मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
माणिकप्रभुकृत पदें

माणिकप्रभुकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
गणराजपायीं मन जडो जडो ॥ध्रुवपद.॥
वेदभुजांगी सेंदुरचर्जित । मोदक भक्षित भडभड ॥गण०॥१॥
पीतांबर जरी वरि फणिवेष्टित । फरशांकुशा करि थडथड ॥गण०॥२॥
माणिक म्हणे प्रभु मंदमुक्याचे । वाचे बोलवी घडघड ॥गण०॥३॥

पद २ लें
साजणी ! गुरुनें कौतुक केलें ॥ध्रुवपद.॥
बसवुनि सन्मुख सांगुनि गोष्टी । हात धरुनि मंदिरांतचि नेलें ॥साजणी०॥१॥
‘ तत्त्वमसि ’ महावाक्य निरोपणी । द्वैतरहित अद्वैतची ठेलें ॥साजणी०॥२॥
माणिक म्हणे सद्गुरू कर्णोदयी । मीपण अंधकारची नेलें ॥साजणी०॥३॥

पद ३ रें
समज मूढा ! गुरुविण तुज गति नाहीं ॥ध्रुवपद.॥
योग यागविधी येणें नोहे सिद्धी । व्यर्थचि खटपट पाही ॥समज०॥१॥
हिंडोनि देशोदेशिं कोटि तीर्थवासी । शिणशी तूं नाना उपायीं ॥समज०॥२॥
सांगतसे माणिक करूं नको आणिक । लाग तूं सद्गुरुपायीं ॥सहज०॥३॥

पद ४ थें
मना रे ! किती शिकवुं तुजला लाग जा गुरुच्या पदा ॥ध्रुवपद.॥
सत्संगतिचा लाभ हा एवढा । घडतसे तीर्थ सदा ॥मना०॥१॥
सद्गुरु स्मरतां पातक भस्मची । बाधिला करि आपदा ॥मना०॥२॥
माणिक म्हणे सद्गुरुचे कृपेनें । छळिना काळ कदा ॥मना०॥३॥

पद ५ वें
धरिले गे ! माय ! । सद्गुरुचे पाय ।
मीपण जेथें समूळ गेलें तूंपण कैचें काय ? ॥१॥
कार्याकारण भाव । तोही झाला वाव ।
त्रिविध महावाक्य याचा करिता अनुभव ॥२॥
शबलेंद्रिय गेलें । शुद्धपण आलें ।
असिपद तेंही तेथें समूळ मिथ्या झालें ॥३॥
सर्वात्मक एक । सद्गुरूपायीं देख ।
माणिक म्हणे गुरु शिष्य याचा नसे धाक ॥४॥

पद ६ वें
साष्टांग प्रणिपात तया माझा गे ! । कोण असेल ऐसा गुरुराजा गे ! ॥ध्रुवपद.॥
शाश्वत पद जाणुनि बोले । प्रेमें आनंदे लहरी डोले ॥साष्टांग०॥१॥
मीतुपण जो द्वैतचि नेणे । सकलहि जग ब्रह्मचि जाणे ॥साष्टांग०॥२॥
दर्शन इच्छिति देव जयाला । माणिका नण्य शरण तयाला ॥साष्टांग०॥३॥

पद ७ वें
गुरुजी ! मज ब्रह्मचि केलें । उडवूनियां जिव भाव ॥ध्रुवपद.॥
जागृति स्वप्न सुषुप्तिसि वारूनी । तुर्याचे दाविले ठाव ॥गुरुजी०॥१॥
जिवशिवपण हे भ्रांतिसि निरसुनि । द्वैताविण स्वयमेव ॥गुरुजी०॥२॥
माणिक म्हणे पूर्ण ब्रह्म मी एकची । मीपण मजठायीं वाव ॥गुरुजी०॥३॥

पद ८ वें
म्हणउनि बरें झालें बरें झालें । सद्गुरुला शरण रिघालें ॥ध्रुवपद.॥
देहिं असतां मुक्ति । हरली जन्ममरणभ्रांती ॥म्हण०॥१॥
‘ तत्त्वमसि ’ इति वाक्य । जेणें जिव शिव झालें ऐक्य ॥म्हण०॥२॥
माणिक म्हणे जग सरलें । पूर्ण ब्रह्म एकचि उरलें ॥म्हण०॥३॥

पद ९ वें
धांव सखे ! गुरुदत्त ! माउली ! ॥ध्रुवपद.॥
हंबरोनि तुज पाडस बाहेर । येउनि पाजवी पान्हाघाउली ॥धांव०॥१॥
त्रिविध ताप तापतसे उन्हाळीं । येउनि धरी तूं कृपेची साउली ॥धांव०॥२॥
माणिक म्हणे प्रभु ! येइं तुं लौकरी । लागलेंसे मन तुझिया पाउलीं ॥धांव०॥३॥

