मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें| सुभरावबावाकृत पदें अनेककविकृत पदें अनुक्रमणिका आदिनारायणकृत पदें निजानंदस्वामिकृत पदें शिवदिनकेसरीकृत पदें रंगनाथस्वामिकृत पदें शिवरामस्वामिकृत पदें मध्वनाथस्वामिकृत पदें नरहरिकविकृत पदें महिपतिकृत पदें गोपाळनाथकृत पदें आत्मारामकविकृत पदें गंगाधरकविकृत पदें पांडुरंगकविकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें परमानंदकविकृत पद जनार्दनकृत पद राघवकविकृत पदें बल्लवकविकृत पद रामकविकृत पदें भुजंगनाथकृत पदें कोकिळकविकृत पद निरंजनकृत पदें कृष्णदयार्णवकृत पद शुकानंदकृत पदें हरिकविकृत पद निंबराजकृत पद दीनानाथकृत पद माधवकविकृत पद हनुमंतकविकृत पद शिशुमतिकविकृत पद गिरिधरकविकृत पदे मानपुरीकृत पद व्यंकटसुतकृत पद जिवनतनयकृत पद गोसावीनंदनकृत पदें गोपालात्मजकृत पदें जयरामात्मजकृत पदें शिवरामात्मजकृत पद त्र्यंबककविसुतकृत पद गंगाधरात्मजकृत पद शिवदासतनयकृत पद रामतनयकृत पद अनंतकविसुतकृत पद शुकानंदनाथतनयकृत पद राजाराम प्रासादीकृत पदें माणिकप्रभुकृत पदें रविदासकृत पदें जगजीवनात्मजकृत पद प्रेमाबाईकृत पदें गुरुदासकृत पद नारायणबोवाकृत पदें शिवदासात्मजकृत पदें वासुदेवस्वामीकृत पदें सुभरावबावाकृत पदें माधवकृत पदें अनामकविकृत पदें वासुदेवा दीनानाथा । कमललो... सुभरावबावाकृत पदें अनेककविकृत पदें. Tags : kavimarathipadकविपदमराठी सुभरावबावाकृत पदें Translation - भाषांतर पद १ लें अंत त्या सुखासि नसे म्हणुनी म्हणती संत रे ! ।घडे यापरि जेव्हां स्वरुपीं सत्वाचा एकांत रे ! ॥ध्रुवपद.॥तदाकारवृत्तीसरिसे स्वप्रकाशें आत्मा विलसे ।त्याचि अंगें पहाणें पावे तेथेंची विश्रांति रे ! ॥अंत०॥१॥विषयभान जेथें शून्य । चित्त चैतन्य अनन्य ।स्फुरे प्रत्यय जैसा दीप मंदिरीं निवांत रे ! ॥अंत०॥२॥विघरे प्रसादित स्मृती । उर्वरित पूर्ण ज्ञप्ती ।कैसें तें बोलावें जे कां स्फूर्तीचाही प्रांत रे ! ॥अंत०॥३॥दास भावें जगन्निवास । विश्वात्मत्वें ध्यातां त्यास ।दे कृपेनें प्रतिती ऐशी श्रीगुरू लक्ष्मीकांत रे ! ॥अंत०॥४॥पद २ रें तें नव्हें तें नव्हें ज्ञान म्हणुनी सुचविती श्रुती ।प्रत्ययाचा प्रांत जे कां अनुमानें जाणाया जाती ॥ध्रुवपद.॥मिथ्यात्वें निरसोनि देह । साक्षी स्वयें निःसंदेह ।आत्मतत्व हेंचि ये रीती जाणविती बोधरीती ॥तें०॥१॥परा वाणी जेथें मौन । त्या ठायासी न पावून ।भाविती आपुलें आंग अहंप्रत्ययस्फूर्ती तेचि ही स्फूर्ती ॥तें०॥२॥आपण ठायींचा अकर्ता । निःस्पृहत्वें बोलती वार्ता ।कर्तृत्व संस्कार द्वंद्वें करोनि कासाविस होती ॥तें०॥३॥विश्व हें सर्वांगें गोड न जाणोनि म्हणती जड ।श्रीगुरुदास्याविण जीवन्मुक्त ऐशी धरिती धृती ॥तें०॥४॥पद ३ रें पाहें स्वयें अंतरंग पहाण्याचाहि पहाता ।आयता आहेसि अहंप्रत्ययवृत्तिपरता ॥ध्रुवपद.॥हाचि राजयोग बोध जाण करूनी वृत्तिरोध ।उर्वरित स्वरूपीं धृति धरीं परिपूर्णता ॥पाहें०॥१॥सारुनी स्वसुखाचा स्फुंद । लाहें आंगें निजानंद ।तदुपरि अक्षोभकशांति पावशी सुलीनता ॥पाहें०॥२॥निरखीं हे मायिक सृष्टी । देउनि अधिष्ठानीं दृष्टी ।पहाणें सुस्थिर होतां नासे देहात्मविक्षेपता ॥पाहें०॥३॥श्रीगुरुदास्यत्वासी नीट । होसी जरी तूं अवीट ।तत्प्रसादें अनायासें साधसी ऐशी योग्यता ॥पाहें०॥४॥पद ४ थें श्रीसद्गुरुरायें पहाणें हें आपुलें दिधलें ।तन्मयत्वें स्वरूपीं शोभलें ॥ध्रुवपद.॥कूतस्थीं चित्ताचा संग । आयता बोधोनि सांग ।तेंचि पूर्ण अंग दाविलें ॥श्रीसद्गुरु०॥१॥प्रत्ययस्फूर्तीचाही प्रांत । उन्मन मनासि जेथें ।बोलणें सहजचि राहिलें ॥श्रीसद्गुरु०॥२॥केवल उर्वरीत ज्ञान । वृत्तीसहित विज्ञान ।सर्वसाक्षीपणें फांकलें ॥श्रीसद्गुरु०॥३॥न दिसे विश्वजडाभास । अवघा भासे चिद्विलास ।दास्यत्वाचें भाग्य पीकलें ॥श्रीसद्गुरु०॥४॥पद ५ वें य रिती स्वरुपीं मती जागवीं बरवी ।जागें जाल्यापरी शब्दज्ञानाशीं न मिरवीं ॥ध्रुवपद.॥विक्षेपविस्मृतीवीण उर्वरित तूर्या ।प्रत्यगात्मदृष्टी त्याच दृष्टीमाजी मुरवीं ॥ये रिती०॥१॥प्रसरित पहाणें अंगें हरपे जेव्हां ।अस्तिप्रत्ययपणें अनुस्मृती उरवीं ॥ये रिती०॥२॥श्रीगुरुदास्यप्रसादें जग हें ।त्या अंगें उमजुनी जडभ्रांतिसीही नुरवीं ॥ये रिती०॥३॥पद ६ वें ऐसें करीं कां अनुसंधान आत्मसुखाचें मूळ रे ! ।तेंचि अंगें होतां विघडे मी माझें समूळ रे ! ॥ध्रुवपद.॥प्रत्यक् चिद्रूपाची खूण । चिद्वृत्ती ऐक्यत्वें जाण ।अहंकृती ठायीं जिरतां नासे द्वैत हृदयशूळ रे ! ॥ऐसें०॥१॥केवळ जाणणेचि स्फुरे । तेंही पूर्णपणें वीरे ।तन्मय उर्वरीत लक्ष आपणासी अनुकूळ रे ! ॥ऐसें०॥२॥तेंचि परसोनी त्यांत । विश्व आठवीं आपणांत ।श्रीगुरुदासप्रसादें हेंचि जाणे धृतीस मूळ रे ! ॥ऐसें०॥३॥पद ७ वें नित्य नित्य याचि विचारें लाहें समाधान रे ! ।जीवन्मुक्तपदवी तेव्हां बाणे यापरि ध्यान रे ! ॥ध्रुवपद.॥प्रत्यग्वृत्तीचा जो साक्षी । त्यातें सर्वात्मत्वें लक्षीं ।लक्ष तन्मयपणें स्फुरण हेंचि आत्मज्ञान रे ! ॥नित्य०॥१॥कल्पित माया सत्ताहीन । भासे जेणें तें परिपूर्ण ।निवर्त अधिष्ठान ऐक्य ज्ञान तें विज्ञान रे ! ॥नित्य०॥२॥साठविं विश्व चिन्मय चित्तीं । वितळे स्मृति पुढें राहे गती ।ऐशा अखंड ध्यानीं न उरे ध्याता ध्येय भान रे ! ॥नित्य०॥३॥ब्रह्मचि मग आपणासी देव । त्याचि अंगें दासभाव ।पाहें प्रेमें अनादि मुळिचें ऐसें अनुसंधान रे ! ॥नित्य०॥४॥पद ८ वें सूर्येमाजी आपणासी जागें करि ऐसें रे ! ।नित्य या अभ्यासें पावसि उन्मनीं अपैसें रे ! ॥ध्रुवपद.॥कल्पुनि विषया जाणसि तूर्या । विसरामाजी आहेसि जागा ।त्याचि अंगें जाणसि पूर्ण । तेव्हां त्रिपुटी न दिसे रे ! ॥तूर्ये०॥१॥तन्मयस्फूर्तीचा हा धर्म । ग्रासुनि निज जागृति वर्म ।लाहुनि स्वयें तद्रूप उरसी । बोलावें तें कैंसें रे ! ॥तूर्ये०॥२॥केवळ या स्थीतीनें रहातां । अवस्था तुज मग कैची आतां ।स्वप्नप्रपंच स्वप्नदृष्टीनें । पहाणें हा विलास रे ! ॥तूर्ये०॥३॥विद्या अविद्या अनादि दोनी । क्रीडसि छंदें अधिष्ठोनी ।पदवि निरंकुश ऐशी लाधे । श्रीगुरु अनन्य दास्यें रे ! ॥तूर्ये०॥४॥पद ९ वें मनन करिती ऐशा पत्ययें सर्वज्ञ मुनी ।संतुष्ट सतत स्थितप्रज्ञ जे विश्वात्मध्यानीं ॥ध्रुवपद.॥केवळ सच्चित्सुख ब्रह्म । स्फुरण तेथें माया धर्म ।तेणें ईश अनुभव प्रगटे । त्या काळीं नसेचि कोणी ॥मनन०॥१॥क्रीडेलागीं त्रिगूण रचना । कल्पुनि पाहे आपआपणा ।त्यामाजी प्रतिबिंब अनेकें । आपणासी विसरुनी माती ॥मनन०॥२॥नाना रूपें योनी हिंडत । कर्मवशें बहु पावुनि श्रांत ।सावध होय मग जीवैक्यत्व । प्रत्यक्तत्वासी वळखुनी ॥मनन०॥३॥योगें पावें निज सुख पूर्ण । वाटे पहिल्यापरीस दुणें ।श्रीगुरुदास्यप्रसादें विचरे । सर्वात्मत्व उमजोनि ॥मनन०॥४॥पद १० वें यापरि सतत करीं ध्यान हरीचें ।नासे दुह्ख तेणें सारें अहंममतेचें. ॥ध्रुवपद.॥दृष्ट श्रुत अनश्रुत । अखिल ऐश्वर्ययोग ।आठविं हृदयीं हें । स्थूळ रूप प्रभूचें ॥यापरी०॥१॥प्रेरक प्रकाशक । प्रसरीत स्मृतीसी ।तन्मयत्वें निरखी । अधिष्ठान जगाचें ॥यापरी०॥२॥उमजुनि निज खुण । पहाण्यापरतें ।आहे नाहींपणाविण । राहें उगाच ॥यापरी०॥३॥कल्पुनीया ध्यायीं विष्णु । मूर्तिमंत त्याच अंगें ।तैसें विश्वाभावीं हेंचि । दास्य गुरूचें ॥यापरी०॥४॥पद ११ वें साधिति समाधी संत । सतत ये रीती हो ! ।जे कां षड्विधि भूमिकेनें । वृत्तिशून्य स्थिती हो ! ॥ध्रुवपद.॥कामसंकल्पादि वृत्ती । उठतां करणें प्रत्यग्वृत्ती ।अंतरीं दृश्यानुविद्ध । प्रत्यय ऐसा घेती हो ! ॥साधिति०॥१॥चिन्मात्रत्वें स्फुरे स्फूर्ती । एकाग्रें हृदयांतर्वृत्ती ।यापरि शब्दानुविद्ध । साधनीं उमजती हो ! ॥साधित०॥२॥विघरे धृती स्वरुपीं जेव्हां । ज्ञप्ती उर्वरीत तेव्हां ।त्याचि निर्विकल्पीं होय । त्रिपुटी परविश्रांती हो ! ॥साधिति०॥३॥बाह्य शब्द दृश्य लक्ष्मीं । सर्वात्मत्वें प्रत्यक्साक्षी ।निःसंकल्पें निरहंकारें । व्यवहारीं वर्तती हो ! ॥साधिति०॥४॥कर्में करोनि ते अकर्ते । भोग भोगोनि अभोक्ते ।श्रीगुरुअनन्यदास्यें ऐशी । पावति जीवन्मुक्ती हो ! ॥साधिति०॥५॥पद १२ वें तोंवरि साधन नित्य । केलेंचि करावें हो ! ।सर्वत्र स्फुरण । स्वात्मपणें गवसावें हो ! ॥ध्रुवपद.॥सोडोनि देहात्ममिठी । कूटस्थीं योजुनि दृष्टी ।मन वाचेवीण धारणेशीं नुबगावें हो ! ॥तोंवरि०॥१॥लय विक्षेप रहित । लक्ष पूर्णत्वीं प्रसरित ।सूक्ष्मत्व पावोनि पहाणें ठायींच मुरावें हो ! ॥तोंवरि०॥२॥ऐक्य सत्व स्वानुभूती । लाहोनि सर्वांगीं शांती ।विसरोनि स्वपरभान सुखें विचरावें हो ! ॥तोंवरि०॥३॥शुद्ध सदाचारयुक्त । सर्व भूतां हितीं रत ।ऐशा स्थितीवरी श्रीगुरुदास्य आवडावें हो ! ॥तोंवरि०॥४॥पद १३ वें आपणासी जाणें करीं करीं ॥ध्रुवपद.॥स्वगत निजसी हेंची नवल कीं ।आपलेपणीं जाग आतां तरी तरी ॥आपणासी०॥१॥जागेपण आपणामाजी हरपतां ।उरे निज जागृति बरी बरी ॥आपणासी०॥२॥चिद्विलास सचराचर मानुनी ।दासपणें जाग लवकरी करीं ॥आपणासी०॥३॥पद १४ वें मागें पुढें पाहुनी बरें बोल रे मना ! ॥ध्रुवपद.॥मागें काय असे जाण । पाहतां तेथें आहे कवण ।पहाण्यावीण तन्मय खुण जाणणें सखोल ॥मागें०॥१॥पहाणें आपणांत सरे । कल्पक मन सहज विरे ।अनुभव चिन्मात्र पदीं बोलणें अबोल ॥मागें०॥२॥मागें पहात पुढें जाण । दिसे विश्व हरीच सगुण ।दासपणें पसरोनि मती पाहणें अमोल ॥मागें०॥३॥पद १५ वें स्फूर्ति दे हरि ! तुजला गाया ॥ध्रुवपद.॥देहेंद्रिय मन मीपण सर्वही ।प्रेरक तूं तुजविण जड माया ॥स्फूर्ति०॥१॥चुंबक लोहाचे परि उपमा ।तैशी न घडे तुजसम सदया ! ॥स्फूर्ति०॥२॥अनंतगुण तुज न चिंतवे परि ।दासाचा तूं प्रियतम सखया ! ॥स्फूर्ति०॥३॥पद १६ वें आवडतो प्रिय परि गवसेना ॥ध्रुवपद.॥स्वजनाहुनि प्रिय देह आपुला ।तोही विटे परि आपण विटेना ॥आवडतो०॥१॥ज्यावरि धांवति इंद्रिय मनहि ।सर्वहि दाउनि आपण दिसेना ॥आवडतो०॥२॥श्रीगुरुदास्य अनन्य घडे जरि ।अनुभवतंतु कधींहि तुटेना ॥आवडतो॥३॥पद १७ वें कांहिं तरि आपुला लाभ पाहें ।निःसंशय गुरुवाक्य धरुनि दृढ ब्रह्मपरायण होय ॥ध्रुवपद.॥अन्यस्मरण टाकुनि एकाग्रें । ध्यानाकृति स्मृति राहे ॥कांहिं०॥१॥ध्यानप्रकाशक साक्षि चिदात्मा । वृत्तिविण शोधित जाय ॥कांहिं०॥२॥अहंकृति परता पहाण्यावरता । सूक्ष्म मतिसि रति लाहे ॥कांहिं०॥३॥तन्मय पावुनि विश्वाकृति हरि । निजपदिं कल्पुनि पाहे ॥कांहिं०॥४॥दास अनन्यपणें गति समजुनि । भज भज श्रीगुरुपाय ॥कांहिं०॥५॥पद १८ वें अंतरिं पहातां पाहणें सहज वीरे ॥ध्रुवपद.॥प्रत्यग् आत्मा अहंमति परता । प्रत्यग् मात्र उरे ॥अंतरिं०॥१॥पहाणें पसरुनि आपणा पहातां । चिद्रूप एकसरे ॥अंतरिं०॥२॥निरतिशयें प्रिय जाणुनि आठव । श्रीगुरुदास तरे ॥अंतरिं०॥३॥पद १९ वें सर्व वासुदेवभजनीं जाग रे मना ! ॥ध्रुवपद.॥स्वानुभूतिशक्तिसहित । सगुण ब्रह्म व्यक्तिरहित ।सर्वसाक्षि सर्वातीत । जाण रे मना ! ॥सर्व०॥१॥जाणलिया आंत पुढें । चित्प्रकाश असे उघड ।स्वानुभवें होउनि सुघड । वाग रे मना ! ॥सर्व०॥२॥चिच्छक्ति करुनि अपण । अपणा जो दावि त्रिगुण ।त्यासिं हृदयिं साठव करुनि । ध्याईं रे मना ! ॥सर्व०॥३॥हरिच स्वयें मूर्ति सगुण । हरिच स्वयें विश्व त्रिगुण ।दासपणें हे गुरुखुण । पाव रे मना ! ॥सर्व०॥४॥पद २० वें श्रीगुरुबोध हृदयिं धरुनि धांव तूं मना रे ! ॥ध्रुवपद.॥धांवत धांवत मागें पाहें । स्वरूपीं विश्रांति लाहें ।तन्मय पावुनि मागुति झेंपाव तूं मना रे ! ॥श्रीगुरु०॥१॥दाहि दिशा एकसरें । फिरणें हें बहुत बरें ।त्याहुनि पुढें निजपणासि धांव तूं मना रे ! ॥श्रीगुरु०॥२॥दिसे सर्व सांठवोनि । कांहिंच तेथें नाठवोनि ।दासपणें टाकीं सकळ हाव तूं मना रे ! ॥श्रीगुरु०॥३॥पद २१ वें आठव करि त्या प्रियतम हरिला । अनंत चराचरमय जो नटला ॥ध्रुवपद.॥अहंममतास्पद ज्याकरितां प्रिय । कधिं न विटे जो आत्मा आपला ॥आठव०॥१॥आठव प्रकाशक प्रेरक चिन्मय । संतमुखें घे अनुभव वहिला ॥आठव०॥२॥आठव पसरुनि आपणा पहातां । घडे स्वरुपीं रति सूक्ष मतीला ॥आठव०॥३॥प्रत्यय रंगीं रंगुनि बरवें । दासपणें भज जगन्मयाला ॥आठव०॥४॥पद २२ वें हृदयीं शोधुनि हरिला जाण. ॥ध्रुवपद.॥सर्वप्रकाशक सर्वांहुनि पर । सच्चित्सुख रूप कोण ॥हृदयीं०॥१॥त्रिविध अहंकृति सारुनि पहातां । तोचि स्वयें परिपूर्ण ॥हृदयीं०॥२॥त्रिपुटि पर मती तन्मय पावुनि । पाहें विश्व सर्व समान ॥हृदयीं०॥३॥श्रीगुरुदास्य अनन्य घडे जरी । नसे सुखाची मग वाण ॥हृदयीं०॥४॥पद २३ वें आजि प्रियतम हरि अखिल हृदयीं दाटला हो ! ॥ध्रुवपद.॥बुद्धिसाक्षि चिद्रुपासि । दृढ धरुनि धारणेसि ।प्रत्याहारी मनोभाव आटला हो ! ॥आजि०॥१॥चित्त चिदाकारपणें । पाहे आपणासि आपण ।निजानंद प्रत्ययसा वाटला हो ! ॥आजि०॥२॥तोचि विश्वाकार हरि । भासे चित्सिंधुलहरि ।दासपणीं प्रेमभाव मातला हो ! ॥आजि०॥३॥पद २४ वें गुरुमुखें निजखूण जाण जाण ॥ध्रुवपद.॥भासे जीव अहंमति पुरता । धांवे मन आहे तेथें कोण कोण ? ॥गुरु०॥१॥जाणिववृत्तिसी मानिसि आत्मा । निद्रेमाजि नसे कांहीं भान भान ॥गुरु०॥२॥अवस्थात्रयपर तूर्यप्रकाशक । प्रत्ययें स्वयें धरीं खूण खूण ॥गुरु०॥३॥ज्या करितां दिसे अनंत चराचर । दासपणीं उरे तेंचि पूर्ण पूर्ण ॥गुरु०॥४॥पद २५ वें जाण गुरुखुण, संशय निरसुनि । वाक्यबोध एकाग्रें विबरुनि ॥ध्रुवपद.॥चिज्ज्डमिश्रित जें त्यामाजि । कारण कूटस्थासी निवडुनि ॥जाण०॥१॥चिदृत्तीसिं योग आयता । गवसे हृदयीं चित्त निरोधुनि ॥जाण०॥२॥पूर्णपणें स्वयें धरीं धारणा । हळु हळु तेथें जाणिव विसरुनि ॥