मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
नरहरिकविकृत पदें

नरहरिकविकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
माझ्या सिद्धिविनायक मंगलमूर्ति मोरया हो ! ॥ध्रुवपद.॥
संकटिं सुरअसुर तूज ध्याती । पूजन करिती आदिमूर्ति ।
हरिती संकट वरती सिद्धि थोर, या हो ! ॥माझ्या०॥१॥
मूषकवहना निजसुखगहना । स्मरणा भवजलपारउतरणा ।
जन्ममरणदुरकरणा अद्भुत घोर या हो ! ॥माझ्या०॥२॥
एकदंत श्रीमंत उदारा । भालचंद्रधर बुद्धिविहारा ।
नरहरि करितो करुणा चरणिं किशोर, या हो ! ॥माझ्या०॥३॥

पद २ रें
श्रीसद्गुरुनाथा ! । तुजप्रति शरणागत आतां ।
धन्य धन्य त्वां केलें ठेविन तव चरणीं माथा ॥ध्रुवपद.॥
दयासिंधु स्वामी । सुखदायक आत्मारामें ।
म्हणउनि सुरवर स्तविती महिमा अद्भुत नामीं ।
सुखसिंधूचे ग्रामीं । मन हें लाविसि आरामीं ।
भवसिंधु पार उतरा महिमा हे पदपद्मीं ।
म्हणउनि गरुडगामी । सांदीपनगृहकामी ।
केले नाना परिचे अतिबोधें विश्रामी ।
दाशरथी रामीं । शरणागत ऋषिधामीं ।
योगवसिष्ठसमाधी लागली अंतर्यामीं ॥
चाल ॥ अहो ! ब्रह्मा हा श्रीहरिला ।
विष्णु शिविं शरण रिघाला ।
शक्तिनें शंभु स्तविला ।
गुरुगीता क्रम प्रकटविला ॥
उठाव ॥ ऋषिमुनिजन या मार्गीं । सेविती गुरुपद निजयोगी ।
शुकसनकादिक मुनि तरले चालविला क्रम पुढता ॥श्रीसद्गुरु०॥१॥
तूं के(कीं) ‘ तत्त्वमसि ’ । महावाक्य ध्वनि ऐसी ।
गाजविला हा शब्दु ‘ नेति नेति ’ म्हणति श्रुतिसि ।
महिमा वदतां ऐसी । शिणला स्तवितां सहस्रशिशी ।
जिव्हा झाल्या भिन्न साक्षत्वें हें परिसी ।
अलक्षलक्ष तुजसी । न कळे मनबुद्धि वचसि ।
अपरंपर पूर्णनिधाना जिवशिव परंतु अससी ।
सत्तेनें चालविसी । तूं चैतन्या चेतविसी ।
परि कर्तृत्वाविरहित तूं हे खूण घडली ऐसी ॥
चाल ॥ अहो ! जाणती साधु स्वरुपीं ।
बुडि देउनियां चिद्रूपीं ।
लवणापरि मिळती आपीं ।
त्याहुनि पर नव्हति कदापी ॥
उठाव ॥ जन्म मरणभाव । अवघा समूळची वाव ।
नरहरिलागुनि न दिसे श्रीगुरुविण ठाव रिता ॥श्रीसद्गुरु०॥२॥

पद ३ रें
या दुःखरूप संसारीं । हरि ! मज तारीं ॥ध्रुवपद.॥
मी माझें हें कैसें होईल । चिंता निशिदिनिं भारी ॥या दुःख०॥१॥
भजन पूजन इत्यादिक न घडे । इंद्रिय व्याकुळ सारीं ॥या दुःख०॥२॥
अनन्यभावें पदिं शरणागत । नरहरि हाका मारी ॥या दुःख०॥३॥

पद ४ थें
सावळ्या ! राघोबा ! रामा ! ये रे ! । मज भेट दे रे ! ॥ध्रुवपद.॥
लवपल तुजवांचुनि कठिण जाय । घटिका युग पाहे ।
बाळालागुनि जैसी माये वियोग न साहे ।
येथें विश्रांति दुसरी नसे रे ! ॥मज०॥१॥
जन्मोजन्मींचे विसरे दुःखी । संसारचि निरखी ।
आतां या नरतनुला अवलोकी । तारक हे लोकीं ।
चुकवी चौर्‍यांशीं जन्म फेरे ॥मज०॥२॥
धांवाधांवी बापा ! करि आतां । तुज येउं दे ममता ।
ब्रिदयायी ( बिरदायित ? ) म्हणुनी दीननाथा । आळवी तुज नाथा ।
दासा नरहरिसी, कोण दुजें रे ! ॥३॥

