मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
राघवकविकृत पदें

राघवकविकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
कां राम म्हणाना हो हो हो ! ॥ध्रुवपद.॥
उफराट्या मंत्रें वाल्मीक । ज्याला कविराणा ॥कां०॥१॥
नामें गणिका पावन जाली । नेली निजसदना ॥कां०॥२॥
सच्चित्सुखकर राघवमूर्ति । पाहूं तुज नयना ॥कां०॥३॥

पद २ रें
उद्धवा ! ऐक कृष्णाची लीलारती ।
उबगोनि कसा मज गेला मथुरेप्रती ॥ध्रुवपद.॥
रक्षिलें बहु वणव्यांत रवीजाथडीं ।
गोवर्धन धरिला इंद्र वर्षतां झडी ।
यमुनेंत बुडाले नंद मिळेना कुडी ।
काढियलें निजपुरुषार्थें घालुनि उडी ॥
चाल ॥ यात्रेंत भुजंगें गिळितां प्राणेश्वरा ।
धांवोनि बळें सोडविलें त्या अवसरा ।
अहिदेहांतुनि उद्धरिलें विद्याधरा ॥
उठाव ॥ आठवूं किती उपकारा नाहीं मिती ।
सद्गदित विलापे माय यशोदा सती ॥उद्धवा०॥१॥
मंथितां दधि स्तनपान देइं मज म्हणे ।
टाळिला हरी म्यां व्यर्थचि नेणतपणें ।
फोडिलीं भाजनें तक्रादिक त्या गुणें ।
उखळाशि तया म्यां केलें बंधन गुणें ॥
चाल ॥ अन्यायी जळो हे हात, बांधिला कसा ।
म्हणऊनि विघड घडिला हरिणिपाडसा ।
कृष्णा कृष्णा ये करितां बसला घसा ॥
उठाव ॥ नेणवे पूर्वजन्मांतरिची दुर्मति ।
प्रारब्धयोग कर्माची दुस्तर गती ॥उद्धवा०॥२॥
हा क्रू महा अक्रूर येउनी छळें ।
उचलोनि कवळ पात्रींचा नेला बळें ।
निर्दयी कठिणही केवळ यादवकुळें ।
व्रज दीन दिसे कीं व्याकुळ कृष्णामुळें ॥
चाल ॥ वसुदेवा ठकिलें पूर्ण कळालें मशीं ।
पाळियला म्यां, तूं पुत्रवंत ह्मणविशी ।
उपजला नुपजला नकळे माझे कुशी ॥
उठाव ॥ हे नव्हे सांवळ्या उचित क्रियेची रिती ।
लय लावुनि कैसा अंत पाहशी अती ॥उद्धवा०॥३॥
ऐकुनी शोक उद्धव बोले आयका ।
श्रम फार वृथा शरीराशीं देऊं नका ।
तो परब्रह्म हृदयस्थ असे ठाउका ।
भ्रम मोहपणें मग वाढवितां कां फुका ? ॥
चाल ॥ आनंद असावा भजनीं मन लावुनी ।
यायोगें संनिध हरि तुमच्या निशिदिनीं ।
ऐसाचि असावा भावें निश्चय मनीं ॥
उठाव ॥ जाहला शांत संताप पावली स्थिती ।
राघवा घडो अशि धन्य साधुसंगती ॥उद्धवा०॥४॥

लावणी १ लीं
कां रे ! करुणा तुला येइना किति तरी विनवूं हरी ! ? ।
कैसा मज अतिहीनदीन परि केला जगदंतरीं ? ॥ध्रुवपद.॥
तुजविण जिव तडफडतो व्याकुळ धीर धरावा कसा ।
आश्रित मी प्रतिपाळक तूं जननीप्रति बाळक जसा ॥
नसे कोणी सहकारि, जनांचा किमपि नाहिं भरंवसा ।
उपहासति परि दिसे न कोणी पक्षपात करि असा ॥
भाग्यहीन जाहल्या जनामधिं धडचि बोलती पिसा ।
दशा ज्याशि तो सहजचि शाहणा मान्य होतसे ठसा ॥
चाल ॥ बहु वित्त नसे मद्गृहीं श्रीधरा रे ! ।
विद्या न भक्ति संग्रहीं श्रीधरा रे ! ।
पडिलों य अभवनिग्रहीं श्रीधरा रे ! ॥
उठाव ॥ कर्म सांग न घडे तव सेवनअर्चनादि निज घरीं ।
सदा आळशी, आमयतय, त्वद्गुण न वदे वैखरी ॥कां रें !०॥१॥
घाबरतो हा आत्मा याची कशि कळ तुज येइना ।
त्वदंश हा त्वद्वाक्य साक्ष भगवद्गीता परकि ना ॥
तिळ तिळ गोष्टीसाठिं शरण किति जावें कीं लघुजनां ।
घटे महत्त्व परंतु तुटेना आस, कार्य होइना ॥
वृथा द्वेष धरुनियां पाहती छिद्र कोणि झांकिना ।
लपावया श्रीपति न सांपडे स्थळ कोठें तुजविना ॥
चाल । कां दगदग माझ्या जिवा माधवा रे ! ।
न पडेच चैन निशिदिवा माधवा रे ! ।
करूं काय मी हर हर ! शिवा ! माधवा रे ! ॥
उठाव ॥ कशी फजीती मांडियली कां कोपशि दासावरी ? ।
विटंबितों मी यांत काय संतोष तुझ्या अंतरीं ॥कां रे!०॥२॥
तूं करुणेचा सागर त्यांटुनि बिंदुमात्र कां नसे ! ।
असा काय अन्याय सख्या हरि ! तुजप्रति माझा दिसे ? ॥
कीं अदयाग्नीनं करुणेचें शोषण केलें असे ।
म्हणुनि उगा राहाशी ऐकुनी बोधरूप युगवशें ॥
याचि युगीं कैकाशि तारुनी संकट वारित असे ।
अतां काय सोडोनि बैसलां ? तेंचि विरुद्ध, हो ! कसें.॥
चाल ॥ मी दास म्हणवितों तुझा केशवा रे ! ।
नको भाव आठवूं दुजा केशवा रे ! ।
मज दुर्बळाची हे पुजा केशवा रे ! ॥
उठाव ॥शरणागत सर्वस्व ठेवतों मस्तक चरणावरी ।
किती अंत पाहशील कृपाळा ! धांव धांव झडकरी ॥कां रे!०॥३॥
दाही बोतें मुखीं घालतों, पदर पसरतों तुला ।
क्षमा करीं सर्वपराध तूं नको उपेक्षूं मला ॥
असेंचि तुज कर्तव्य तरी हा देह कां रे ! निर्मिला ? ॥
रिझ सोंगा या कीं न आणवीं हे अनुचित नतकला ॥
पदोपदीं चुकविशी बुद्धि कां रोष अंगिकारिला ? ।
तुझेंचि तुज हीनत्व, तूंचि कर्ता लोकत्रय भला ॥
चाल ॥ अधिकार नाहिं मजकडे राघवा रे ! ।
ना स्वतंत्रता मज घडे राघवा रे ! ।
नको लावुं खळांचे खडे राघवा रे ! ॥
उठाव ॥ गगन कडकडुनि पडे संग मी तुझा सोडिना तरी ।
बोलवेना राघवाशि देवा ! जें इच्छिशि तें करीं ॥कां रे !०॥४॥

आरती १ लीं
जय देव जय देव विठ्ठल मम बंधू ।
वदनिं वदुनि, ओंवाळा प्रभु करुणासिंधू ॥ध्रुवपद.॥
आला पुंडलिकास्तव समपदिं विट धरिली ।
कर कटिं युग अठ्ठाविस निकटस्थिति वरिली ।
नव निधि अष्टहि सिद्धि प्रगतति आदरली ।
संपति वैकुंठाची पुरिं पंधरिं भरिली ॥जय०॥१॥
गरुड मरुत्सुत तिष्ठति रुक्मिणिसह माता ।
तुळशि बुका तनुवरि अति मंडित गुणदता ।
प्रेमळ साधुजनाचा निर्गुणचिद्भ्राता ।
श्रीपांडुरंग सद्रक्षण न नान असे त्राता ॥जय०॥२॥
रंगशिला नाचाया न्हाया शशिभागा ।
भक्ष्यप्रसाद जेथें रहाया पुरि जागा ।
पहाया मूर्ति हरिची गाया गुणरागा ।
ऐशा विभुपदिं झगटुनि भक्ति प्रिय मागा ॥जय०॥३॥
स्वप्निं प्रबोधिनीची लागे बहु यात्रा ।
देतां भेट न लाजे हरि सदसत्पात्रा ।
सीताहरण नामांबर सुरनरमुनिगात्रा ।
राघव - भव - गद - नगवरि पवि विठ्ठलमात्रा ॥जय०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP