पद १ लें
सगुण सांवळें ध्यान विठूचें झणीं गेलें भरून ।
गुरुनें दिधलें हातीं धरून ॥ध्रुवपद.॥
मस्तकीं मुकुट झळाले कुरळे केश पाठीवरी ।
कपाळीं भव्य गंध केशरी ॥
सुप्रसन्न सुख मुख हे नासाग्रदृष्टि बरी ।
भोंवया सुरेख शोभा वरी ॥
कानिं कुंदलें तेज फांकलें अंबर गेलें भरून ॥गुरुनें०॥१॥
वैजयंतिमाळ आपाद तुळशीमाळ गळां ।
कांसे पीतांबर पिंवळा ॥
ठेवुनि कटिं कर उभा नीट घनश्याम सांवळा ।
दंडीं बाजूबंद पवच्या वेळा ॥
हिरे पांच मोत्यांच्या माळा रुळती हृदयीं वरून ॥गुरुनें०॥२॥
संतसभा धनदारचाट बहु याची अपरंपार ।
भीमातीरीं पताकांचें भार ॥
टाळ विणा पखवाज ढोल बहु वाजति अतिसुस्वर ।
भक्तजन करिती जयजयकार ॥
नरहरिसद्गुरुभजनीं महिपति निश्चय जाइल तरून ॥गुरुनें०॥३॥
पद २ रें
कां उगाच फिरसी बा रे ! समज नाहीं कां रे ! पिउनियां वारें !
भ्रमामधें भुलसी ।
जा शरण सद्गुरूपायिं सहज भव तरसी ॥ध्रुवपद.॥
कोणि नाहीं कोणाचा सखा, बाप हा काका, ताई आका, रडत रहातिल कीं ।
बांधोनि यमाचें हातीं तुला देतिल कीं ॥
.......................................................................।
मारिती आरोळ्या तेव्हां हृदय फाटेल कीं ॥
चाल ॥ बाईल धनिल पैशाची, मारि हाका ।
तिला गरज नसे पुरुषाची, मारि हाका ॥
काढी मांडी हळुच उशाची, मारि हाका ।
उर बदविते तमाशाची, मारि हाका ॥
उठाव ॥ कसें करूं, कसा धिर धरूं, लहान लेंकरूं, याला कोण पोशी ॥जा शरण०॥१॥
मातापित्यासि दुःख रोकडें, विसर ना पडती, शोक बहु करिती ।
‘ कडकडोनि विज कसी पडली अंगावरती ॥
जालों अनाथ कीं आज दीन, पुत्राविण शून्य निपुत्रिक म्हणती ।
ईश्वरीं क्षोभ जाहला कोण गति पुढती ’ ॥
चाल ॥ रडे सासुसासरा पाहीं, खळखळां ।
रडे बहीण आत्याबाई, खळखळां ।
.................................................. ।
रडे कन्या सुत जांवाई, खळखळां ॥
उठाव ॥ अवघे रडत राहती, यमदुत येती, तुला बा ! नेती, काय मग करसी ॥जा शरण०॥२॥
यातना यमाच्या होती, जिवा दुःख देती, मारतील पाहीं ।
लोहस्तंभावरि कवळविती बांधुनि बाही ॥
लोहदंड मारतिल मार, शस्त्र अनिवार, टोंचिती डोई ।
ह्या तत्पभूमिवर लोळविती बांधुन करही ॥
चाल ॥ दारुणी सर्प सर्वांगीं डसविती ।
लोहशूळावरी नेउनि बसविती ॥
अघोर नरकीं नेऊनि बुडविती ।
नेत्रास काग लावुनि टोंचिती ॥
उठाव ॥ कोणी तेल तावुनि कडकडित, ओति जळजळित, तेव्हां मग पळत पळत बा ! । फिरसी ॥जा शरण०॥३॥
यापरी तुला गांजिती, दूत रडविती, तेव्हां कोण गति, दुःख वाटेल कीं ।
मारिसी आरोळ्या तेव्हां हृदय फाटेल कीं ॥
करिं अशांत उमजोनि त्वरा, शरण गुरुवरा, जाउनि पाय धरा, सर्व सांडुनि कीं ।
कल्पनामोड हा समुळ टाक उपडुन कीं ॥
चाल ॥ सार्थक आपुलें जन्माचें, कर कांहीं ।
तूं भजनपूजन श्रीहरिचें, कर कांहीं ॥
सोपें साधन मुक्तीचें, कर कांहीं ।
साधुसंतांचें दर्शन घे, कर कांहीं ॥
उठाव ॥ महिपति म्हणे तुजवरी, नाथ नरहरी, दया जरि करी, सोय काय धरसी ॥जा शरण०॥४॥
पद ३ रें
क्षमा करीं अपराध सख्या रे ! किति तरी विनवूं तुला ।
दे भेट विठोबा ! मला ॥ध्रुवपद.॥
दामाजीनें धान्य लुटविलें वांचविली पंढरी ।
त्याचा भार वाहे शिरीं ॥
जाउनियां बेदरासि यवनालागीं मजुरा करी ।
त्याला काय म्हणावें तरी ॥
भक्तजनाची माय कृपाळू कळवळ आली तुला ॥दे भेट०॥१॥
स्तंभीं बांधुनि गृहीं टाकिलें विचार केला नाहीं ।
गेली यात्रेला सखुबाई ॥
तिच्या पतीची सेवा केली बसुनि पलंगीं पायीं ।
तुझे अंगीं देवपण नाहीं ॥
सखू आण ग ! पाणी सासु घागर देई तुला ॥दे भेट०॥२॥
जनाबाईनें दळण दळाया तुज कैसें लाविलें ।
त्वां न्हाउं कसें घातलें ॥
एकांतीं बैसुनि प्रीतिनें उच्छिष्ट त्यां भक्षिलें ।
तें तुझें प्रकट कोणें नेलें ॥
वाखळ पांघरुनि उभा राहसी शोभा आली तुला ॥दे भेट०॥३॥
राधाबाई कोण निघाली सुईण ते होऊन ।
कसें केलें बाळंतपण ॥
दास नरहरी म्हणे महिपती लिन झाल्यावांचुन ।
तुला दयाळ म्हणेल कोण ॥
संतांघरचें काम करितां कळवळ आली तुला ॥दे भेट०॥४॥
पद ४ थें
पाहतां पाहतां धरम बुडाला अधर्म झाला चहुंकडे ।
जिकडे तिकडे कली मातला कठिण काळ हा आला पुढें ॥ध्रुवपद.॥
दाव्याचे धरिं दरिद्र आलें, कृपण धनाढ्य झाले कीं ।
पापि चिरायु, पुण्यशील ते आल्पायुषीगेले कीं ॥
सत्कर्माचा लोप झाला, दुष्कर्मीं जन भुलले कीं ।
स्वधर्म सांडुनि अधर्म वाटे कैसें कलियुग आलें कीं ॥
पातकाचे डोंगर दिसती पुण्यलेश ना दृष्टि पडे ॥जिकडे०॥१॥
ब्राह्मण अनाचारी झाले, शूद्राचार करतिल कीं ।
आसन घालुनि प्राणायामें उघडे करीत बसतिल कीं ॥
देवतार्चन गीतापठणहि सदा सोंवळे राहतिल कीं ।
हस्त जोडुनी उभे विप्र हे करितिल त्यांस विनंती कीं ॥
अस्नात हो ! सुस्नात पाहुनी तो विधाता मनीं रडे ॥जिकडे०॥२॥
शास्त्रि पुराणिक वैदिक पंडित व्याज दुहोत्रा घेतिल कीं ।
गृहस्थ बेरोजगारी बसले खुशाल शेती करतिल कीं ॥
तरवार बांधुनि शिपाइ झाले हातांत भाले घेतिल कीं ।
कन्याविक्रय करूं लागले कैक पोटें भरतिल कीं ॥
जारकर्मी झाल्या गर्ती, वेश्या बसल्या एकिकडे ॥जिकडे०॥३॥
पुत्र पित्याचा द्वेष करितो, कांता पतीस मानीना ।
मायलेकिंचें भांडण होतें, सासूवर जिव देति सुना ॥
गुरु शिष्याचा प्राण घेतो, शिष्य गुरूंकडे पाहेना ।
बंधुबंधुसीं वैर चाललें, बहिण भावासीं बोलेना ॥
सेवक स्वामिसि मारुं पाहतो, स्वामिसेवकां वैर पडे ॥जिकडे०॥४॥
कीर्तनसमयीं निद्रा येती, नाचामध्यें दंग पडे ।
साधुसंतांसी दृष्टिस पाहतां कपाळासि तें पित्त चढे ॥
नामस्मरणीं वाचा बसली, विषयीं गाणें चित्तिं जडे ।
नरहरिसद्गुरुभजनीं महिपति जडला हा मज समज पडे ॥
कड कड कड कड वाजवि टाळी उगाच पाहतो तोंडाकडे ॥जिकडे०॥५॥