पद ५ वें
पायीं दिधला पिंड । आतां दंड नाहीं रे रघुराया ! ॥ध्रुवपद.॥
आधीं मी अपराधी तरि कां केला अंगिकार ? ।
अंगिकार केलिया आतां कासया विचार ? ॥पायीं०॥१॥
संसाराची सखी म्यां तव आप्त केली ।
शेखीं या भुवना टाकुनि गेली ॥पायीं०॥२॥
अन्यायी अपराधी ह्मणउनि हाका मारी ।
नरहरि मालो ? रंक ज्ञारी ? तुझा रे श्रीरामा ! ॥पायीं०॥३॥

पद ६ वें
माझ्या सावळिया श्रीरामा राजिवलोचना रे ! ॥ध्रुवपद.॥
सीतापति शरयूतिरवासी । योगीमानसकमलप्रकाशी ।
कासी धरि त्या भवनिधिपारउतारणा रे ! ॥माझ्या०॥१॥
रविकुलभूषण जगदुद्धारा । नामें शंकरदाहविदारा ।
उलटे भजनें करि वाल्मिक पावना रे ! ॥माझ्या०॥२॥
पाशीं गुंतलों ह्या भवजाळीं । टाळी दुस्तर ते हे वेळीं ।
भाळीं वंदुनि नरहरि करितो करुणा रे ! ॥माझ्या०॥३॥

पद ७ वें
राघवा ! परम दयाळा हो ! त्रिभुवनपाळा ! ॥ध्रुवपद.॥
हे करधृतकार्मुकबाणा । श्यामलवाना(णा?) ।
योगीजननिधिहृद्भुवना, । कोमलचरणा ।
पीतपटकसना, मंडितभूषणा, प्रसन्नवदना, अवलोकितमुखभाळा ॥राघवा०॥१॥
हे शरयूतीरनीवासा । मंजुळहासा ।
नामें शम दाह महेशा । हो उभय (?) पुरुषा ।
वेद श्रुति गति, कुंठित हे रिति, ‘ नेति ’ ‘ नेति ’ इति, श्रुतिमुखिं फणिपाळा हो ! ॥राघवा०॥२॥
श्रुत नाम हरिल भवतापा । हो अब्जजबापा ! ।
विधिब्रह्मसुखामृतमापा । गति अनुतापा ।
हे भुवनेश्वर !, षड्रिपु दुस्तर, त्राहे त्राहे नरहरि वंदित भाळा हो ! ॥राघवा०॥३॥

पद ८ वें
भक्तकामकैवारी माय कनवाळु पांडुरंगा ! ।
भीमातटीं पुंडलिका भेटी कटि कर जिवलगा ॥ध्रुवपद.॥
परब्रह्म निजरूप निरामय श्वसवैद्यजका (?) ।
भरोनि उरले स्थावर जंगम देखा ।
अनंत अनंतमुखें स्तवितां शिण हा होत मुखा ।
भूमीपत्रीं सिंधमसि न घडे चित्रगुप्तलेखा ॥
चाल ॥ स्वामी तूं अखंड अद्वय निरुपाधी ।
परिपूर्ण परात्पर दासा दयानिधी ।
तुज साम्य नसे उपमा या द्वैतविधी ।
निजस्वरुपीं अवसर न घडे मनबुद्धि ॥
उठाव ॥ जेथें परा पश्यंती वाचा खुंटित का ।
‘ नेति ’ ‘ नेति ’ म्हणउनि महारस जाला पुढति मुका ।
येईं झडकरीं लागवेगा ॥भक्तकाम०॥१॥
स्वामी ! तूं पंचविधा अवतारीं ।
कल्पित करुनि माया ब्रह्मांडाचीं भरोवरी ।
विराटस्वरूपाची थोरी ।
अतल वितल पाताळें सप्तही होती जानुवरी ।
सप्तही समुद्र हे जठरीं ।
वनस्पति रोमावळी, दशदिश श्रोत्राची कुसरी ।
चंद्रसूर्य हे नेत्रद्वारीं ।
यमदंष्ट्रा जठराग्नि रसना वरुण शक्रचि करी ॥
चाल ॥ हे स्थूळ तुझे सूक्ष्म हिरण्यगर्भ ।
व्यापक तूं विष्णु दैवत स्वयंभ ।
.............................................. ।
सात्विक गुण स्वप्नावस्थेचें डिंभ ॥
उठाव ॥ दिसे उकार यजुर्वेद शोभा ।
कारणिं महाकारणिं हा भरला चिद्गगनीं गाभा ।
योगिजनप्रतिति अंतरंगा ॥भक्तकाम०॥२॥
विश्वस्थितिपालन हे लयलीला ।
विवर्त तुझिये ठायीं मायादृष्टिनें दिसला ।
मिथ्या आरोपित सगळा ।
स्थाणुचोरन्यास भुजंगरज्जुवत गमला ।
भासे भ्रम अज्ञानाला ।
विपश्चितासि नसे एकचि दिसे रूप सगळा ।
वलयांकित अवघा गोळा ।
समसमानता विलसत योगीजन अद्भुत लीला ॥
चाल ॥ साकार पाहती परि निराकार भासे ।
चित्प्रकाश अवघा आनंद विलसे ।
सोडोनि भेद पाहती ते तुज ऐसे ।
आत्मत्वें विठ्ठलरूपीं द्वैत नसे ॥
उठाव ॥ देवभक्तपण स्वामी सेवा महिमा ।
दिसावया जडमूढतारक सर्व तुझा गरिमा ।
नरहरि विनवि दिव्यलिंगा ॥भक्तकाम०॥३॥