पद १० वें
करुणाकर दीनवत्सल दत्ता ! । सत्वर धांवुनि येई रे ! ॥ध्रुवपद.॥
तुझें निजरूप पहावें वाटे । म्हणोनि मन अवलोकि दिशा दाही रे ! ॥करुणा०॥१॥
भवसिंधुसी पार कराया । तुजविण आणिक नाहीं रे ! ॥करुणा०॥२॥
दास माणिकाची हेचि विनंति । ठेवींमज निजपायीं रे ! ॥करुणा०॥३॥

पद ११ वें
दत्तासी गाईन । दत्तासी पाहीन । वाहीन हें मन । दत्तापायीं ॥ध्रुवपद.॥
दत्त स्वयंरूप । दत्त मायबाप । माझे त्रिविधताप । दत्त वारी ॥दत्तासी०॥१॥
दत्त ज्ञानज्योती । दत्त गुरुमूर्ती । दत्त हरि भ्रांटी । माणिकासी ॥दत्तासी०॥२॥

पद १२ वें
दत्ता ! ब्रह्मचारी ब्रह्मचारी । त्रिभुवनांत तुझी फेरी ॥ध्रुवपद.॥
शेषाचलिं आसन । माहुरगडांत निद्रास्थान ॥दत्ता०॥१॥
काशिंत स्नान करी । चंदन लावीं पंढरपुरीं ॥दत्ता०॥२॥
कोल्हापुर फिरे झोळी । भोजन करी त्रिपुर पांचाळीं ॥दत्ता०॥३॥
तुळजापुरीं धुई हस्त । मेरूशिखरीं समाधिस्थ ॥दत्ता०॥४॥
माणिक सद्गुरुनाथा । जगव्यापक अत्रिसुता ॥दत्ता०॥५॥

पद १३ वें
वेधियलें मन बाई ! आतां गे ! । जगदंबेसि पाहतां ॥ध्रुवपद.॥
मस्तकीं मुकुट रत्नखचिताचा । कुंकुम चर्चिलें माथां ॥जग०॥१॥
चंद्रवदन जिचें सरळ नासिक । शस्त्र झळके आठिहातां ॥जग०॥२॥
दाट चुडे नेसे पिंवळे पितांबर । कंचुकी तटि तटि छाता ॥जग०॥३॥
मूर्ति पाहुनि मन उन्मन झालें । माणिक वंदे जगन्माता ॥जग०॥४॥

पद १४ वें
स्फूर्ण रूपादि माया भवानी । परापश्यंति मध्यमा वैखरी वाणी ॥ध्रुवपद.॥
जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या । चारी अवस्था तु निर्गुण भार्या ॥स्फूर्ण०॥१॥
अव्यक्तासि व्यक्ति आणि नये कामा । सुविद्या अविद्येसि माणिक नामा ॥स्फूर्ण०॥२॥

पद १५ वें
भवानी ! मी तुझा भूत्या खरा ॥ध्रुवपद.॥
पंचभूतांचा हा देह माझा । उदो उदो घोष बरा ॥भवानी०॥१॥
अविद्येच्या तेलांत जळत त्रिगुणपोत । ज्ञानअग्निनें भरभरा ॥भवानी०॥२॥
अनुहत चवंढक वाजत धकधक । उदो उदो घोष बरा ॥भवानी०॥३॥
चिद्रूप तेजाचें भूषण कवड्यांचें । माणिक अंग साजिरा ॥भवानी०॥४॥

पद १६ वें
ये रे माझ्या शेषाचलवासी ! । दीनोद्धारणा रे ! ॥ध्रुवपद.॥
लक्षुमीपति हे श्रीनिवासा ! । स्वामी पुष्करणितिरवासा ! ।
पडतां संकट स्मरतां त्वरित निवारणा रे ! ॥ये रे०॥१॥
जे कां तुझें दर्शन घेती । प्राणिमात्र त्वरित उद्धरती ।
शरण आलिया करिसी भवभयनिवारणा रे ! ॥ये रे०॥२॥
गोविंदा गरुडध्वजस्वामी ! । जपतां पातक भस्मचि नामी ।
म्हणउनि माणिक दास शरण तुज मधुमुरदैत्यसंहारणा रे ! ॥ये रे०॥३॥

पद १७ वें
व्यंकटराया ! संकट वारीं । तारीं तारीं दीना रे ! ॥ध्रुवपद.॥
दर्शन घेया नयन भुकेले । धीर न धरवे मना रे ! ॥व्यंकट०॥१॥
मी बुडतों भवसागरडोहीं । येउं दे कांहीं करुणा रे ! ॥व्यंकट०॥२॥
माणिक म्हणे प्रभु सोडविं येथुनि । शरण मी जाऊं कोणा रे ! ॥व्यंकट०॥३॥

पद १८ वें
धांव त्वरेनें शेषाचलवासी देवा ! ॥ध्रुवपद.॥
दर्शनाविण मज क्षणही न गमे । वृत्ति नसे एक्या ठायीं रे ! ॥धांव०॥१॥
काय करूं ? मज कांहिं सुचेना । शरण मी जाऊं कोणा रे ! ॥धांव०॥२॥
मानिक म्हणे प्रभु तुझियावांचुनि । जन्म हा जातसे वायां रे ! ॥धांव०॥३॥

पद १९ वें
पाहिं पाहिं मला श्रीव्यंकटा ! ॥ध्रुवपद.॥
दीनदयाळ प्रभु भक्तांचें कारण । उभा असे पुष्करणीतटा ॥पाहिं०॥१॥
मस्तकीं मुगुट कानीं कुंडल झळके । पीतांबर शोभे कीं कटा ॥पाहिं०॥२॥
माणिक प्रभु म्हणे शरण आलिया ! वारिसि दुर्धर संकटा ॥पाहिं०॥३॥

पद २० वें
करुणाकर कृष्ण मुरारे ! । कमलावर ! धांवुनि येईं ॥ध्रुवपद.॥
गोपाल वाहनसुपर्णा ! । व्रजदारामानसहरणा ! ।
यदुनायक दीनोद्धरणा ! । कमलाक्षा मेघहीवरणा ! ॥करुणा०॥१॥
राधाप्रिय नंदसुकंदा ! । गोवर्धनधारी मुकुंदा ! ।
निरुपाधी नित्य आनंदा । वृंदावनवासि गोविंदा ! ॥करुणा०॥२॥
मुरलीधर कैठसुभारी । कंसांतक लीलाधारी ।
पांडवसखा दिनसाहकारी । भयकृद्भयनाशनहारी ! ॥करुणा०॥३॥
योगीजनमानसहंसा ! । जगतारक जगन्निवासा ! ।
अविनाशा आदिपुरुषा । रक्षक दिन माणिक दासा ! ॥करुणा०॥४॥

पद २१ वें
ये धांवत कृष्णाबाई ग ! । माझे आई ! ॥ध्रुवपद.॥
कौरवपंक्तिंत । चालें मी वाढित ।
कंचुकिई फिटली करूं कायी ग ! ॥माझे०॥१॥
एक म्हणे वाढी भात । दुजा मागे पयघृत ।
किति ह्मणती पात्रीं पोळी नाहीं ग ! ॥माझे०॥२॥
स्मरतां मनिं गरुडध्वज । द्रौपदी भासे चतुर्भुज ।
माणिक प्रभुनें बिरडें बांधिलें पाहीं ग ! ॥माझे०॥३॥

पद २२ वें
नेणो मी स्वामी ! मला दाविसि तो पाय कधीं ।
होईन मी धन्य जगीं दृष्टि पडेल पाय कधीं ॥ध्रुवपद.॥
होवोनियां वामन लहान । मागसि दान बळिसि मही ।
द्वय पद स्वर्ग मृत्यु । तिसरा पाय देईं आधीं ॥नेणो०॥१॥
शापबळें गौतमी अबळा । होउनि शिळा पडली वनीं ।
लागतांचि चरणरज । उद्धरि कन्याविधि ॥नेणो०॥२॥
म्हणे माणिक प्रभु न ये । आणिक दुसरें कांहीं मला ।
लागला ध्यास मनीं । रात्रंदिन तुझिया पदीं ॥नेणो०॥३॥

पद २३ वें
पाउल तुझें वर्णिताति ते दावीं दयाळा ! ॥ध्रुवपद.॥
पदअंगुलिंतुनि निघतसे गंगा शिव जटे धरी ।
ते प्रार्थुनियां प्राप्त झाले निजध्यास नृपाळा ॥पाउल०॥१॥
जे वर्णिताती वेद पुर आदि भारती ।
ज्याच्या चरणरजें उद्धरिली अहल्या शिळा ॥पाउल०॥२॥
माणिक म्हणे पाय मला दावी ते हरी ! ।
जे करीं धरी नित्य चुरी सागरबाळा ॥पाउल०॥३॥

पद २४ वें
कमलदलनयना रे कान्हा ! ॥ध्रुवपद.॥
नवल मी सांगुं काई ? । दुहतसे वांझ गाई ।
सोडोनि पान्हा ॥रे कान्हा०॥१॥
ध्यास दिवानिशिं । चित्त तुझेपाशीं ।
नाठवे बाळ तान्हा ॥रे कान्हा०॥२॥
माणिक प्रभु जवळी । नाचतसे गोपबाळी ।
विसरुनियां देहभाना ॥रे कान्हा०॥३॥

पद २५ वें
वेडें पिसें झालें माझें मन हें । कोणी कांहीं बोलु मज जन हे ॥ध्रुवपद.॥
श्यामसुंदर रूप नयनीं जडे । वेणुमंजुळध्वनि श्रवणीं पडे ॥वेडें०॥१॥
माया निरमितां प्रपंच भासेना । मजमाजे हें देहभान असेना ॥वेडें०॥२॥
म्हणे माणिक मज लागलें पिसें । जेथें पाहावें तेथें कृष्णमय दिसे ॥वेडें०॥३॥

पद २६ वें
हरि कां नये रुसला गे ! । कां गे ! ॥ध्रुवपद.॥
कंटाळुनि मशीं वीट धरुनि मनीं । क्रोध हृदयीं घुसला गे ! ॥कां गे०॥१॥
कवटाळिन कोणि कवटाळिलें त्यासी । तिच्या गृहीं बसला गे ! ॥कां गे०॥२॥
बोधिलें असे कोणी माणिक प्रभुजिसी । बोध तिचा ठसला गे ! ॥कां गे०॥३॥

पद २७ वें
यशोदेचा सुकुमार । दावा नयनीं. ॥ध्रुवपद.॥
सांवळि सुरत कटीं पीत वेष्टिला असे । रूप सुंदर अनिवार ॥दावा०॥१॥
यमुनेतिरिं हरि चारित धेनु । संगें घेउनि गौभार ॥दावा०॥२॥
माणिक याचा प्रभु प्रगटुनि गोकुळिं । करि दुष्टा संहार ॥दावा०॥३॥

पद २८ वें
कृष्णा ! माझी वाट धरूं नको सोड ।
कन्हैया ! जाउं दे गृहा ॥ध्रुवपद.॥
तूं तो गुराखी आहें मी राधिका । तुशीं मशीं काय जोड ? ॥कन्हैया०॥१॥
जाउनि सांगिन नंद मामाजिला । मोडविन तुझी खोड ॥कन्हैया०॥२॥
माणिक प्रभु म्हणे हरिनामामृत । वर्णविती आहे गोड ॥कन्हैया०॥३॥

पद २९ वें
कृष्णा ! कां रे ! न येसी गृहाला ।
काय केलें मी मजवरी कोप धरिला. ॥ध्रुवपद.॥
तूं तो परघरीं वसतोसी कान्हा ।
अशी गुजगुज शब्द पडे माझे काना ॥कृष्णा०॥१॥
असें बोलूं नको अग राधे ! ।
कां गांजिसि मजला निरपराधें ॥कृष्णा०॥२॥
म्हणे माणिक हरि नेलासे सदना ।
तिचि पुरविली इच्छा मर्दुनि मदना ॥कृष्णा०॥३॥

पद ३० वें
लागलासे चुटका गे ! करूं कैसें ? ।
क्षण एक न गमे या हरिविण ॥ध्रुवपद.॥
विरहानळें जिव व्याकुळ होउनि ।
उठवेना देह झाला असे मुटका गे ! ॥करूं कैसें०॥१॥
मंजुळ भाषण होउनियां मज ।
निघुनि गेला तेणें मनिं वसे खुटका गे ! ॥करूं कैसें०॥२॥
माणिक प्रभुविण जिणें कशाला ।
आन सखे वाटुनि विषघुटका गे ! ॥करूं कैसें०॥३॥

पद ३१ वें
आतां हरि ! सोड माझ्या पदराला. ॥ध्रुवपद.॥
सोडुं नको माझी कंचुकिग्रंथी । सासु उभी सदराला ॥आतां०॥१॥
मागसी तें मी देईन तूंतें । चुंबूं नको अधराला ॥आतां०॥२॥
माणिक म्हणे प्रभु सोडवि गवळन । येतसे पयोधराला ॥आतां०॥३॥

पद ३२ वें
माधव मथुरेसि गेला ग बाई ! ।
विरहानळें जिव व्याकुळ करुं काई ? ॥ध्रुवपद.॥
रुसतां मी समजावी हृदयीं धरुनी ।
बसवितां मांडिवर घालितसे वेणी ॥माधव०॥१॥
रासक्रीडेमधें प्रथम मला ओढी ।
झिडकाविलें तेव्हां बदला आतां फेडी ॥माधव०॥२॥
रतिसमयीं मशीं घेतसे चुंबन ।
झांकीं सुखावरी तेव्हां मी चांडाळिन ॥माधव०॥३॥
आन सखे वाटुनि विषप्याला ।
माणिक प्रभु म्हणे जिणें कशाला ॥माधव०॥४॥

पद ३३ वें
राधिके ! मम प्राणसखे ! आतां ग ! जाउं कुंजवनाप्रति चाल ॥ध्रुवपद.॥
करूं तेथें जाउनि एकांत विलास । आला जवळि ऋतुकाळ ॥राधिके०॥१॥
खांद्यावरि हात घालुनि आडवे । चुंबूं अधर द्वयगाल ॥राधिके०॥२॥
माणिक म्हणे प्रभु कृष्ण छबिला । नूतन नवा करि ख्याल ॥राधिके०॥३॥

पद ३४ वें
रडे हा गोविंद राधे ! तुझे गृहा नेईं ॥ध्रुवपद.॥
करितसे गवळ्याघरीं । दहिंदुध याची चोरी ।
खोडी करी नानापरी अंतचि नाहीं ॥रडे हा०॥१॥
याच्या खोडी किति वाणूं । खेळायासि मागे भानु ।
मुखांत घालितां स्तनु । समजेना कांहीं ॥रडे हा०॥२॥
उतर यशोदेकडी । राधेवरी घाली उडी ।
माणिक प्रभुचि गुणगोडी । निशिदिनीं गाई ॥रडे हा०॥३॥

पद ३५ वें
सगुण रूप नयनीं । नयनीं आधिं दावा ।
मग तुम्हीं वेदांता गावा ॥ध्रुवपद.॥
तुम्ही तरी म्हणतां । हरि हा हृदयस्थ । हें तंव जाणति समस्त ।
नव्हे आम्ही योगी । राहूं ध्यानस्थ । रिकामा वाढुनि प्रस्थ ।
भक्तिविण ज्ञान । हा निर्फळ मानावा ॥मग तुम्ही०॥१॥
दहिंदुधाची । दुधाची करित चोरी । ठकविल्या गवळ्यांच्या पोरी ।
चटक लाविल्या । लाविल्या लहान थोरी । यशोदे बांधिली ज्या दोरी ।
दामोदर तो । दर तो आणावा ॥मग तुम्ही०॥२॥
यमुनातिरिं । तिरिं वाजवि वेणु । सवें गोपाळ चारि धेनु ।
बरह्मादिक जे । वंदिति पदरेनु । दर्शन सुकृत फल नेणूं ।
साहाकाराचा । आनंद मानावा ॥मग तुम्ही०॥३॥
रासक्रीडेचं । क्रीडेचं सुख फार । हृदयीं आठवे वारंवार ।
सुंदर रूपडें । रुपडें सुकुमार । मूर्ति लावण्य रतिसार ।
माणिक प्रभु तो । नेत्रीं वसवावा ॥मग तुम्ही०॥४॥

पद ३६ वें

उद्धवा ! परम घातकि हा कान्हा ॥ध्रुवपद.॥
त्यजुनि गोकुळ गोपद्वारासी । कुब्जेसि रतला कीं पाहाणा ॥उद्धवा०॥१॥
शश्वत मानुनी रतलों आम्ही यासी । शेवटासी कापिल्या कि माना ॥उद्धवा०॥२॥
माणिक प्रभु विजळाविण जसे मिन । तर्फडुनि हो त्यजूं प्राणा ॥उद्धवा०॥३॥

पद ३७ वें
जा ग सखे ! तुं जाय । जाउनि हरिला आण ॥ध्रुवपद.॥
रुसले हरि जरि समजावि सखये ! । दृढ धरुनियां पाय ॥जाउनि०॥१॥
घरिं पाहा अथवा यमुनेतिरीं पाहा । नसतां वृंदावना जाय ॥जाउनि०॥२॥
दूति म्हणे राधे माणिक प्रभुजिसी । आणितें मी तुं उगि रहाय ॥जाउनि०॥३॥

पद ३८ वें
बंगल्याच्या खालुनि येतो जातो ॥ध्रुवपद.॥
किति आजब बुंद नाजुक मुखडा । नेत्रिंचा चमक बिजलि ग तुकडा ।
भलत्या ग ! मिषें मजकडे पाहतो ॥बंगल्याच्या०॥१॥
जा ग सखे ! तुम्ही सत्वर जा । याचा मार्ग धरा कोठें जातो पाहा ।
याचें नांव काय कोण्या ठायीं राहतो ॥बंगल्याच्या०॥२॥
बहुता जन्मिंचा सुकृत व्हावा । तरि असा सखा नेत्रीं पहावा ।
माणिक प्रभुचा विरह न साहतो ॥बंगल्याच्या०॥३॥

पद ३९ वें
दशरथसुत राम त्यजुनि । शरण कोणा जाऊं ? ॥ध्रुवपद.॥
एकवचन एकबाण एकपत्नी ज्याची ।
ऐसे दिन दयाळ सांडुनि इतर कोणा पाहूं ॥दशरथ०॥१॥
चरणरजें उद्धरली गौतमाची भार्या ।
इच्छिताति सकळ देव चरण आह्मी ध्याऊं ॥दशरथ०॥२॥
नामप्रतापें पाषाण तारुनि बांधियला सेतु ।
माणिक म्हणे तेंचि नाम निशिदिनिं आह्मी गाऊं ॥दशरथ०॥३॥

पद ४० वें
रामा ! तुझिच आण । मज नावडे इतरांचें ध्यान ॥ध्रुवपद.॥
त्रिभुवनिं सद्गुरु राघव एकवी । न दिसे मजला आन ॥रामा०॥१॥
ध्यान जगीं मी दास तुझा म्हणे । येवो असा अभिमान ॥रामा०॥२॥
माणिक म्हणे ऐशी करुनि प्रतिज्ञा । वदत स्वमुखें हनुमान ॥रामा०॥३॥

पद ४१ वें
देईं मला इतकें रघुराया ! ।
मति उपजो तुझिया गुण गाया ॥ध्रुवपद.॥
षड्वैर्‍यांचा संग नको रे ! । मन वैराग्य मनांत भको रे ! ॥देईं०॥१॥
धर्म घडो ते अधर्म नसावा । तूंहि सर्वांभूतिं ठसावा रे ! ॥देईं०॥२॥
माणिक म्हणे प्रभु हेचि विदेहीं । प्रीति जडो तुझिया निजपायीं ॥देईं०॥३॥

पद ४२ वें
राम राम राम राम राम ! वद वद जिव्हे ! ।
सीताराम सीताराम श्रीराम जय राम जय जय राम ॥ध्रुवपद.॥
कोदंडधारी राम । अघसंहारी राम ।
दिनसाहाकारी राम । विघ्ननिवारी राम ॥राम राम०॥१॥
शरयूतिरवासी राम । हृदयनिवासी राम ।
रविकुळवंशी राम । भवभयनाशी राम ॥राम राम०॥२॥
दशकंठहर्ता राम । लक्षुमणभ्राता राम ।
लवांकुशपिता राम । माणिकाचा दाता राम ॥राम राम०॥३॥

पद ४३ वें
आज विटेवरि निट विठ्ठल सखा देखियला गे ! ।
भाळिं गंध केशरी तिलक कस्तुरि रेखियला गे ! ॥ध्रुवपद.॥
शिवाकार मुगुट मस्तकासि फार शोभतो ।
कुंडलांचें तेज पाहुनि रवि लाज पावतो ।
शोभे नासिक कर्ण नेत्र आकर्णवदन हास्य तो ।
.............................................................. ॥आज०॥१॥
कासे कसि पितांबर ठेवि कर कटावरी ।
शंखचक्र दोन्हि करी हरि प्रीतिनें धरी ।
गळांमाजि वैजंयती शोभती करीं ।
उरीं धरी नाथ जेंवी निगुणी झोकियला गे ! ॥आज०॥२॥
कडकडोनि माणिक दास विठ्ठलासि भेटले ।
सद्गदीत कंठ होउनि नेत्रि अश्रु दाटले ।
अंतरांत हेतु आज सर्व फीटले ।
प्रेमभावें अबिर वरी फेरियला गे ॥आज०॥३॥

पद ४४ वें
सखा दीनवत्सल पंढरीराय । तो हा विटेवरि जोडुनि पाय ॥ध्रुवपद.॥
सुदामाचे मुठभर पोहे । आवडिनें मटमटा खाय ॥सखा०॥१॥
दुर्योधनाचा नावडे मेवा । विदुरगृहाप्रति जाय ॥सखा०॥२॥
माणिक प्रभु भावाचा भुकेला । आणिक नलगे काय ॥सखा०॥३॥

पद ४५ वें
दृष्टि न्याहाळ तुम्ही पहा त्या हरिला ॥ध्रुवपद.॥
दीनदयाळ असे नाम जयाचें तो भीमातटिं उभा ।
अंबऋषीचे कारणें जेणें अवतार घेतले दहा ॥दृष्टि०॥१॥
कीर्ति वर्णितां शेषहि शिणला न कळेचि ब्रह्मादिकां ।
भारतभागवतादि वर्णितां न कळेच लीला आहा ॥दृष्टि०॥२॥
मानिक म्हणतसे एक्याभावें पंढरपुरचि चाहा ।
आणिक कांहीं नलगे हो ! त्याला अबिर तुळशि तुम्ही वाहा ॥दृष्टि०॥३॥

पद ४६ वें
सांब ! तुजविण मज रक्ष दुजा कोण असे रे ! ॥ध्रुवपद.॥
येई कैलासवासि शशिभालधारणा ।
त्रिपुरारि त्रीनयन । त्रिविधतापहरणा ।
नंदिवाहन नागभूषण जटेमाजी गंगा वसे ! ॥सांब०॥१॥
येई भस्मोद्धार भद्रबाल भवविदारका ।
निजानंद स्वानंद नित्य निर्विकारका ।
हर हर हर गर्जति सुर सुमन अपार तुजवरि वर्षे रे ! ॥सांब०॥२॥
येई पंचवदन परमपुरुष पार्वतीपते ! ।
दशकंठवरद दशकर देदिप्य फाकते ।
तारिं तारिं तारिं भव हा निवारीं । माणिक उद्धारिं दास तुझा असे रे ! ॥सांब०॥३॥

पद ४७ वें
मन हे ! भज भज भज सांब सांब सांब सांब ॥ध्रुवपद.॥
जटागंग भस्मांग । कुंडल कानीं शोभे भुजंग ।
सन्मुख उभे शृंग भृंग । वाजवी शंख भुं भुं भुं ॥मन०॥१॥
चंद्रभाल कंठनील । डमरू धरि करिं त्रिशूल ।
शोभत गळा रुंडमाळ । वरितो जगदंब दंब दंब ॥मन०॥२॥
गौ वाहन नेत्र तीन । दशकर जो पंचवदन।
माणिक म्हणे जाय शरण । ठाकुनियां दंभ दंभ दंभ ॥मन०॥३॥

पद ४८ वें
म्हाळसापति मल्हारी । मागेन तुझि मी वारी वारी । देवा ! ॥ध्रुवपद.॥
देह कोटंबा करूनि अजपा । जप करि फेरीफेरी ॥देवा०॥१॥
फोडुनि वासना चूर्ण हरिद्रा । प्रेमें फेकिन तुजवरि वरि ॥देवा०॥२॥
माणिक म्हणे मी होउनि श्वान । पडेन तुझे महाद्वारीं द्वारीं ॥देवा०॥३॥

पद ४९ वें
खंडेराय प्रेमपुरीं आजि देखिला ॥ध्रुवपद.॥
नंदिगमन उत्तरेस । मुख असे पूर्व देश ।
जटागंग भंडार । भाळिं रेखिला ॥खंडेराय०॥१॥
जरिदार पितांबर । रत्नखचित अलंकार ।
चंपकादि पुष्पभार । अंग झांकिला ॥खंडेराय०॥२॥
मारी असुर ठार । स्वर्गिंहुनी पुष्पभार ।
सुरवरे अंत झांकिती । तेज फार फांकला ॥खंडेराय०॥३॥
माणिक दास पाहुनि मूर्ति । वर्णिताति सगुण कीर्ति ।
जोडुनि कर सन्मुखासी । उभा ठाकिला ॥खंडेराय०॥४॥

पद ५० वें
करुणाकर कृपानिधान म्हाळसापती ! ॥ध्रुवपद.॥
मल्ल मातला महिवरि । ब्राह्मण आणि गाई मारी ।
म्हणउनि त्रिपुरारी हरि । अवतार निश्चिति ॥करुणा०॥१॥
निळ्या घोड्यावरते स्वारी । खङ्ग पात्र त्रिशुल वामकरीं ।
डमरू खङ्ग सव्य धरी । म्हाळसासहित मल्हारी ॥करुणा०॥२॥
प्रेमपुरीं करित वास । सौख्य जाहलें जनास ।
प्रेमभरित माणिक दास । करितसे स्तुति ॥करुणा०॥३॥

पद ५१ वें
सत्वर धांवुनि ये रे मल्हारी ! । संकट बा ! दुर्धर वारीं ॥ध्रुवपद.॥
त्रिविध तापें मी तापलों । संसारीं बहु व्यापलों ।
म्हणउनि जीव व्याकुळ होतसे भारी ॥सत्वर०॥१॥
कामक्रोध मजला झडपिला । मद मत्सर दडपिला ।
दंभ अहंकृति ज्याचे परोपरी ॥सत्वर०॥२॥
सखया मार्तंडा मार्तंडा ! । हातीं घेउनियां खंडा ।
वारुनि माणिक दास हृदयीं धरी ॥सत्वर०॥३॥

पद ५२ वें
सये ! मन रामरूपीं रंगलें ॥ध्रुवपद.॥
पहातां पहातां जग नेणों जालें कांहीं । पाहणेंविण दंगलें ॥सये०॥१॥
मीतूंपणाचा ठाव मोडिला । आपणांत आप गुंगलें ॥सये०॥२॥
माणिक म्हणे पूर्ण राम मी जालों । मीपण माझें भंगलें ॥सये०॥३॥

पद ५३ वें
आतां मी सखे ! कैसें काय करूं ? । कधिं भेटेल मम सद्गुरू ? ॥ध्रुवपद.॥
कोण मी कैंचा कांहीं कळेना । कोठें नव्हे स्थिरू ॥आतां०॥१॥
शोधुनि पाहतां अंत दिसेना । कोठवरी धिर धरूं ? ॥आतां०॥२॥
माणिक म्हणे जन्म जातसे वायां । कितितरि फेरे फिरूं ? ॥आतां०॥३॥

पद ५४ वें
प्रभुविण कोण कोणाचा वाली ? ॥ध्रुवपद.॥
कोण कोणाचा चाकर मालक । व्यर्थचि भाषण खालीं ॥प्रभु०॥१॥
कर्ता हर्ता तो करवीता । मिथ्या जन हे बोली ॥प्रभु०॥२॥
माणिक प्रभु म्हणे मातेचे उदरीं । नवमास रक्षुनि खालीं ॥प्रभु०॥३॥

पद ५५ वें
कृष्णा ! तुझ्या वेणुं काय रे ! ॥ध्रुवपद.॥
डोळ्यांत कुंकूं काजळ कपाळीं । हळदिसि मट मट खाय रे ! ॥कृष्णा०॥१॥
गाइची वासरें म्हसिसी सोडी । बैल दोहायास्तव जाय रे ! ॥कृष्णा०॥२॥
माणिक म्हणे प्रभु मुरली मुकुंदा । मन्मन तत्पदीं धाय रे ! ॥कृष्णा०॥३॥

पद ५६ वें
गुरुजि ! तोरे पैयापर सीस धरू ॥ध्रुवपद.॥
तेरा नामका ध्यान धरू । तेरे काज मरू ॥गुरुजि०॥१॥
आपने तनकी चाम निकालके । चरण पन्हया करू ॥गुरुजि०॥२॥
माणिक कहे तेरी मूरत प्यारी । नैनन विच भरू ॥गुरुजि०॥३॥

पद ५७ वें
मन लागा मेरो रे ! । अवधूतासो ॥ध्रुवपद.॥
निराकार निर्गुन निरंजन । निराकार बिन नाथासो ॥मन०॥१॥
बहुरंगी जोगी संतत्यागी । ज्ञान अखिल पद दातासो ॥मन०॥२॥
माणिकके मन लग गये सुमरण । अनसूयाजिके पूतासो ॥मन०॥३॥

पद ५८ वें
देखो देखो सखि रे ! छब बालाकी ॥ध्रुवपद.॥
शेषाचलपर आप बिराजे । चोकी हनुमतलालाकी ॥देखो०॥१॥
मोरमुगुट मस्तकपर सोहे । बहुत लगे लड मालाकी ॥देखो०॥२॥
माणिकके मन सुमरत बाला । फासा कटे भवजालाकी ॥देखो०॥३॥

पद ५९ वें
मै तो वारि रे सया ! तोरे परसे ॥ध्रुवपद.॥
सावलि सुरत रसभरि अखिया । लेउगि बलया दोने करसे ॥मै तो०॥१॥
माणिक प्रभु वो नंदलाला । दर्शन परजिया तरसे ॥मै तो०॥२॥

पद ६० वें
नंदकुमार सावरो कान्हा । बासुरी बजाई ॥ध्रुवपद.॥
शुक सनक व्यासमुनि । ध्रुव प्रर्‍हाद नारदमुनि ।
भय रहे स्थीर देहे सूध बिसराई ॥नंद०॥१॥
चकित भये सबही देव । ब्रह्मा विष्णु महादेव ।
त्रिभुवनमो नाद भरे सुनत शेषशायी ॥नंद०॥२॥
स्थीर रहे जमुनानिर । डुल भये बिमानी सुर ।
माणिकदास मगन भये हरिके गुण गाई ॥नंद०॥३॥

पद ६१ वें
आज बडो ये कठिण भयो ।
निर ढलकत नैनसे या रघुबरके ॥ध्रुवपद.॥
लागके बापडे जद लछुमन । व्याकुल प्राण भयो भयो धरके ॥आज०॥१॥
क्या कहूं मै भरतमैयाकु । कैसे मै जाउ अयोध्यानगरकु ॥आज०॥२॥
ज्यावेगे काह कपि गिरिकंदर । ज्यावे बिभिखन अब कौन घरके ॥आज०॥३॥
माणिकके प्रभु धनुक हात धरे । बतावो निशाचर अब कौन घरके ॥आज०॥४॥

पद ६२ वें
भोला ! तोहे मूरत लागत नीको ॥ध्रुवपद.॥
कान भुजंग सुहावत कुंडल । वोढे ही छाला ब्याघ्रांबरके ॥भोला०॥१॥
गाल बजायके नाम ही लैत । कालही कापत थर थर ॥भोला०॥२॥
माणिकके प्रभु ऐसे सदाशिव । भावहि भक्ति न भूको ॥भोला०॥३॥

पद ६३ वें
गुरुबिंग शरणनु होदने । स्वयमेव बह्मनु आदने ॥ध्रुवपद.॥
मरतिदन्यनम् नानगे । श्रीगुरु तोरिदा नानोळगे ॥गुरु०॥१॥
जीव शिव एरडु वंदायिते । जन्म मरण भ्रांति होयिते ॥गुरु०॥२॥
अज्ञान कत्तल ज्ञान बंळगे । माणिक तुंब्याद जगदोळगे ॥गुरु०॥३॥

पद ६४ वें
ईग येनु केळली गुरुराया । नोड नोडतकडदलु माया ॥ध्रुवपद.॥
नाम देह अंबुदेत मरउ । निन ब्रह्मांड तोरिदि आरऊ ॥ईग०॥१॥
‘ तत्त्वमसि ’ महावाक्यं केळी । हारि होइतु द्वैतागि धूळी ॥ईग०॥२॥
माणिक पंसर आगि लोपा । उळितु सच्चितनंदस्वरुपा ॥ईग०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP