नारायणबोवाकृत पदें
अनेककविकृत पदें.
पद १ लें
हरि हर गुरुराज भजा यमपुरिभय वारा ॥ध्रुवपद.॥
प्रेमें हरिध्यान धरुनि नारायण बोला ।
संग त्यजुनि सगुण भजुनि रंग डंग डोला ॥हरि०॥१॥
विषय दुःखरूप सकळ तुच्छ भोग त्यागा ।
सद्गुरुपदकमल नमुनि अचळदान मागा ॥हरि०॥२॥
दारुणभय घोर पंथिं थोर दुःख झालें ।
कष्टुनि जडकर्म करुनि जन्मुनि बहु गेले ॥हरि०॥३॥
कर्म सांग घडे ऐसें पुण्य गांठिं जोडा ।
नारायण परं धाम सद्गुरुपद जोडा ॥हरि०॥४॥
पद २ रें
कैसा होऊं सद्गुरु ! उतराई । वाचे वर्णवेना तुझी नवलाई ॥ध्रुवपद.॥
उफराटें चालवी पायांवीण । कांहीं केल्या तो होऊं नेदी शीण ।
अनायासें दाखवी निज खूण । एकाएकीं जगभान केलें लीन ॥कैसा०॥१॥
जन्मोजन्मींचें दुःख विसरलों । परदेशीं आपल्या घरा आलों ।
बोध पुत्र देखतां सुखावलों । प्रेमानंदें निजनामामृत प्यालों ॥कैसा०॥२॥
निजकांता भेटली स्वानुभूती । सुखमंचकीं बैसतां ओंवाळी ती ।
सर्व भावें आवडी डोल देती । काय वानूं त्या स्वरूपाचि ख्याती ॥कैसा०॥३॥
निजरूप त्वां केलें चक्रपाणी ! । अगोचर ठेविलें निरंजनीं ।
नारायण करी तो विनवणी । देहावीण येतसे लोटांगणीं ॥कैसा०॥४॥
पद ३ रें
चाल चाल रे मना ! वना जाऊं । रम्य काननीं एकटें सुखी राहूं ॥ध्रुवपद.॥
पुण्यारण्याची महाशोभा पाहूं । शोभा पहातां श्रीहरिगुण गाऊं ।
वन्य तरूंची सुपर्ण फळें खाऊं । इच्छाविहारि त्या मृगासंगें धावूं ॥चाल०॥१॥
दिव्य सरितांचें जळ तृष्णाहारी । मलय मारुत हा स्वयें वारा वारी ।
पर्णशय्येतें मृदु निद्रा करी । स्थिर राहे अंतरीं धीर धरी ॥चाल०॥२॥
रात्रीं लावूं सोज्ज्वळ चंद्रदीप । विरक्ति कांतेचें पाहूं गौर रूप ।
रूप पाहातां आलिंगी आपोआप । दूर करिते स्वयें सर्व ताप ॥चाल०॥३॥
ऐशा सुखाची त्या वनीं आहे खाण । तेथें राहतां सांपडे त्याची खूण ।
नेटें बोटें दाखवी नारायण । अंगें भेटवी तो सखा निरंजन ॥चाल०॥४॥
पद ४ थें
या रे ! या रे ! सद्गुरूच्या गह्रीं जाऊं ।
प्रेमभक्तीचा सोहळा डोळां पाहूं ॥ध्रुवपद.॥
प्रेमानंदें सर्वदां तेथें राहूं । सर्व भावें तयचे गुण गाऊं ।
तन मन हें धन तया देऊं । त्याचे चरणीं लागतां सुखिया होऊं ॥या रे०॥१॥
शरण जातां अपार दुःख नेतो । निजरूपीं पामरा ठाव देतो ।
डोळे भरूनी श्रीहरी दाखवीतो । परब्रह्मींची सुधा चाखवीतो ॥या रे०॥२॥
सद्गुरुरायाशिं मोठा कळवळा । निजबोध सांगतो वेळोवेळां ।
शांत करी संसार ज्वर ज्वाळा । जया अंगीं वागती सर्व कळा ॥या रे०॥३॥
नका नका रे ! धरूं अनुमान । स्वयें भक्तांसी करी निरंजन ।
याची ग्वाही देतसे नारायण । मिथ्या होय तरि कापा माझी मन ॥या रे०॥४॥
पद ५ वें
कैसा तरि हरी किंकर तूझा । गुरु ! करीं कर धर माझा ॥ध्रुवपद.॥
तव गुण गणितां फणिवर शिणला कवणा पार न लागे ।
ऐसा प्रभु जाणोनि दीनदयाळु सभय अभय तुज मागे ॥कैसा०॥१॥
दोषी कुटिल कलंकी कामी पामर जड अन्यायी ।
सदय हृदय तव जाणुनि सखया ! पडिलों तुझिये पायीं ॥कैसा०॥२॥
हाल हरामी मन तव नामीं न जडुन विषयीं धांवे ।
पंचमहा किती कोटी पापी परी विकलों तुझिया नांवें ॥कैसा०॥३॥
धांवुन येशी अभय मज देशी तरि मायाभ्रम नासे ।
मनिं विश्वार आस चरणाची नारायण कासे ॥कैसा०॥॥४॥
पद ६ वें
जातें बाई ! माहेरा मूळ आलें । सद्गुरुमाये आवडि बोलाविलें ॥ध्रुवपद.॥
बहु चिंता गांजिती सासुबाई । दुःख फार साजणी करूं काई ? ।
राहवेना अंतरीं धीर नाहीं । माय बहिणी ओळखी असूं द्यावी ॥जातें०॥१॥
आशा तृष्णा ह्या माझ्या जावा नणदा । रात्रंदिवस दाविती नानाछंदा ।
काय सांगूं यांच्या मि परफंदा । आतां करवेना हा घरधंदा ॥जातें०॥२॥
अवघड माहेराचि ही देहवाट । भावा संगें चालणें मला नीट ।
रुद्रगिरीचा तो चढोनियां घाट । गगनपंथें आतांचि जाणें नीट ॥जातें०॥३॥
एका चित्तें जातसें परगावीं । वाटे जातां भूलवि माया देवी ।
नारायण तेथिंचा पंथ दावी । अंगें भेटवी तो सखा निरंजन आई ॥जातें०॥४॥
पद ७ वें
आज मुरली गोविंद वाजवितो ॥ध्रुवपद.॥
लोक म्हणति हा वेणु नव्हे बाई । वेणुनादें चेटक ऐसें काई ।
शुष्केंधन काष्ठांत नीर वाही । कैंचा आतां स्वैंपाक सासू बाई बाई ॥आज०॥१॥
स्वयें मुरलीनें योग कोणें केला । जेणें लोभे हरिहस्त बैसायाला ।
नेणें हरिचा मुखचंद्र चुंबियेला । तुच्छ गमली मागील रम्य लीला लीला ॥आज०॥२॥
मधुर मुरली ऐकतां चित्त मोहे । चित्र जैसें तैसेंच उभें राहे ।
ऐसें चैतन्य जड नीर वाहे । पहा वेणूंत कोणीं काय आहे आहे ॥आज०॥३॥
एक म्हणती ही सवत कोठें होती । प्रेम फांसा घालूनी घर घेती ।
पिसें वेडें लावुनी वनीं नेती । ह्मणे नारायण कृष्णसंग देती देती ॥आज०॥४॥
पद ८ वें
तो सद्गुरु परब्रह्म तो हरि शिवयोगी ॥ध्रुवपद.॥
सदय हृदय अभय वरद मृदु मंजुळ बोले ।
विषम विषय वमुनि गरळ सरळ सहज डोले ॥तो०॥१॥
सगुण सुमन अगुण अमन सचराचरवासी ।
निगम गमन वसन गगन शीतळ सुखराशी ॥तो०॥२॥
निकट वसे प्रकट नसे गुण लक्षण कांहीं ।
सुगम सुमति निगम वदति अंतपार नाहीं ॥तो०॥३॥
नारायण पूर्ण काम अंतरसुख भोगी ।
जाति शरण ध्याति चरण तरतिल भवरोगी ॥तो०॥४॥
पद ९ वें
सोहं चांदणी । चांदणी ग साजणी ! ।
गुरूंनीं दाखविली नयनीं ॥ध्रुवपद.॥
हृदय सत्वाचे । सत्वाचे आकाशीं ।
उगवला उडुपति पुनवेशीं ॥
शुद्ध कैवल्य । कैवल्य सिंधुवासी ।
देखिला समतेजोराशी ॥
लोपल्या तारा । तारा ग ! तेजासी ।
लगटल्या शीतळ किरणासी ॥
शुभ्र बिंबाचे । बिंबाचे अवकाशीं ।
गवसला पूर्ण योगियासी ।
राजयोग्याची । योग्याची योगरजनी ॥गुरूंनीं०॥१॥
गगनीं चंद्राचे । चंद्राचे अंगीं पुरती ।
पसरली दश द्वारावर्ती ॥
द्विदळ चक्राचे । चक्राचे दळीं वसती ।
भ्रमरगुंफेंत राहे पुढती ॥
हंस पुरुषासी । पुरुषासी संग करिती ।
ब्रह्मरंध्रिचें भुवन भरिती ॥
नादबिंदूच्या । बिंदूच्या कळा भवती ।
सकळ ब्रह्मांड भरुनि उरती ॥
पंच रंगांचे । रंगांचे शुद्ध अंगणीं ॥गुरूंनीं०॥२॥
उठवर पाहतां । पाहतां परतोन ।
सहज तनु गेली हरपोन ॥
शेज शून्याची । शून्याची मनोहरिणी ।
सघन आनंद कंद परणी ॥
सुगम एकांत । एकांत वद वर्णी ।
सगुण चंद्राशीं झालि मिळणी ॥
परम सुख झालें । झालें ब्रह्मभुवनीं ।
सखे बाई ! वदवेना वदनीं ॥
नवल सद्गुरुची । सद्गुरुची करणी ॥गुरूंनीं०॥३॥
प्रकट निजवस्तु । वस्तु चांदणी ।
फांकल्या प्रभा ग ! चिद्गगनीं ॥
शबल मुळ माया । माया मोहिनी ।
सिद्ध योगींद्रचित्तरमणी ॥
सकळ विश्रांति । विश्रांति भोग भवनीं ।
त्रिगुण जड जीवतापशमनी ॥
गहन संसार । संसारसिंधुतरणी ।
दत्तगुरु नारायण चरणीं ॥
जन्ममरणासी । मरणासि सोडि पाणी ॥गुरूंनीं०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 18, 2017
TOP