पद ९ वें
नारायण चतुराक्षर सर्वा मंत्रांचा राजा ॥ध्रुवपद.॥
नाम सुखी हें वदतां प्रर्‍हादा, संकट नाना ।
नासुनियां रक्षियलें अग्निजळविषनगपतना ।
नाग अहि शस्त्रादिक मारिति परि निर्भयचि मना ।
नानापरि पितयानें पुसतां स्तंभीं अवतीर्णा ।
उठाव ॥ नाभी चिरुनि दैत्यद्विजा ॥नारायण०॥१॥
राम नाम हें जपतां वाल्मिक पावे उद्धरा ।
रामपदीं रजस्पर्शे पावन करि गौतमदारा ।
रावण कुंभकर्णा भक्ति मुक्ति निजवैर्‍या ।
राज्य हेमनगरीचें दिधलें बिभीषणा असुरा ।
उठाव ॥ राघविं अवडी अंजनिजा ॥नारायण०॥२॥
यमुनेंतुन काढियला भुजंग भ्यासुर काळिये ।
यज्ञेश्वर हा गिळिला द्वादश गांवें अतिप्रळये ।
येकनखीं गिरि धरिला गोकुल व्याकुळ इंद्रभये ।
येउनियां मथुरेश्वर मारुनि निर्भय ते अभय ।
उठाव ॥ यशस्वी स्थापुनि सर्व प्रजा ॥नारायण०॥३॥
नक्र गजेंद्रें स्तवितां चक्रमुखावरि सुदर्शन ।
न भव त्यासि पुनरपि मोक्ष दिधला आत्मभुवन ।
नमोस्तु ते जगदीशा प्रेमें भजनीं लावि मन ।
न............................................................न ।
उठाव ॥ नरहरि आवडी अधोक्षजा ॥नारायण०॥४॥

पद १० वें
भड भड नेत्रीं ज्वाळ तनू विक्राळ काळ गमला ।
कड कड होती शब्द विदारुनि स्तंभ [ चिरुनि आला ] ॥ध्रुवपद.॥
भूधर दचकुनि महिषावरी पावुनी कूर्म भया ।
उलंडुं पाहे सिंधु रिचविती नक्षत्रें भुमिया ॥
डोले गिरि कैलास अपर्णा धरि दृढ शिवराया ।
वैकुंठीं श्रीविष्णु लक्ष्मी धरि आळं(आलिं?)गुनियां ॥
वर्तितला आकांत दिसे कल्पांत जवळी आला ॥कड कड०॥१॥
विशाळ जाळी हाक धाक ऐकोनि सत्यलोकीं ।
थर थर कांपति दिग्गज तेजें लोपे भानुलोकीं ॥
सिंहवदन बहु उग्र कोपला कोण तया निरखी ।
कर कर दाढा चावित लळ लळ रसना अवलोकी ॥
मिशा पिंगटा जटा लांब संभार शिरीं धरिला ॥कड कड०॥२॥
स्तंभापासुनि घेत उडी आकाशीं जाय वेगें ।
आलासे महीवरी धरित लौकरी दैत्य राघे ॥
मध्यद्वारिं बैसोनि पालखा परि निजवुनि जांघे ।
करनखिं उदर विदारुनि घाली अंत्रमाळा स्वांगें ॥
भक्तसंकटावरी म्हणे नरहरि हरि अवतरला ॥कड कड०॥३॥

पद ११ वें
येईं येईं रे ! गोवर्धनगिरिवरधारणा रे ! ॥ध्रुवपद.॥
क्षीरसागर उपमन्यूलागीं । धर्माघरिचें उच्छिष्ट आंगीं ।
काढी हे हे भक्तजनप्रतिपालना रे ! ॥येईं०॥१॥
शंखासुर नेतचि विधीला । होउनि मत्स्य प्रवेश केला ।
करुनी दानवमर्दन वेदोद्धारणा रे ! ॥येईं०॥२॥
ऐसा तूं त्रैलोक्यनायका । भक्तिबळें बांधिती गोपिका ।
भावें वंदन करितों नरहरि करुणा रे ! ॥येईं०॥३॥

पद १२ वें
वंदा गोविंदा माधवा आनंदकंदा ! ।
नंदात्मजगुणानुवादा छंदा हा लागो धंदा. ॥ध्रुवपद.॥
सारासार विचारुनि दाराधन न मनीं ।
वारा विषयाचा वारुनि तारावें अवनीं ।
सारासार हा ऐसा मित्या समजोनी ॥वंदा०॥१॥
मानापमान पाहतां सानादिक समता ।
सान थोर भासतां जाणा माइकता ।
या नामें नरहरि माले म्हणतां सद्याग पुरता ॥वंदा०॥२॥

पद १३ वें
आली कोल्हाटिन खेळाया । सगुण गुणमाया ॥ध्रुवपद.॥
प्रपंचाचा रोविला वेळू । महाशून्यांत मांडिला खेळू ।
ब्रह्माविष्णु जियेचे बाळू । चला जाऊं पहाया ॥आली०॥१॥
आला निर्गुणाचा कोल्हाटी । सोऽहं शब्द ढोलक पीटी ।
उघडुनि चैतन्याची ताटी । चला जाऊं पहाया ॥आली०॥२॥
त्रिकुट त्रिहाट गोल्हाट । वरी साधिलें औटपीठ ।
भ्रमरगुंफेचा शेवट । चला जाऊं पहाया ॥आली०॥३॥
कोल्हाटिन बैसलीसे डोळां । जाणे गुरुपुत्र आगळा ।
नरहरि बोधाचिया लिळा । चला जाऊं पहाया ॥आली०॥४॥

पद १४ वें
भक्तांचा कृपाळु हरी वाट पाहे विटेवरी ।
सच्चिद्धनरूप जाणुनि ध्याती उभा भिवरेचे तीरीं ॥ध्रुवपद.॥
सुरवर मुनिवर स्तविती ज्याला । यशोदेचा बाळ झाला ।
गोपिकांच्या सदनिं जाउनि नवनीताचि चोरी करी. ॥भक्तांचा०॥१॥
शुकसनकादिक ज्याचे देव । प्रगट झाले स्वयमेव ।
सारथि होउनि समरंगणिं तो अर्जुनाचें दास्यत्व करी. ॥भक्तांचा०॥२॥
बोले देवतयानें नरहरि । आपुलें महत्व सांडुनि दुरी ।
नाथाघरिं तो आवडीनें कावडीनें पाणी भरी ॥भक्तांचा०॥३॥

पद १५ वे
देवी श्रीत्रिपुरसुंदरी । माय ? पाव लौकरी ॥ध्रुवपद.॥
भवपाश बांधोनि । पडिलों मी महारणीं ।
काढीं तूं यांतुनि । झडकरी ॥माय०॥१॥
अंबे ! तूं अभयकरी । नरहरिसी हृदयिं धरीं ।
संकट दूर करीं । देईं निजठाव पाव ॥माय०॥२॥

पद १६ वे
चंडे ! चाळविशी जग सारा । मांडुनि महता महत पसारा ॥ध्रुवपद.॥
निर्गुण गुण तूं होसी माय । विधि हरि हर तवपासुनि पाहें ॥चंडे०॥१॥
एकचि परि तूं आणिक भासे । जेंवी घट मठ महद विकासे ॥चंडे०॥२॥
मिळवुनि पंचभूतांचा हा मेळा । खेळसि नानापरिंचे तूं खेळा ॥चंडे०॥३॥
न कळे पार तुझा तुजवांचुनि । विलासे नरहरि हृदयीं विलासे ॥चंडे०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP