मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
राजाराम प्रासादीकृत पदें

राजाराम प्रासादीकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
दिवस आज धन्य आनंदाचा । देव पाहिला पंढरीचा ॥ध्रुवपद.॥
भक्तवर पुंडलीक ज्याचा । महिम अमोठा आषाढीचा ।
काला होतो पूर्णिमेचा । मिळे कीं मेळा संतांचा ।
करूनी प्रदक्षिणा नाचा । बोलती रामकृष्ण वाचा ।
जेथें लाग नसे अरिचा ॥देव०॥१॥
निकट ज्या रुक्मिणिसह राई । भक्ता जाउं नको राहीं ।
म्हणतसे विश्वाची आई । विटेवरि उभी विठाबाई ।
प्रेमरस जाइल कीं काई । म्हणोनी खळगावर पाई ।
का(खो)वला तकट पदर जरिचा ॥देव०॥२॥
म्हणति बुध हरिचरणीं लागा । वारकर्‍यांत नीट वागा ।
इप्सित विठ्ठलासि मागा । प्रभूच्या कीर्तनांत जागा ।
क्षितिवरि नसे असी जागा । जेथें वाहे चंद्रभागा ।
दर्शनें लाभ घडे हरिचा ॥देव०॥३॥
प्रेमें नामाचा दंगा । करुनियां दुष्कर भवभंगा ।
लावुनि तुळसिबुका अंगा । भेटा सदय पांडुरंगा ।
वरा या राजाराम संगा । प्रासादिक सादर प्रसंगा ।
हेतु मग पुरला अंतरिंचा ॥देव०॥४॥

पद २ रें
हरि ! मला बहुत धरिं जाच जाच आज कांचण भारी तारिं सारिं नसतां येउनि तरि धरिं करिं वरिं ॥ध्रुवपद.॥
हृदयिं थोर आन नसे तुजविणें । त्यजुनि त्यजसि काय करूं जिणें ।
परि टपणि घरधणी असति म्हणुनि भिणें हें व्यसन आजि परिहरि हरि ! ॥हरि !०॥१॥
मानसिं जाण वचन हें न लटिकें । भक्तसि तरिहि लौकिक न टिके ।
आणि नमन करिते झाणिं गमन हें आहे निकें राजारामी प्रासादिक तरि ॥हरि !०॥२॥

पद ३ रें
काय उभारमणें आणिला । कठिण समय असला । अनावर ॥ध्रुवपद.॥
म्यां तरि मनिं वरिलाचि सख्या ! तूं । काय तयाचे तेजा वानूं ।
वाटे मज तो उगवला भानू । ऋषिमंडळि बसला । सबांधव ॥काय०॥१॥
उद्धत भय दे रावण मानी । न कळे मेला वीस करांनीं ।
मोडित धनु मग पडिलें रानीं । पण करुनी फसला । जनक नृप ॥काय०॥२॥
काय असुनि हें राज्य रसादिक । व्यर्थ म्हणुनियां जीव असादिक ॥
राजारामीं रत प्रासादिक । असतां विभु तसला । वरिल झणि ॥काय०॥३॥

पद ४ थें
नंदयशोदेनगरिं सखे ग बाइ ! । हा कोण रथवाला ? ॥ध्रुवपद.॥
एक वदे श्रीहरिला नेतो । बळरामहि त्या संगें जातो ।
उगि च वदे हरि सत्वर येतों । जगणें कैशाला । किं आतां ॥नंद०॥१॥
अक्रूराभिध हा मथुरापुरिचा । परि दिसतो क्रूर वृषभ धुरीचा ।
काढुनि नेतो हरि हा उरिचा । आकांत जाहला । तेव्हां कीं ॥नंद०॥२॥
घे जा प्राण अशा त्या कामी । करती विलाप राजारामीं ।
प्रासादिक हे शोक वदेना मी । त्यांणीं जो केला । तेव्हां कीं ॥नंद०॥३॥

पद ५ वें
लागला मज छंद हरिचा ! न सुचे कीं व्यवसाय घरींचा ॥ध्रुवपद.॥
कृष्ण दिसे मज जनिं वनिं बाई ! । पीत पटाचा पदर जरीचा ॥लागला०॥१॥
काय वंदूं कौस्तुभमणि झळके । जो राधेचा हार उरींचा ॥लागला०॥२॥
होता प्रेमा परिस विसरला । तिलक ठशाचा जेंवि जरीचा. ॥लागला०॥३॥
राजारामीं लीन प्रासादिक । जो नांवांडी भवजलतरीचा. ॥लागला०॥४॥

पद ६ वें
गाईं रे ! मुरलीं कान्हा तो यशोदेचा तान्हा तेणें न पिति पान्हा शिशु हि ॥गाई रे !॥ध्रुवपद.॥
नृत्य हि रुचिर करि वाजति मधुर भरि तदा नूपुरें झण झण झण ॥गाईं रे !०॥१॥
विधि ताल धरी शिव हि मग लगबग डमरु वाजवित खण खण खण ॥गाईं रे!०॥२॥
दुरलि मुरलि परि परिसुनि मुलिंसी भरे स्मरज्वर फण फण फणा ॥गाईं रे !०॥३॥
दास राजारामिं लिन प्रासादिक ते चरण पाहण्याकरितां ते मुनिजनगण ॥गाईं रे !०॥४॥

पद ७ वें
भागला हा जीव । भवानी ! दाखिव पदराजीव. ॥ध्रुवपद.॥
लक्ष नको चौर्‍याशीं जनिं या । भव ही तूं भाजीव. ॥भवानी०॥१॥
निज जन रसनेकरविं अनाथा । नामसुधा पाजीव. ॥भवानी०॥२॥
पतित असें परि पावन करुनी । यमदूतां लाजीव. ॥भवानी०॥३॥
राजारामीं लीन प्रासादिक । त्रिभुवनिं यश गाजीव. ॥भवानी०॥४॥

पद ८ वें
तुजविणें कोण दया करणार. ॥ध्रुवपद.॥
श्रीजगदीश ! हरे ! सुखसिंधो ! । म्हणतां अघ हरणार. ॥तुजविणें०॥१॥
चिंताडोहीं बुडतां तेथें । येउनि कर धरणार. ॥तुजविणें०॥२॥
त्यागुं नको मज निज यश राखीं । विश्वातें भरणार. ॥तुजविणें०॥३॥
राजारामीं लीन प्रासादिक । वचना अनुसरणार. ॥तुजविणें०॥४॥

पद ९ वें
पांडुरंग भज सांडुनियां सुत धाम काम, विचारें ।
जो खलदंड मुंडमंडितांग शिरिं धरि तो अखंड पुंडलीकमंडन ॥ध्रुवपद.॥
पंढरी सप्तपुरींमध्यें सुंदरी वंदित ही ईश पुरंदरी सोडुनि वरिती गिरिकंदरीं मुनि ईतें ।
जेथें बहु तरला पतित जन श्रीहरि पाहुनि अवतरला भीमातीर धीर धीर नीर वनगंभीर वीर दीर रेवतीचा ॥पांडुरंग०॥१॥
पावतां सर्वां भक्तांसी धांवता तें देखुनियां कीं सांवतां लपला कां इत रागावता हरि ऐसा ।
वेदा गवसे ना हरि जो त्यासि प्रिय नाहवि सेना सुतार जळूं मळूं वळूं हि लागे जनिस हळू हळू दळूं चळूं न दे व्रत ॥पांडुरंग०॥२॥
श्रीतुकाराम ज्ञानेशासी तुका रोहीदास हि नत जी तुका चोखा गोरा ही तीतुका हरि पायीं ।
दाम्याचा नाम्या बोधला तो तरि विसरावा कां म्यां नमिति हरवक्त तक्त भक्त जवळि न नक्त फक्त भक्तियुक्त हे नर ॥पांडुरंग०॥३॥
पाहिला विठ्ठल मीं मस्तक वाहिला पदिं वरुनी रुक्मिणी राहिला दिंडीरवनीं प्रभु राहिला जन हो ! तो ।
रत राजारामीं पासादिक य अभूवैकुंठग्रामीं कधिं तुम्हिं गाल गाल गाइ जाउनि साल साल सालसा त्यजुनि वच ॥पांडुरंग०॥४॥

पद १० वें
रघुपति कां हो ! भेट देइना ? ॥ध्रुवपद.॥
माझे गुरुजि मातंग - । ऋषि बोलिले श्रीरंग ।
वेगें भेटेल अभंग । तें वचन गुणासी येईना. ॥रघु०॥१॥
ज्याच्या विलोकनासाठीं । करुनियां पर्णकुटी ।
वनिं तपें करिं मोठीं । परि कार्य सफल होइना. ॥रघु०॥२॥
तनु पहातां न बरी । फार मलिन कबरी ।
भार असेहि शबरी । तार म्हणुन परि निकट नेइना. ॥रघु०॥३॥
दास राजारामीं लीन । झाले प्रासादिक दीन ।
जैसे जळाविणें मीन । विभु कसा येउनि यश घेइना. ॥रघु०॥४॥

पद ११ वें
क्रम करीं कीं असा ।
भ्रमरसम रमुनि मन वरीं पदसारसा ॥ध्रुवपद.॥
रामचरण कमल मुनिजन धरि धरि तसा ॥कीं असा०॥१॥
सारीं असुखद वद कदनदपद सदयसा ॥कीं असा०॥२॥
राजारामीं रत प्रासादिक धरुनिया भरंवसा ॥कीं असा०॥३॥

पद १२ वें
सहज मी आल्यें । रे यदुवीरा ! । सहज मी आल्यें ॥ध्रुवपद.॥
तूं कोठिल मी कोण कुणाची । नवलचि आजि जाहलें ॥सहज०॥१॥
सोडिं पदर दर कांहिं नसे तव । पाहती नगरजन भले ॥सहज०॥२॥
राजारामीं लीन प्रासादिक निजसुख पर लाधलें ॥सहज०॥३॥

पद १३ वें
बोला अतां हें बोला बोला हो ! । जाता कुठें आतां हें बोला ॥ध्रुवपद.॥
सहज तटाकीं गजेंद्रपदातें । नक्रें दिधला झोला ॥बोला हो०॥१॥
घरिं नसणें बसणें पार्थरथीं । चाकरसें कामाला ॥बोला हो०॥२॥
यवन कबीर नामें महा साधू । विणिला त्याचा शेला ॥बोला हो०॥३॥
दीनवत्सल नामास्तव जातो । काय वदावें तुला ॥बोला हो०॥४॥
राजारामीं लीन प्रासादिक । मनिंचा संशय गेला ॥बोला हो०॥५॥

पद १४ वें
सुजनता धरीं सुजनता धरीं रे । कांहीं तरी सुजनता धरीं धरीं ॥ध्रुवपद.॥
ह्मणती तुजला या गोकुळिंचा । निजजनिता चौधरी ॥सुजनता०॥१॥
म्हणती गोपी सोडुनि शिशुपण । दासजना उद्धरीं ॥सुजनता०॥२॥
राजारामीं लीन प्रासादिक । उतरीं भवसागरीं ॥सुजनता०॥३॥

पद १५ वें
नमितसें रमेऽब्धिकन्ये ! वैष्णवि होसिल काय ।
मूकसम घड घड घड घड घड घड घड घड बोलुनी सुखी कर ॥ध्रुवपद.॥
कर धर हर शिव कीं मत्कर अघ जोवरीं नसे यमप्रदर्शन ।
जाहल्यावर नर सुर जनजननी कराल काय धराल काय हराल काय ॥नमि०॥१॥
करधृत खेटर मातुलिंग सत्पानपात्र पारदे भवाचल ।
गड गड गड गड गड गड गड गड कोसळे समुद्धर ॥नमि०॥२॥
राजारामीं रत प्रासादिक देह हा नसेचि यास्तव अंतक ।
कड कड कड कड कड कड कड कड खात दांत मजवर ॥नमि०॥३॥

पद १६ वें
अहा हरि ! काय धरिसि कर गौळणि बहुनणि असतां रे ! ॥ध्रुवपद.॥
कुंजवनीं गोपिकांसहित मी चुकवुनि तुजला फिरतें रे ! ।
कोठुनि येथें कसा अलासी अपराध हि तिळ नसतां रे ! ॥अहा०॥१॥
बोलूं तरि शिण होतो सखया । नख या दृष्टि न पडतें रे ! ।
दडतें जरि मोहरिं परि घडतें पाप आणिक तुम्हिं हसतां रे ! ॥अहा०॥२॥
सदय विभू कळवळला तेव्हां कर जोडुनि वंदितसे ती रे ! ।
राजारामीं लीन प्रासादिक हर्ष मनीं पद ठसतां रे ! ॥अहा०॥३॥

पद १७ वें
हा भवसिंधु तरावा । मानवा ! राम मुखीं गावा ॥ध्रुवपद.॥
गणिकागेहीं लंपट होसी । किति तरी फजित करावा ॥मानवा०॥१॥
दौलत करुनी बहु मिरविशी । किति तरी धनसुत थावा ॥मानवा०॥२॥
शतबुद्धि ठायीं करिल विठाई । तव मन हार तरावा ॥मानवा०॥३॥
गुरुरायाचे लागें पायां । वायां काय न जावा ॥मानवा०॥४॥
राजारामीं लीन प्रासादिक । हांसत संग धरावा ॥मानवा०॥५॥

पद १८ वें
कां रे ! ऐसा झालासी धुंद तूं ।
गार्‍हाणं हें किती कां बोल ॥ध्रुवपद.॥
ऐक यशोदे गे ! गुण माझं मुल नाहीं दुजा ।
लोणि शिकें शिंगें पाडी घाटी काठिवाला तुझा ।
ठेवूनि लोणि गे ! पाहि नयनीं मांजराच्या झुजा ।
न वदसि पोता जागी होतां हंसत निघाला खोटा मोठा चंडोल ॥कां रे०॥१॥
दुसरी बोले मग बहु कुसरी आंवर यातें झणी ।
असुनि आमचे पति नांवाचे हाचि झाला धणी ।
गरतपणा गे ! माझा घेउनी आला हेचि क्षणीं ।
न कळे कां तुज काय वदूं मज लाज हि वाटे याचि माझी कां झोल ॥कां रे०॥२॥
तिसरी बोले घरीं करी चोरी काय थोरी तरी ।
जाति धराया गे चार सहा अठरा हे परी ।
बंधन पावेना थकलें मी धीट मोठा हरी ।
पिकलें हें कुळ गोकुळिंचा कुळधर्म बुडाला कांहिं मिळेना देतां मोल ॥कां रे०॥३॥
वदे मग माता ती गणनाथा नवस करीतें तुला ।
करिन चतुर्थिचें व्रत तुझें गुण दे या मुला ।
कंदुक दे म्हणुनि छळि राधे नवल वाटे मुलां ।
न वसे धामीं राजारामीं लीन प्रासादिक ज्यांणीं केला बिंगोल ॥कां रे०॥४॥

पद १९ वें
हा सुलभ उपाय । जन्म मरण चुकवाया मनुजा ! धरिं सद्गुरुचे पाय ॥ध्रुवपद.॥
सोसुनि शीतोष्णादिक विजनीं श्रमविति किति नर काय ।
त्यक्तवसन पंचाग्निसाधनें किति करसिल हायहाय ॥मनुजा०॥१॥
निश्चय तद्वचनीं ठेवुनि जनिं भवनीर तरुनि जाय ।
सद्गुरुविण तुज अन्य सुलभ तरि साधन दिसतें काय ॥मनुजा०॥२॥
जिवा शिव करीं देशिक हे शिक घेशी करिं उरुगाय ।
राजारामीं रत प्रासादिक संतत सद्यश गाय ॥मनुजा०॥३॥

पद २० वें
मदनजनना ! हा रे ! सुखसदना ! नंदनंदना ! कुंदरदना ! ॥ध्रुवपद.॥
गांजिति मज स्मरशर दुर्धर हे । देइं आलिंगन तो हि शुद्ध रंगधर सुंदर मदना ॥१॥
व्हावें शरण गांवें भावें यश बहु । दयाघना ! ते तरि कठिण हि गुणगणना ॥२॥
बससी तरि कुणिकडे ह्मणुनि जनिं । राजारामीं लीन जाण प्रासादिक करि मनना ॥३॥

पद २१ वें
राम ह्मणे सानुज मीं येतों । गुरुवर्या ! न्या हो ! । जनकपुरीं ॥ध्रुवपद.॥
विश्वामित्र म्हणे मग रामा । पत्रास्तव जाणे हें आम्हा ।
श्रम होतिल पथिं तुज सुखधामा ! । आग्रह हा राहो । नको धरूं ॥राम०॥१॥
ऋषिवर्या सोडुनि सत्संगा । स्थिति योगें न शिण झगटो अंगा ।
नृप तेथें चापाच्या भंगा करितिल तें पाहों । नयनभरी ॥राम०॥२॥
घे मुनि मग संगें रघुराया । उद्धरवी पथिं गौतमजाया ।
राजाराम प्रासादिक पायां । लागुनि धन्या हो ! तीस हि म्हणे ॥राम०॥३॥

पद २२ वें
जनक विनोदें कन्यार्पण करी ॥ध्रुवपद.॥
मंडप थंड अखंड विराजित ।
तोषतसे मुक्तघोंस हि लोंबति । स्तंभ कनक परी ॥जनक०॥१॥
भूप अमूप तसे द्विज आठवि ।
पत्रें त्यां पाठवि शीघ्र पहा तीं । वेळा गणक बरी ॥जनक०॥२॥
राजारामीं लीन प्रासादिक ।
जनकरुणार्णव धन्य असे या । म्हणति सनक हरि ॥जनक०॥३॥

पद २३ वें
पाथिं पैंजण वाजत झण झण ॥ध्रुवपद.॥
शूर्पणखा पण खास करुनि मनिं ।
यास वरिन मी च म्हणुनि अलि । जैं घर घरधनी ॥पायिं०॥१॥
टाकुनि रूप स्वकीय उभि भुलवी ।
त्रैलोक्याचा नाथ पहा । हा रघुवीरमणी ॥पायिं०॥२॥
राजारामीं प्रासादिक लेखन ।
घेउनि जाय त्वरें मग लक्ष्मण । वर वर वर हाणी ॥पायिं०॥३॥

पद २४ वें
कुजभगिनिकांत ! करुणा करा वद झणीं तूं ये करणि तुजविणें अज नाहीं कुणी ।
अनाथनाथ नावनाकधिं तरि करिल कोण यम रणीं हाणिल शर सणणणणण ॥ध्रु०॥
घडि पल घडि पल वय जाय कृपें पाहें म्हणतो साहें थोडि आहे तुझिये ।
चरणिं ये मरकटवत् तरफडते मन जडविं जडविं ॥कुज०॥१॥
भवसागरिं बुडें हरि गरुडावरि बसुनि किंवा तसा च परि लवकर ये ।
मंगल त्वत्संग हा घडविं घडविं ॥कुज०॥२॥
राजारामिं रत प्रासादिक वचनासमान देणार तुजसमान नाहिं नाहिं ।
गुणि या सुंदरवर कुंदरदन धर दंडविं दंडविं ॥कुज०॥३॥

पद २५ वें
उद्धवा ! सुखि आहे कीं । तो मनमोहन हरि माझा ? ॥ध्रुवपद.॥
उद्धवा ! जन्मला येथें । हरि पाहीं त्याची न्हाणी ।
या स्थळीं घातलें पायीं । कृष्णासी उष्ण मी पाणी ।
ऐकुनि त्या हरिसी छळिलें । गोपींचीं बहुत गार्‍हाणीं ॥
चाल ॥ पाठविला धेनूंपाठीं ।
त्याचि ही घोंगडी काठी ।
घालितां जेवुं या ताटीं ॥
चाल पहिली ॥ वदला मज पान्हा पाजा ॥उद्धवा०॥१॥
मृत्तिका भक्षितां मज कीं । धांवुनियां लगबग जाता ।
धांवुनियां धरितां वदला । अइ ! सोडीं मजला आतां ।
परि मारीं उखळीं बांधीं । दुष्ट मीं कैंची माता ? ॥
चाल ॥ तें दुःख आतां ओसणतें ।
स्मरतां मनिं हृदयीं हणतें ।
दुष्ट या भूमिवर म्हणते ॥
चाल पहिली ॥ असि नसेल दुसरी भाजा ॥उद्धवा०॥२॥
आंवरे न दुःख नंदासी । हंबरडा फोडुनि बोले ।
उद्धवा ! केवळ आमुचें । गोकुळिचें निज सुख गेलें ।
अक्रूरें दुष्टें कैसें । मोहक मज करूनी नेलें ॥
चाल ॥ उठ जेंवी आतां नंदा ।
म्हणे कोण अभाग्या मंदा ।
बोळवितां मीं गोविंदा ॥
चाल पहिली ॥ वदला मज मागें जा जा ॥उद्धवा०॥३॥
त्या गोकुळिंच्या मग नारी । उद्धवा बोलतीं भारी ।
मथुरेसि नेउनि कंसारी । आपुली कां आली स्वारी ।
हा प्राण आहे तों यावें । हें कळवा त्या अविकारी ॥
चाल ॥ तो कृष्णचि राजारामीं ।
पाववी प्रासादिक धामीं ।
राहिला स्वसुखविश्रामीं ॥
चाल पहिली ॥ मथुरेचा होउनि राजा ॥उद्धवा०॥४॥

पद २६ वें
तोचि काय मथुरेचा राजा । झाला काय मथुरेचा राजा ।
होता जो व्रजांत नित्य जात वरुनि म्हणति तक्र कुणि पाजा ॥ध्रुवपद.॥
रविजातटिं अन्नकवल सेवी न म्हणे चि शिळा ताजा ।
निज गोपांसि वदे न बसा कीं उठुनि गाई चारा जा ॥तोचि०॥१॥
दास्यकार्य करि आपण कुब्जा बटिक भली ती भाजा ।
काय तिचा बडिवार फारसा त्यजिल्या जिणें लाजा ॥तोचि०॥२॥
उद्धव शुद्ध वदे परि न पडे गोपवधूंच्या काजा ।
राजारामीं रत प्रासादिक स्वामी व्यापक माझा ॥तोचि०॥३॥

पद २७ वें
नको पदरा धरूं अम्हि व्रजवासि नारी ॥ध्रुवपद.॥
भयें विकलें कोठे म्हणुनि कळेना ।
कोण कोणाचा तूं अनावर होसि भारी ॥नको०॥१॥
सये ! कसला गे ! धीट याचि मोठी कटकट ।
दिनरजनीं असे लपुनि उभा द्वारीं ॥नको०॥२॥
नंदयशोदेसि हा लाविसि डाग कां ।
मत्सदनीं तरि म्हणविल काय सारीं ॥नको०॥३॥
राजारामिं लीन कीं होईं प्रासादिक ।
सोडीं पटा हटा नमितसें पूतनारी ॥नको०॥४॥

पद २८ वें
जा हरि ! माघारा अतां येतों असावि दया ती ॥ध्रुवपद.॥
हित गुज मज बोलत बसलासी । श्रम झाले बहु राती ॥जा०॥१॥
मित्र तुझा एक विप्र सुदामा । हृदयिं वसोत हिनाती ॥जा०॥२॥
राजारामी लीन प्रासादिक । सदया आलि दया ती ॥जा०॥३॥

पद २९ वें
यदुवीरा ! आतां नताला तारीं श्रमलों भारी ॥ध्रुवपद.॥
या भवसागरीं तुजसम सदया । कोणि दिसे न उतारी ॥यदुवीरा०॥१॥
मम दुरितक्षय करीं काष्ठाचा । चूर जसा कांतारी ॥यदुवीरा०॥२॥
मीपण पळवीं समज गुणात्मकीं । एक तुझी म्हातारी ॥यदुवीरा०॥३॥
राजारामीं कार्य प्रासादिक । झणिं करणी दातारी ॥यदुवीरा०॥४॥

पद ३० वें
स्मर दत्ताचे पाय । मनुजा ! ॥ध्रुवपद.॥
जन्मा येउन नरदेहाच्या । त्याविण सार्थक काय ?  ॥मनुजा०॥१॥
ज्याचें स्मरण न करितां प्राण्या ! । आयुष्य व्यर्थची जाय ॥मनुजा०॥२॥
राजारामीं लीन प्रासादिक । धन्य सद्गुरुमाय ॥मनुजा०॥३॥

पद ३१ वें
बाई ! यशोदे ! आज निरुपाय झाला ।
कृष्ण घडोघडीं छळितो आम्हाला ॥ध्रुवपद.॥
नवनीत शिरिं बाइ ! घेऊनि जातां ।
करितो आम्हांवरी भलतीच सत्ता ।
करिं बाई ! याच्या बंदोबस्ता ।
सांगुं किति गार्‍हाणीं सुत तुझा चळला ॥बाई०॥१॥
आजपासुनि बाई ! येईल गृहा हा ।
ताडीन मी याचा विचार पहा हा ।
कसें न म्हणसील बाई ! सदनींच राहा ।
पती माझा रागिट मारील याला ॥बाई०॥२॥
निशिदिनिं लागे हा आमुच्या छंदा ।
न सुचे आम्हांला गृहीं क्षण धंदा ।
सांगुं किती बाई ! दिवसांतुनि तिंदां ।
राजारामीं वसे प्रासादिकाला ॥बाई०॥३॥

पद ३२ वें
करवीरवासिनी आइ ! तुला कशि करुणा नये तरि ? ।
अंबा जगदंब भवस्तंभा क्षय करिल असा होता भरंवसा तो अजवरि ॥ध्रु०॥
चरणा शरणागत परि स्मरणातें नाणिशी हा न पडे कीं समज मला ।
जमला रस रिपुस माज मजवर तर दर नाश सुरवर नर जननि पहा ।
राजारामीं लीन प्रासादिक करिं धरिं ॥करवीर०॥१॥

पद ३३ वें
भज मन दक्षिणपति केदार ॥ध्रुवपद.॥
राजिवनेत्र सुवाजिवरि बसे । दीनाचा सरदार ॥भज०॥१॥
खङ्ग त्रिशुल धरि करिं धरि करिं जो । रत्नासुरसंहार ॥भज०॥२॥
राजारामीं लीन प्रासादिक । करितो जगदुद्धार ॥भज०॥३॥

पद ३४ वें
दत्तात्रय चतुराक्षरी मंत्र महा सर्वांसी ।
जप हा अखंड करणें जाणुनि नरतनु परवासी ॥ध्रुवपद.॥
दत्त बोलतां सहज जीवा होइल आनंद ।
दरिद्रदुःख ही जाउनि विलया होसी सुखकंद ।
दमयंतीसम पावसि कीं पुण्यश्लोकपद ।
दवडुनि अज्ञान जड तम हें करिं सत्संवाद ॥दत्तात्रय०॥१॥
तात जगाचा जो त्या गांवा त्रिगुणात्मक दत्ता ।
तापसजन विश्रांतिस्थाना हर्षद जो संता ।
ताल स्वर सह गानप्रिय यत्सर्वात्मकसत्ता ।
तारक नतसुखकारक करि जो षड्रिपुंच्या घाता ॥दत्तात्रय०॥२॥
त्रेधा सर्व निवारण होई पाहतां सुचरित्रें ।
त्रेपन्नामधें युग्म कमि अध्याय पहा नेत्रें ।
त्र्यंबक विष्णु ब्रह्मात्मक हे तोषति शमिपत्रें ।
त्रेसष्टांवरि एक अशा हि कळा तुज या स्तोत्रें ॥दत्तात्रय०॥३॥
यश प्रभूचें भावें गावें रूप हि तें ध्याय ।
यमदंड हि मग सहजें निरसे धरितां ही सोय ।
येवढें निज सुख दे गुरु जैसें मीनातें तोय ।
यत्सुख राजारामीं लीन प्रासादिक होय ॥दत्तात्रय०॥४॥

पद ३५ वें
राधा आली कृष्णाजवळी रथ त्याणें लोटिला हो ! ॥ध्रुवपद.॥
गोकुळांत क्रीडा करितो । गोपाळांसि लपणीं धरितो ।
शंख करें न करीं धरितो । हात लावि गोटिला हो ! ॥राधा०॥१॥
अक्रूराच्या करण्या ऐशा । नंदासि आवडल्या कैशा ।
यशोदेला तरि या ऐशा । काय बुद्धि खोटिला हो ! ॥राधा०॥२॥
त्यागुनियां आपल्या पतिला । शरण आल्या ज्या श्रीपतिला ।
वाटे त्याणीं माझ्या मतिला । ब्रह्मरस धोंटिला हो ! ॥राधा०॥३॥
गाइल्या ज्या सुख सद्दासी । कृष्णकथा प्रिय ज्यां त्यासी ।
राजारामीं लीन दासी । प्रसादाच्या कोटिला हो ! ॥राधा०॥४॥

पद ३६ वें
दत्तराज गुरो ! सुखधामा ! । सततकृतऔदुंबरविश्रामा ! ॥ध्रुवपद.॥
पडतिल कोणी अंतिं न कामा । स्त्री सुत काका मामा ॥दत्तराज०॥१॥
कोण दुजा दवडी भवपामा । सुंदर मेघश्यामा ॥दत्तराज०॥२॥
कां रे ! प्रसाद राजारामा । विनवी पावन नामा ॥दत्तराज०॥३॥

पद ३७ वें
जनिं भले भले बहु तरले अनुसरले भजनिं त्यजुनि योग विविध भोग म्हणति जनार्दना सनातन सुगम विचार हाच ॥ध्रुवपद.॥
सतत राम कृष्ण हा वदनिं जप हे करुणाघन हरि यदुपते मंदरधर कुंदरदन सुंदर विश्रांति हृदया परात्परा रमावरा करुनि असाच नाच ॥जनिं०॥१॥
ज्ञानदेव नामदेव तुकया नाथ कमाल कबीर नरहरी रंगनाथ आनंदमूर्ति जयराम रामदास केशव हेहि पांच ॥जनिं०॥२॥
म्हणुनि सार साधनांत नामचि गा सतत निज सुखद जन हो ! राजारामीं लीन प्रासादिक सुलाभ लाभ लांचला चुकवुनि काळ जाच ॥जनिं०॥३॥

पद ३८ वें
पंढरी दिनाची माय जींत सुखदायक रुक्मिणिनायकाद्य विभो जो सतत उरुगाय नांदे ॥ध्रुवपद.॥
द्विज शूद्र हि भोळे वारकरी । जाति पथिं वरती माधुकरी ।
खाति अमृत ते मानुनि भाकरी । वर मिरच्या मिळल्या हि कांदे ॥पंढरी०॥१॥
किति भीमा पाहतां नर नाहती । विष्णुचि ते होऊनि राहती ।
स्वेच्छा हि विचरते दृढ गमती । धन्य तेहि खगेंद्र खांदे ॥पंढरी०॥२॥
राजारामीं रत प्रासादिक । म्हणति निजभजनचि शिक ।
जिच्या करितां पतकरितां साधक । अधिक अधिक सत्संग सांदे ॥पंढरी०॥३॥

पद ३९ वें
हो सावध मनुजा ! लौकरी । वय पल जाय घडी ॥ध्रुवपद.॥
नेणुनि संसृतिचें ओझें । किति माझें माझें ॥
म्हणसि तुझें तुज परि साजे । मन कांहिं न लाजे ॥
वय दवडिसि दुर्मिळ खाजें । श्रुतिदुंदुभि वाजे ॥
चाल ॥ नायकसि म्हणुं तुज काय पशु जाण ।
लाभोनिया व्यर्थ होतें नरदेहाचें ठाण ।
दारापुत्र मारिताति वचनांचे बाण ॥
उठाव ॥ हें कां प्रिय तुज घर घर प्राण्या ! दृष्टि करीं उघडी ॥हो०॥१॥
यमलोकीं अथवा नाकीं । नेतिल तुज पहा कीं ॥
करितिल धन झांकाझांकी । पापपुण्य बाकी ॥
दारासुत तुजला टाकी । हें मनिं तूं स्मर कीं ॥
चाल ठेवितिना कोणी तत्वें गेलीं पांची पांच ।
तुझें कर्म तुजपाशीं त्यासि येतो नाच ।
बरें पाहें मागें पुढें तेथें मोठा जाच ॥
उठाव ॥ अनुताप मनीं धर धर प्राण्या ! बसविल काळ जडी ॥हो०॥२॥
अमंल मायेचा मोठा । करिल तुझा तोटा ॥
जरि अससी धाटा मोठा । या वितभर पोटा ॥
साठिं फिरवी पसरुनि ओठा । क्षण नाहिं विसोटा ॥
चाल ॥ परि बोल मनीं सितें त्यजुनियां हट ।
तरि भवजलतमिं होईल पहांट ।
राजारामीं लीन दिसे प्रासादिका वाट ॥
उठाव ॥ भगवंत यश मनिं भर भर प्राण्या । पावसि पैलथडी ॥हो०॥३॥

पद ४० वें
यदुराया ! ही लाज तुम्हांला ॥ध्रुवपद.॥
कोठें गुंतलासि द्वारकावासी ! । आला समय हा हृषिकेशी ! ।
तुजविण मी हें सांगुं कोणासि । देवा ! धांव आतां गहजप झाला ॥यदु०॥१॥
दीनवत्सल हि ब्रिदावळी गाजे । अनाथाचा नाथ नाम तुज साजे ।
बोल परिसा हे दयाघना ! माझे । सर्व परि आम्हां तुमचा दुमाला ॥यदु०॥२॥
भ्रमरासि जैसा असे मकरंद । तेंवि तुम्हांविणें आम्हां सुखकंद ।
रामारामीं लीन प्रासादिका छंद । पुरवाया हरि धांवुनि आला ॥यदु०॥३॥

पद ४१ वें
कां रे ! हरि मसि जाउं न देशी । जारे घरिं हरि ! कां हट घेसी ? ।
थारे नाहिम्त काय तुम्हांसि । बा रे ! पतिभय फार आम्हांसी ॥१॥
जाईं समजाविती कृष्णाला । आम्हीं वाट धरावी कशाला ।
तो हि गोकुळीं पालनवाला । साही त्रिभुवनपालनवासी ॥२॥
हाय हाय सोडीं पदर जातों धामीं । खाय खाय नवनीत घरिं घरिं नामी ।
काय काय म्हणुनि वदुं राजारामीं । जाय जाय सदनीं प्रासादिक येसी ॥३॥

पद ४२ वें
देवा ! कोण आतां तारी । धुंदी झाली दरबारीं. ॥ध्रुवपद.॥
पांडव तुज म्हणती खासा । दवडिसि त्यांतें वनवासा ।
छळि निशि येउनि दुर्वासा । परि तो पावे सुग्रासा ।
गोपी अनुसरल्या रासा । विरहें देसि तयां त्रासा ।
आवडे तुज कुब्जा नारी । धुंदी झाली दरबारीं ॥देवा०॥१॥
त्वन्मुखिं बकि कुचविष घोटीं । मानिसि देवकिसम पोटीं ।
ज्यांचीं आचरणें खोटीं । वदविसि तेथुनि शतकोटी ।
कीर्तनिं नारदरति मोठी । धड त्या न मिळे लंगोटी ।
असि काय चाल तुझी भारी । धुंदी झाली दरबारीं ॥देवा०॥२॥
त्वां जे भक्त विभो ! केले । ते विचित्र करिते झाले ।
कोणीं पशूंतें बोलविलें । अमृत मृतांतें सेवविलें ।
कन्ये पुंस्त्वचि लेवविलें । मृतपितरातें जेवविलें ।
मारुनि कां उठवा घारी । धुंदी झाली दरबारीं ॥देवा०॥३॥
अघटितघटनापटु देवा ! । नकळत लीलेचा ठेवा ।
इच्छि मन निज धन हिन ठेवा । यातें पदिं कां न च ठेवा ।
वद या राजाराम सेवा । पुरवीं प्रासादिक हेवा ।
घेउनि दाद भवा वारीं । धुंदी झाली दरबारीं ॥देवा०॥४॥

पद ४३ वें
प्रियधाम बहुत काम तुजसि राम फुकाचा ।
कां रे ! नाठविसी तूं हा उपदेश सुखाचा ॥ध्रुवपद.॥
ज्याचा पाय पडतां दगड दिव्यकाय झाला ।
वानुं काय स्वसुखदायक रघुराज याला ॥प्रियधाम०॥१॥
ऋषिसंग धरुनि रंग धनुभंग करोनी ।
अयोध्येस ये रमेश जनकजेसि वरोनी ॥प्रियधाम०॥२॥
गेल्या वक्त हेंचि तक्त न मिळे नक्त दिल्यानें ।
हरिसि आवडे भक्त बहु आसक्त मनानें ॥प्रियधाम०॥३॥
तरले भावुक किति दावुं चरित कां हो ! कळेना ।
असुनि ठाउक तुज हा उपाय कां हो ! जडेना ॥प्रियधाम०॥४॥
एक गोड नाम जोड सकळ सोड मदासी ।
राजारामीं लीन प्रासादिक पदासी ॥प्रियधाम०॥५॥

पद ४४ वें
काय मनाला संशय गमला सांग मला रघुराया रे ! ॥ध्रुवपद.॥
रुचिर मधुर कटु अम्ल कळाया चाविलीं बोरें निज दंतें रे ! ।
पक्षिउच्छिष्ट कशास आणिन मी रमाधवा ! तुज खाया रे ! ॥काय०॥१॥
क्षुधित असाल वनांत म्हणवुनि बहु फिरलें जगदीशा रे ! ।
धांवत आज परि भासतसे मज श्रम गेले कीं वांयां रे ! ॥काय०॥२॥
राजारामीं लीन प्रासादिक मग तीं बोरें भक्षितसे रे ! ।
भाग्यचि हें सुरगण म्हणति असा प्रसाद मिळाया रे ! ॥काय०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP