स्वयें चिदार्णव खुणेसी या पावोनी ॥विसरशी०॥२॥
पूर्ण संस्कारें जे जे वृत्ति उठे । सर्वही हरी ।
तो जाणूनी तूं भक्त भक्तितत्व पर हें ॥विसरशी०॥३॥
पद २ रें
आत्मस्मृतिधारणेनें करितां श्रीहरिध्यान ।
रज तम नासुनि बाणे चित्ता । स्वरूपीं समधान ॥ध्रुवपद.॥
वृत्ति सबाहीं वृत्तिप्रकाशक ।
आपणचि आहे ऐशी बरी । बाणे स्पष्ट खूण ॥आत्म०॥१॥
अनेक एकची भासतसे स्वयें ।
हाहि अनुभव गिळोनि सुस्थिर राहे परिपूर्ण ॥आत्म०॥२॥
लागुनि हे स्थिती लाभ भक्तीचा ।
सर्ववासुदेवीं पाहें भक्त सुप्रवीण ॥आत्म०॥३॥
पद ३ रें
श्रीहरिभजनीं स्वहित आपुलें ।
जाणुनियां भक्ति नवरसीं चित्त लाविलें ॥ध्रुवपद.॥
अहंममतास्पद दुःखपरिग्रह ।
टाकुनियां गुरुपदीं सर्वस्वही अर्पिलें ॥श्रीहरि०॥१॥
जडव्यतिरेकें आत्मतंतू वळखूनी ।
विश्वपटबाह्यांतरीं आपणासि पाहिलें ॥श्रीहरि०॥२॥
पूर्णब्रह्म हरी आत्मा आपणची ।
देवभक्तपणीं जेथें भिन्नत्व न राहिलें ॥श्रीहरि०॥३॥
पद ४ थें
हरि आदि अंतिं एक हा ।
मध्येंच अनेकत्वें कल्पोनियां दावी ॥ध्रुवपद.॥
जड निषेधोनि आधीं । जाणें आपआपणा ।
त्यासि सच्चित्सुख सर्वचि हें ॥हरि०॥१॥
सत्ता मात्र आपनची । हेमीं नग तैसें जग ।
नसोनि भासत योगेश्वर हें ॥हरि०॥२॥
ऐशा अनुभवें भक्त । सर्वां भूतीं पाहे भक्ती ।
सर्व वासुदेव आपणची हें ॥हरि०॥३॥
पद ५ वें
कृष्ण वासुदेव विष्णु मुररिपो ! ।
असत्कथा त्यजुनि वदन नाम हें जपो ॥ध्रुवपद.॥
हरि ! तुझ्या रूपीं चित्त हें जडो ।
विषय इंद्रिय योग भोग कांहीं नावडो ॥कृष्ण०॥१॥
स्मृतिविघातक काम हा बळी ।
स्थळ स्थळीं तोष रोष उठवुनी छळी ॥कृष्ण०॥२॥
अगण्यापराधपतितही परी ।
स्मरुनी ब्रिदा पाहि त्राहि कृपानिधे हरी ! ॥कृष्ण०॥३॥
बुद्धिहीन शुद्ध भावही नसे ।
असुनि क्लिष्ट शिष्ट ह्मणविं परी तुझा असें ॥कृष्ण०॥४॥
कसा तरि तुझा म्हणवितों खरा ।
करुनि भक्त सक्त चरणिं तारिं मावरा ! ॥कृष्ण०॥५॥
पद ६ वें
आत्मा श्रीहरी वरा । प्रिय मोठा । देहपणें वटतसे ।
भ्रांतिसी टाकुनियां । भव हा तरा पार ॥ध्रुवपद.॥
स्वजन सदन वरजावें । सत्संगति मन भावें । निचसेवे अंग भरवावें ।
श्रेय परम पुसावें । या देहीं जें सार ॥आत्मा०॥१॥
कृपादृष्टि अवलोकिती । अविद्या आवरण भंगिती । जड निरसुनि तत्व बोधिती ।
तोचि तंतू जडीं दाविती । विश्वपटाकार ॥आत्मा०॥२॥
हरि गुरुकृपें खुण पावले । साधनीं पूर्ण स्थिरावले । देवभक्तपणा नवाइले ।
वासुदेव सर्व सबाहिले । भक्ति अपारावार ॥आत्मा०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 18, 2017
TOP