जाण०॥३॥आत्मत्वीं सचराचर कल्पित । पाहें दासपणें स्मृतिसि पसरुनि ॥जाण०॥४॥पद २६ वें संतमुखें समज बरें हेंचि समाधान ।अभ्यासें आत्मसौख्य पावसी निधान. ॥ध्रुवपद.॥करितां जडभाग त्याग । बिंबीं प्रतिबिंबयोग ।गवसे चिद्वृत्ति ऐक्य आयतेंचि ज्ञान ॥संतमुखें०॥१॥अन्यस्मृति निषेधोनि । अवशेषीं धृतिसि धरुनि ।अहंस्फूर्तिवीण स्फुरण पाहें स्वयें खूण ॥संतमुखें०॥२॥चिन्मात्रीं वृत्ति मुरे । तेव्हां आवरण सरे ।आत्मत्वें हृदयीं दिव्य करीं श्रीहरिध्यान ॥संतमुखें०॥३॥चिच्छक्तीसहित सगुण । कल्पी आपणासि त्रिगुण ।दासपणें सुमनिं त्यास आठवीं समान ॥संतमुखें०॥४॥पद २७ वें ध्यान करणें ऐसें बरें । जेथें द्वैतभान नुरे. ॥ध्रुवपद.॥बाह्यवृत्ति अंतरिं कूटस्थींच योजुनि ।अन्य कांहिं नाठवुनि । पाहातां लक्ष मुरे ॥ध्यान०॥१॥अस्तिप्रत्ययस्मृती पूर्णपणें पसरुनि ।साक्षित्व अवलोकुनी । जाणणेंचि उरे ॥ध्यान०॥२॥स्वानुभवात्मक परम पुरुष ईश ।चिंतुनी हृदयीं दास । पाहे प्रेमभरें ॥ध्यान०॥३॥पद २८ वें जाण विश्व विष्णुयाग मायेचा विलास रे ! ।संतसंगें करुनी मनन टाकीं संदेहास रे ! ॥ध्रुवपद.॥भानुकिरणीं जळ नसोनि दिसे जसें ।मुळिंची ईशशक्ती तैशी, पावे उदास रे ! ॥जाण०॥१॥सत्ताहीन स्वयें परि कारणप्रकाशें भासे ।कार्य नाममात्र सत्य असे निराभास रे ! ॥जाण०॥२॥नटोनि नाना सोंगें नट दावी कौतुकानें तेंवि ।जडजग कल्पी चिच्छक्तीनें प्रभु आपणास रे ! ॥जाण०॥३॥जीव चिदाभास अंगें विनोदें अनेक जाला ।दासपणें आत्मप्रेमें भावें भजें त्यास रे ! ॥जाण०॥४॥पद २९ वें मना कां लाज नये केलें समजोनि काय ? ॥ध्रुवपद.॥ज्ञान पूर्ण जाल्या परि अनुभव दुसर्यासि ।सर्वज्ञत्वें बोलसि । साधन उपाय ॥मना०॥१॥वेदांतनिरूपणीं शाब्दिक समाधान ।मानोनी हृदयीं अन्य । चिंतिसी विषय ॥मना०॥२॥सिद्ध साधक दशा अंगीं दोन्ही भाविशी ।होशी तेणें कासाविशी । सांपडेना सोय ॥मना०॥३॥धरीं अनुताप दृढ थोरीव परती सारीं ।दासपणें अंतरीं । स्मरें हरिपाय ॥मना०॥४॥पद ३० वें हृदयीं आठव करि परमपुरुष हरि ।गुरुकृपें निजखुण समजुनि या परि.॥ध्रुवपद.॥दृश्योन्मुख जे स्मृति तिसीं परतवुनि ।पूर्णपणें पसरूनि धृतिसि सदृढ धरि ॥हृदयीं०॥१॥स्फुरणरूप स्वयें अनंत चिदात्मा ।तन्मयपणाची तेथें जाणीव न उरे उरी ॥हृदयीं०॥२॥चिद्वृत्तीसी ध्यानीं मग गवसे ।सगुण निराकृति कल्पित चराचरीं ॥हृदयीं०॥३॥अखिल जगाचा विभु सर्वोत्तम ।दासपणें पाहें मनीं मूर्ति चिंतुनि बरी ॥हृदयीं०॥४॥पद ३१ वें साधन साधावें ऐसें घडीनें घडी ।शब्दज्ञानें नागवण जाण रोकडी ॥ध्रुवपद.॥श्रीहरिध्याना प्रसादें पहातां । दिसे अंत एकपणीं दृष्टी उघडी ॥साधन०॥१॥पहाणें मुळीचें असे आयतें । तन्मय नित्य नव गोडीनें गोडी ॥साधन०॥२॥दासपणें स्वयें स्वानुभूतीनें । कल्पित जगिं सम पाहें आवडी ॥साधन०॥३॥पद ३२ वें पावोनि खुणेशीं कांहीं बोल बरें सखया ! ।शब्दज्ञानें समाधान जाय वितळोनियां ॥ध्रुवपद.॥सर्व वृत्ति शून्य जेव्हां आपआपणासि भेटे ।दुजा कोण उरे तेथें प्रतीति स्मराया ॥पावोनि०॥१॥स्वसंवेद्य आत्मयासि मानावा अभाव जरिं ।प्रवर्तती ज्याच्या प्रकाशेंकरोनियां ॥पावोनि०॥२॥अहंजड स्फूर्तीवीण जाणनें सर्वत्र एक ।आयतें साधावें कैसेम अंगें गवसाया ॥पावोनि०॥३॥विश्वाकार एकसरें स्मृती पसरावी कैशी ।कामसंकल्पादि सारें बंधन तुटाया ॥पावोनि०॥४॥आत्मभावें सद्गुरूचें दास्यत्व घडे जरी ।प्रत्यय अबोल परि स्फुरेहि बोलाया ॥पावोनि०॥५॥पद ३३ वें व्यर्थ वय गेलें हित जाणोनि न साधिलें ।शब्दज्ञानें समाधान अंतर न रंगलें ॥ध्रुवपद.॥शरीर गृहादिक नश्वर माइक ।जाणत जाणत मोह फांशिं मन गुंतलें ॥व्यर्थ०॥१॥सकळ सुखास्पद आत्मा उमजुनी ।तन्मयत्व बाणायासि चित्त न निरोधिलें ॥व्यर्थ०॥२॥अनंत ब्रह्मांड वैभव ज्या प्रभुचें ।सगुण सुंदर ध्यान हृदयीं न बिंबलें ॥व्यर्थ०॥३॥व्याधि मृत्यु जरा दुःख आठवोनि अनुतापें ।ईशभावें सद्गुरूचें दास्य नाहिं घडलें ॥व्यर्थ०॥४॥पद ३४ वें समज समज हा सुगम विचार ।पावसि जेणें जीवन्मुक्ति सुखसार ॥ध्रुवपद.॥विस्मृतीसी नाशक । स्वस्मृतीप्रकाशक ।पाहे तीशीं आलिंगूनि अनंत अपार ॥समज०॥१॥प्रसरित पहाणें । होय जेथें बोळवण ।प्रत्यय अंगीं ज्ञप्ति मात्र राहे एकाकार ॥समज०॥२॥आठवण नाठवण । स्वयें त्यासि साठवण ।न शिवे ऐशा धारणेशी त्रिगुण विकार ॥समज०॥३॥कल्पित विश्व सगुण । कल्पोनी निजांगें जाण ।बाणे स्थिती ऐशी श्रीगुरुदास्यें निर्विकार ॥समज०॥४॥पद ३५ वें तरिंच अहंकृति होय नाश ।भावें विश्व वासुदेव लागे निदिध्यास ॥ध्रुवपद.॥एकसरें हें ध्यान ठसे मनीं ।येणें निर्विकल्प योग बाणे अनायास ॥तरिंच०॥१॥साधन यापरि पाकें अंतरीं ।आद्यंत रहित स्वयें पाहें सावकाश ॥तरिंच०॥२॥नसुनि मुळीं जग दिसे योगेश्वर ।वाढे प्रिय प्रभूचा हा सहज विलास ॥तरिंच०॥३॥येरिति अनुभव पावुनि मागुति ।भक्ति सुखालागीं म्हणवी श्रीहरिदास ॥तरिंच०॥४॥पद ३६ वें सहज स्थितीचा हाचि विवेक ।म्हणति विश्वरूप उपासक लोक ॥ध्रुवपद.॥व्रुत्ति उगमीं चिन्मात्र आयतें ।पसरुनि स्मृति स्वयें चाखिं सुख चोख ॥सहज०॥१॥पूर्वप्रवाहें धांवे मन जेथें ।त्याहि पुढें पाहे बिंब अनंत अशोक ॥सहज०॥२॥तन्मय पहाण्या माजि कल्पित जग । आपणचि भासे तेव्हां ध्यान परिपाक ॥सहज०॥३॥प्रारब्ध शरीर भोगी न शिवे अहंकृती ।श्रीगुरुदास्यें लाभे पदवी ऐशी रोख ॥सहज०॥४॥पद ३७ वें मनिं सतत प्रिय हरि स्मरा रे ! ॥ध्रुवपद.॥ज्या प्रियें बहु प्रिय वाटति स्वजन धन । तो सर्वात्मा वरा रे ! ॥मनिं०॥१॥आठव विसर पर आठव परात्पर । पहात पहात मागें फिरा रे ! ॥मनिं०॥२॥श्रीगुरुदास्य पदीं हें वैभव । लाहुनियां भवभय तरा रे ! ॥मनिं०॥३॥पद ३८ वें आपणामाजि बरें पहा रे ! ॥ध्रुवपद.॥बुद्धिप्रकाशक पाहातां तन्मय । चिन्मय मात्र उरे ॥आपणा०॥१॥प्रत्यग् वृत्ति तरंगीं जीवन । आत्मा एकसरे ॥आपणा०॥२॥स्वप्रिय सगुण अनंत चराचर । मानुनि दास तरे ॥आपणा०॥३॥पद ३९ वें तूं अनुदिनिं स्थिर मनिं हरि भज रे ॥ध्रुवपद.॥चित्तप्रकाशक चित्तें अनुभव । पाहुनि अहंकृति त्यज रे ! ॥तूं०॥१॥तन्मय परता चिन्मात्रहि हरि । पहातां पहाणें तेथें नुरे ॥तूं०॥२॥तो सर्वात्मा प्रिय सर्वोत्तम । दासपणें निजपदिं विचरे ॥तूं०॥३॥पद ४० वें तरिं बरें रे ! बहु बरें ॥ध्रुवपद.॥अन्न प्राण कोशद्वय निरसुनि । बोध मनोमयी कळे रे ! ॥तरिं०॥१॥आत्मयोग विज्ञानीं साधुनि । हळु हळु मन उपशमे रे ! ॥तरिं०॥२॥पूर्ण चिदात्मा जाणुनि जाणिव । स्वानंदीं मन विरे रे ! ॥तरिं०॥३॥प्रिय हरि आत्मा, जो जगदात्मा । सहज भजन सम घडे रे ! ॥तरिं०॥४॥श्रीगुरुदास्यें करुनि हा अनुभव । पावुनि अहेतुक भज रे ! ॥तरिं०॥५॥पद ४१ वें सहज विलास, चराचर हरिचा ।जाणुनि टाकीं संशय मनिंचा ॥ध्रुवपद.॥आपणामाजि त्रिगुण जग माइक ।कल्पुनि कारण आपण साचा ॥सहज०॥१॥आपणची भासे जीव बद्धगुणी ।आपणची घे निजबोध गुरूचा ॥सहज०॥२॥देहेंद्रिय अहंकृति पर [ जो? ] प्रिय ।स्वात्मा तोचि प्रिय सकळांचा ॥सहज०॥३॥नाम रूप जग आपण सदोदित ।पाहतां आहे आपण मुळिंचा ॥सहज०॥४॥श्रीगुरुदास्यें करुनि हा अनुभव ।कुंठित जेथें चारिहि वाचा. ॥सहज०॥५॥पद ४२ वें दृढ धरिं हृदयीं वाक्य गुरूचें ॥ध्रुवपद.॥जेणें देखशी ऐकशी बोलशी । वृत्ति व्यतिरेकें तें तूं साचें ॥दृढ०॥१॥वाक्यमनन एकांतीं बरवें । निश्चय करिं धरिं अंग सुखाचें ॥दृढ०॥२॥अहं सूक्ष्म शाखेवरि आत्मा । चिच्चंद्रचि तूं तेथें पाहें उगाच ॥दृढ०॥३॥चिद्विलास सचराचर मानुनि । दासपणें भज पाय गुरूचे ॥दृढ०॥४॥पद ४३ वें आतां तरिं होय सावधान सावधान सखया ! ॥ध्रुवपद.॥अंतरबाह्य, खरें जाण । पाहण्याविण आहे कवण ।मुळिंची हे समज खूण । तेंचि ज्ञान सखया ! ॥आतां०॥१॥स्वसंवेद्यपणें पाहे । ज्ञप्तिमात्र स्वयें आहे ।सकळवृत्ति गिळोनि राहे । तदाकार सखया ! ॥आतां०॥२॥ध्यान दिव्य धरीं सगुण । भाविं तोचि विश्व त्रिगुण ।दास भजक याजवीण । नसे आन सखया ! ॥आतां०॥३॥पद ४४ वें कधिं हरि ! तुजला प्रिय मी होइन ।प्रेमभरें तुज सर्वभावें भाविन ॥ध्रुवपद.॥प्रत्यग्वृत्तिहुनि पर तूं स्वात्मा ।तन्मय जाणुनि जाणपण जिरविन ॥कधिं०॥१॥विश्वरूप हें तव योगेश्वर ।ध्यानीं एकसरें आकळुनि सांठविन ॥कधिं०॥२॥वेध तुझा, लागुनियां हृदयीं ।ध्यान मनोहर, मूर्तिमंत निरखिन ॥कधिं०॥३॥दासपणें कृतकृत्य होउनि ।सेवेलागीं मागुति, आवडि उरविन ॥कधिं०॥४॥पद ४५ वें येरिति जाणुनि अनन्य, भाव धरि जो श्रीहरिचरणीं ॥प्रसन्न होय त्याला चक्रपाणी ॥ध्रुवपद.॥जयाचे सत्तेनें सर्व । वर्तति संसारीं जीव ।ब्रह्मादिक देवांचा जो धणी ॥येरिति०॥१॥ज्याचा हा ऐश्वर्ययोग । नामरूपमय जग ।वोवीलें ज्या गुणीं त्रिगुणमणीं ॥येरिति०॥२॥युगायुगीं अवतार । धरि रक्षी सदाचार ।निजदासाचा देव आहे ऋणी ॥येरिति०॥३॥पद ४६ वें असो धिग धिग, माझिया जिण्याला ।भोगेच्छा अंतरीं, बाह्य त्याग करण्याला ॥ध्रुवपद.॥नसे प्रेम हृदयीं, श्रीहरिभजनीं ।रंजावया जन, शब्दज्ञान वदण्याला ॥असो०॥१॥पुढें गति कशि होईल नेणूनि ।झांकुनियां नयन, स्वैर आचरणाला ॥असो०॥२॥प्रियत्म हरिशी, सर्वत्र भावुनि ।विषम मतिनें, गुणदोष पहाण्याला ॥असो०॥३॥काय वाचा मन हें, प्रभुसी न अर्पुनी ।श्लाघेलागीं दास मी, म्हणुनि वागण्याला ॥असो०॥४॥पद ४७ वें भक्तितत्व हेंचि म्हणति आत्मज्ञानी भक्त ।विश्व वासुदेव ऐक्य ध्यागीं जें सतत युक्त ॥ध्रुवपद.॥स्त्रीधन पुत्र प्रिय प्रियतर देह स्वयें ।नेणोनीही आपणाशी प्रियतमपणें सक्त ॥भक्तितत्व०॥१॥स्मृतीसी कारण प्रीती धरि जडाजडिं रती ।सर्वत्र सहज असे परि तें नसेचि व्यक्त ॥भक्तितत्व०॥२॥जरिं आच्छादित त्रिगुण अहंकृतिनें ।तरि तें यासवें होय विषयभोगानुरक्त ॥भक्तितत्व०॥३॥ईश भावें सद्गुरूचें दास्यत्व घडेल ज्यास ।आवडी ही सर्वांची एक जाणोनि ते होती मुक्त ॥भक्तितत्व०॥४॥पद ४८ वें भक्तालागीं श्रीहरिध्यानीं प्रत्यय ऐसा गवसे रे ! ॥ध्रुवपद.॥प्रियतम केवळ आत्मयासि । मूर्तिमंत हृदायकाशीं ।भावुनि प्रेमें पहतां ध्यान ध्याता पुढें न दिसे रे ! ॥भक्ता०॥१॥स्वरुपीं होय वृत्ति निमग्न । सूक्ष्म मतिशिं लागे लग्न ।तेचि प्रसरित स्फूर्तिसरिसें सगुण ब्रह्म विलसे रे ! ॥भक्ता०॥२॥अधिष्ठानीं विश्व पसारा । जैशा सिंधुमाजि गारा ।यापरि कल्पुनि सांठवितां तें मग अपरोक्ष भासे रे ! ॥भक्ता०॥३॥निर्विकल्प सविकल्प । स्थितिशि पावुनि निःसंकल्प ।उगेंचि दास्य करिती तेही प्रभुगुण मोहक ऐसे रे ! ॥भक्ता०॥४॥पद ४९ वें भावें संतसमागमिं राहीं । नको करूं याविण कांहीं ॥ध्रुवपद.॥मूर्तिमंत ईशअवतार हे समजुनि । घडि घडि ठेवीं पायीं डोई ॥भावें०॥१॥सहज वचन जें मानुनि हितकर । श्रवणीं प्रेमें चित्त देईं ॥भावें०॥२॥कृपाकटाक्षें ज्ञान ध्यान सर्व सिद्धि । घडे आपोआप लवलाही ॥भावें०॥३॥दास्य अवंचक सतत करुनियां । भागवति अंति गति लाहीं ॥भावें०॥४॥पद ५० वें यालागीं साधक येथें पावति विश्राम ।बोधसिद्धी घडे भावें ध्यातां मेघश्याम ॥ध्रुवपद.॥केवळ निर्गुण योगसाधनें ।आश्रयरहित अवघड परिणाम ॥यालागीं०॥१॥ध्यान प्रसादाविण त्या स्वरुपीं ।चित्त स्थिर होवों नेदी इंद्रिय सकाम ॥यालागीं०॥२॥हठयोगी अणिमादिक वैभव ।प्रपत होय तेणें पुढें नाहीं कांहीं क्षेम ॥यालागीं०॥३॥दासपणें विश्वात्मक प्रभुला ।आत्मप्रेमें भजतां त्याशि दे गती श्रीराम ॥यालागीं०॥४॥पद ५१ वें साधन करिं कां गुरुपद स्मरुनी । आपआपणाशिं पाहें परतोनि ॥ध्रुवपद.॥बाह्य वृत्ति करिं एकवट हृदयीं । उन्मनि पर जे धृति स्वयें धरुनि ॥साध०॥१॥अनुभवमति हे न उरे जेथें । सहजचि अहंकृति जाय विरोनि ॥साध०॥२॥तन्मयपदीं जग हरिरुप भावुनि । दासपणें भज नित्य अनुसरोनि ॥साध०॥३॥पद ५२ वें हरि ! तुझि आवडि देईं देईं ॥ध्रुवपद.॥कृपाकटाक्षें पाहुनि मजकडे । अहंममता नेईं नेईं ॥हरि०॥१॥बुद्धिसाक्षि तूं मूर्तिमंत प्रगटुनि । हृदयीं सुस्थिर राहीं राहीं ॥हरि०॥२॥धांवति वृत्ति चहूंकडे त्यांसी । तुजविण न दिसो कांहीं कांहीं ॥हरि०॥३॥भोग घडो जे जसे कपाळीं । त्यांचा भार तुजवरि नाहीं नाहीं ॥हरि०॥४॥निजदासाचा हाचि मनोरथ । पुरवुनि सेवा घेईं घेईं ॥हरि०॥५॥पद ५३ वें आठविं हृदयीं हरि ! मंगळधाम । सकळ सुहृद प्रिय आत्माराम ॥ध्रुवपद.॥बुद्धिप्रकाशक प्रेरक जो स्वयें । सगुण सुंदरघन मेघश्याम ॥आठ०॥१॥अनंत विश्वात्मक योग जयाचा । जाणुनि मुनि तेथें पावति विश्राम ॥आठ०॥२॥सर्वत्र सद्य सम विभु सर्वोत्तम । दासपणें गाइन यश गुणनाम ॥आठ०॥३॥पद ५४ वें सतत हृदयीं तूं स्मर नारायण ।प्रेमें निशिदिनिं करिं मुखिं गायन ॥ध्रुवपद.॥जीवसमुच्चय नार म्हणति त्याशि ।अयन आश्रय बिंब ईश कारण ॥सतत०॥१॥जड प्रकाशक साक्षी सगुण जो ।प्रळय नार जळीं निमे परिपूर्ण ॥सतत०॥२॥यापरि समजुनि नाममाहात्म्य ।दासपणें स्मृति करिं नाम परायण ॥सतत०॥३॥पद ५५ वें त्यांणिं अजित हरिला जिंतिलें । प्रेमरसपानें मातलें. ॥ध्रुवपद.॥निर्गुण योगी श्रम बहु समजुनि । सुंदर ध्यानीं सोकले ॥त्यांणिं०॥१॥संतमुखें श्री विभुलीलामृत । श्रवणिं तन्मय पावले ॥त्यांणिं०॥२॥अखिल चराचर योग एकसरें । नमुनि सुखाशीं टेंकले ॥त्यांणिं०॥३॥दासत्वें गति जाणुनि निशिदिनिं । नवविध भजनीं रंगले ॥त्यांणिं०॥४॥पद ५६ वें धन्य तेचि कीं भजती हरीला ॥ध्रुवपद.॥देह गेह मोह सर्वहि टाकुनि । संतसमागमीं गाति यशाला ॥धन्य०॥१॥तारक सर्वात्तम हरि मानुनि । आठविति मनीं सगुण अजाला ॥धन्य०॥२॥दैवी भूषणें अंगीं लेवुनि । भगवद्भावें नमिति जगाला ॥धन्य०॥३॥दैववशें जे आले भोगुनि । शोक हर्ष भय हृदयिं न ज्याला ॥धन्य०॥४॥सर्वेंद्रिय दास्यत्वीं योजुनि । घडि घडि स्मरती पूर्ण कृपेला ॥धन्य०॥५॥पद ५७ वें साधावें तें ऐसें श्रीहरिभजनीं वारंवार ।संतसंगें अंतरंगें समजुनि विचार. ॥ध्रुवपद.॥अनंतासी कल्पूं जातां । निर्विकल्प उरे सत्ता ।तन्मयत्वें तेंचि ध्यावें सुंदर साकार ॥साधावें०॥१॥दावि जग आपणासि । कल्पुनि जगदीश त्यासि ।चित्तीं सांठवितां होय हृदयीं निर्विकार ॥साधावें०॥२॥प्रसरित स्मृति पुढें । सगुण ब्रह्म रोकडें ।ध्यानां अंगें आनंदासि नाहिं पारावार ॥साधावें०॥३॥सर्वोत्तम दासपणें । आपण स्थानुभवखुणे ।मग मुक्तीपरिस भक्ति लागे गोड फार ॥साधावें०॥४॥पद ५८ वें हें जगदीशाचें पहाणें । संतहृदयींचें ठेवणें ॥ध्रुवपद.॥निर्गुण सत्तामात्रचि निष्फळ । मायायोगें ईश्वर केवळ ।प्रकटे प्रत्ययरूपें प्रांजळ । पाहे आपणा आपण ॥हें जग०॥१॥ब्रह्म सगुण अधि दिनावरि । नामरूपात्मक विश्व कूसरी ।अघटित घटना दावि यापरि । कल्पुनि मिथ्या रोपणें ॥हें जग०॥२॥परा अपरा अनादि शक्ति । अंश जीव जड पावति व्यक्ती ।धरि अन्योन्यें बह आसक्ति । साक्षी एकसरें जाणणें ॥हें जग०॥३॥दोहीं अंगें नेटुनि निराळा । असे स्वयें उघडा दिसे झांकला ।तो प्रभु शरणागत दासाला । दे निज आपलें देखणें ॥हें जग०॥४॥पद ५९ वें श्रीगुरुप्रसादें समज खुणा या ।वृत्तिविणें स्वयें एकांतिं रमाया ॥ध्रुवपद.॥पाहाण्यासवें पहाता असुनि निराळा ।पाहुं जातां पहाणें उरे तन्मय पावुनियां ॥श्रीगुरु०॥१॥जेणें वृत्ति मूर्तिमंत दिसे व्यवहारीं ।जाणणें पसरितां तें जाय वितळोनियां ॥श्रीगुरु०॥२॥आहे नाहीं परता आहे सत्य ज्ञानानंत ।उर्वरीत प्रत्यय नसे शब्दें दाखवाया ॥श्रीगुरु०॥३॥जगीं जगदीश्वर ध्यान करुनि मग ।दासपणें राहे स्वच्छ लाहोनि स्थितिसि या ॥श्रीगुरु०॥४॥पद ६० वें आतां तरि धरिं मनिं कांहिं तरि लाज ।विषयिं रमसि किति खाजविशि खाज ॥ध्रुवपद.॥भासे क्षणिक सुख । दुःखमय मायिक ।उमजुनि नुमजसि वाटे हेंचि चोज ॥आतां तरि०॥१॥जेथुनि हें जेणें दिसे । तें तूं स्वयें जाणसि ।वृत्तिरोध करूनि कां साधिनासि काज ॥आतां तरि०॥२॥जेणें होय ज्ञानसिद्धी । तें तुज न रुचे बुद्धी ।श्रीगुरुदास्य सकळ साधनाचें बीज ॥आतां तरि०॥३॥पद ६१ वें प्रीति बसो हरि ! तुझिया पायीं । भजन ठसो इंद्रियसमुदायीं. ॥ध्रुवपद.॥कीर्तनरंगीं रंगो वाणी । कानीं भरो यश गुण सुखदायी ॥प्रीति०॥१॥सन्मार्गीं हें चालो पाऊल । गुंतो करद्वय सेवेविषयीं ॥प्रीति०॥२॥जगदीशा ! तूं जड जीवात्मा । तुझ्या प्रणामीं लवो नित्य डोई ॥प्रीति०॥३॥तुझिया आकृति संतदर्शनीं । दृष्टि असो जेणें पडो निजठायीं ॥प्रीति०॥४॥ये रिति मागूं तुज सम सदया । जन्मोजन्मीं दासालागीं हेंचि देईं ॥प्रीति०॥५॥पद ६२ वें कृपाघना ! तुज कां नये करुणा । शुकसनकादिक वंदिति चरणां ॥ध्रुवपद.॥उत्कंठा मनिं पाय पहाया । लागली निशिदिनीं जगदाभरणा ! ॥कृपा०॥१॥अंतरिंचा तूं जाणसि आशय । पूर्ण करिशि कधिं अघसंहरणा ! ॥कृपा०॥२॥ध्यान भजन मीं कांहिंच नेणें । दास म्हणवितों पतितोद्धरणा ॥कृपा०॥३॥पद ६३ वें ध्यानिं प्रगटावें भुवनसुंदरा ! । भक्तप्रियतमा ! दयासागरा ! ॥ध्रुवपद.॥श्रमलों मी बहु योगसाधनें । नाटोपें मन कांहिं गुरुवरा ! ॥ध्यानिं०॥१॥अचिंत्य चिन्मय विग्रह तुजला । चिंतावें किति तरी सुखकरा ! ॥ध्यानिं०॥२॥निजदासाचें कोड पुरविता । तुजविण कोण सांग श्रीवरा ! ॥ध्यानिं०॥३॥पद ६४ वें आपणा आपण शोधोनि पहातां । प्रिय हरि आत्मा गवसे रे ! ॥धुवपद.॥इंद्रिय प्राण अहंकृति प्रत्यय । स्वरूपीं कांहीं न वसे रे ! ॥आपणा०॥१॥पहाणें परतुनि पहातांचि श्रेय । तेंचि चराचर भासे रे ! ॥आपणा०॥२॥श्रीगुरुदास्यपणें हा अनुभव । तन्मय पावुनि विलसे रे ! ॥आपणा०॥३॥पद ६५ वें ध्यानीं वसो मनमोहन राम । भुवनसुंदर घनमेघश्याम ॥ध्रुवपद.॥प्रियतम जो स्थिरचर जीवाचा । साक्षी सगुण कारण सुखधाम ॥ध्यानीं०॥१॥निरहैतुक मुनिजन ज्यालागीं । अर्पुनि भजती स्त्री सुत धाम ॥ध्यानीं०॥२॥दाखविं स्वस्वरुपीं निजदासा । स्वकिय विभव जगदात्माराम ॥ध्यानीं०॥३॥पद ६६ वें त्या हरिला मी नमिन घडि घडि । नावडि ज्याची नोहे पळ घडि ॥ध्रुवपद.॥प्रेरक सहज सर्वत्र प्रकाशक । निरखि जड जगीं देउनि स्वयें दडी ॥त्या०॥१॥आद्यंतरहित सृष्टी दावि अनादि । स्वकीय प्रकृतीनें कल्पुनि परवडी ॥त्या०॥२॥श्रीगुरुप्रसादें ये रिति उमजुनि । सेविति सतत त्याचा होय निजगडी ॥त्या०॥३॥सदयपणें अवसरुनि युगायुगीं । भवसिंधु दासालागीं ने जो परथडी ॥त्या०॥४॥पद ६७ वें साधुसमागमें करिं हा विचार ।जेणें संशय सारे होति परिहार. ॥ध्रुवपद.॥निर्गुण प्रत्यय अंगें । ईश त्या मायेच्या योगें ।दावि आपणासि जग । कल्पोनि आकार ॥साधु०॥१॥मिश्र सत्व जीवनीं । अंशत्वें प्रवेशोनी ।भ्रमें जड वेष्टुनी । वर्ते अविचार ॥साधु०॥२॥भावी ईश सृष्टीवरी । मनोमय दूसरी ।वासना पसरोनि बरी । करि येरझार ॥साधु०॥३॥मागुति सर्वांतरीं । साक्षि अलिप्त परी ।जीवासि शासन करी । स्वकर्मानुसार ॥साधु०॥४॥अविद्या निषेधें शुद्ध । आत्मा याचा लागे शोध ।श्रीगुरुदास्यत्वें बोध । बाणे निर्विकार ॥५॥पद ६८ वें आत्मा अनंत । निर्गुणसगुणपणें जाण । धरुनि भक्तिपंथ ॥ध्रुवपद.॥करुनि वृत्ति निर्विकल्प । उर्वरीत स्फुरद्रूप ।अहंकृतिविण श्रीगुरु खुण आणि धारणेंत ॥आत्मा०॥१॥जाणिव ठायींच जिरे । जाणणेंचि पूर्ण उरे ।समरस निजज्ञानशक्ति । पावे आपणांत ॥आत्मा०॥२॥स्वसंवेद्य ईश दृष्टी । त्या अंगें पाहे सृष्टि ।सतत शांतिस्थितीसि पावुनि राहें त्या सुखांत ॥आत्मा०॥३॥संचित मग होय नाश । न शिवे क्रियमाणलेश ।प्रारब्धभोग अचुक जोंवरि देह होय अंत ॥आत्मा०॥४॥दिव्य भुवन सुंदर हरि । तन्मय मनिं ध्यान धरि ।दासपणें पावसि गतिसि होउनि मूर्तिमंत ॥आत्मा०॥५॥पद ६९ वें निर्निमित्त भक्तिमाजि आहे मोठा लाभ रे ! ।भक्तालागीं श्रीगुरुरूपें प्रकटे पद्मनाभ रे ! ॥ध्रुवपद.॥अवीट अव्यभिचार प्रेमें श्रीचरणासी ध्यातां बरवें ।होय प्रसादेंण साक्षात्कार ज्ञान जें स्वयंभ रे ! ॥निर्निमित्त०॥१॥अज्ञान जड भ्रांती नासुनि बोधभानू उगवे जेव्हां ।जग जगदीश एक भासे आब्रह्मादि स्तंभ रे ! ॥निर्निमित्त०॥२॥त्रिपुटी गिळोनि पहाणें मुळिंचें स्वरूपीं स्थीर राहे मग ।शांतितरुसि येती नित्य नूतन प्रत्यय कोंभ रे ! ॥निर्निमित्त०॥३॥सर्वोत्तम दासपणीं भजनानंदें डोलति अनुदिनीं ।पूर्ण कृपा हे स्मरतां अंगीं न शिवे गर्वदंभ रे ! ॥निर्निमित्त०॥४॥पद ७० वें समज धरुनि गुज उमजावें । शब्दज्ञानीं भरिं व्यर्थ न भरावें ॥ध्रुवपद.॥चिज्जडभाग विवेकें निवडुनि । जाणण्याचें मूळ स्वयें निरखावें ॥समज०॥१॥ज्ञानमात्र जें तन्मयत्वें अकळुनि । उर्वरित मीपणासि विसरावें ॥समज०॥२॥सूक्ष्म मतीनें पावुनि ये रितीं सुख । कल्पित विश्व हृदयीं सांठवावें ॥समज०॥३॥श्रीगुरुदास्यप्रसादें अंतरंगीं । देवभक्त्पणीं प्रेम उरवावें ॥समज०॥४॥पद ७१ वें समजुनि कां हरिलागीं भजना ? ।संतमुखें हें घुज उमजाना. ॥ध्रुवपद.॥व्यापक जो ज्यामाजि जग मागुति ।जगीं नसे स्वयें ज्या अंगीं जग नाना ॥समजुनि०॥१॥अघटित घटनेश्वर हें जयाचें ।त्या स्वरुपीं मन उन्मन कराना ॥समजुनि०॥२॥न घडे योग तथापी अंतरीं ।सर्वाश्चर्यमय मूर्ति स्मराना ॥समजुनि०॥३॥ध्यानप्रसादें सर्व हरि अकळुनि ।दासपणें शांतिसुखें विचराना ॥समजुनि०॥४॥पद ७२ वें जाणण्याचें जाणणें अनंत । म्हणती संत ॥ध्रुवपद.॥ज्ञेय विषया जाणे त्याज्य । ज्ञाता अहंप्रत्यय सज्ज ।पूर्ण प्रबोधें तोहि पावे शांत ॥जाणण्याचें०॥१॥उरे विशुद्ध सत्व ज्ञान । पसरे बिंबात्मत्वें भान ।तन्मय पावुनि नांदे स्वमुखांत ॥जाणण्याचें०॥२॥कल्पित माया नाम मात्र । भासे जगदाकारगात्र ।स्वकीय ईचा जेणें देखे प्रांत ॥जाणण्याचें०॥३॥श्रीगुरुदास्यें हा प्रसाद । होतां नासे विभ्रमवाद ।विचरे स्वैर स्थितीनें निभ्रांत ॥जाणण्याचें०॥४॥पद ७३ वें चित्तलय करिती साधक ये रिति हो ! ।सिद्धाची जे स्थिति ते साधनें साधिती हो ! ॥ध्रुवपद.॥त्रिविध अहंकृती सारुनियां परती ।चित्स्फूर्तीसी आपणामाजि पसरिती हो ! ॥चित्त०॥१॥तन्मय सत्वप्रकाशमतिनें ।कल्पित जगीं समस्वरूप लक्षिती हो ! ॥चित्त०॥२॥द्विविध क्रमें मन उन्मन पावुनि ।दासभावें श्रीगुरुचरणीं रमती हो ! ॥चित्त०॥३॥पद ७४ वें मनिं हरि जगमय धृति धरा रे ! ॥ध्रुवपद.॥ज्या करितां जन स्वकिय प्रियकर । तो हरि अशि खुण धरा रे ! ॥मनिं०॥१॥जेथें वितळति द्वैतभावना । तो सुखमय प्रिय वरा रे ! ॥मनिं०॥२॥दृश्य चराचर न दिसे ज्याविण । तेथें स्मृति पसरुनि फिरा रे ! ॥मनिं०॥३॥पावुनि तन्मय दासपणें मनिं । पाय गुरूचे दृढ धरा रे ! ॥मनिं०॥४॥पद ७५ वें या भावें जाणोनी मन उन्मन करावें हो ! ।अहंममतेचें दुःख सर्व विसरावें हो ! ॥ध्रुवपद.॥निर्गुण सगुणपणें प्रियतम आत्मयासि ।प्रत्यय अंगें दिव्यरूपें चिंतुनि पहावें हो ! ॥या०॥१॥विश्वाकार स्मृती आंत अंतर्बाह्य एक सरे ।निराकार साक्षी अधिष्ठानासी स्मरावें हो ! ॥या०॥२॥वृत्तिरूप ज्ञान सविशेष त्या समाधीमाजि ।अनंत ऐश्वर्य योग स्मरोनि वंदावे हो ! ॥या०॥३॥जड जीवाहुनि पर उत्तम पुरुषाचे अंगीं ।भक्तिसुखालागीं दासपणें उरवावें हो ! ॥या०॥४॥पद ७६ वें मीपण शोधूनि तत्व पाहें बरें आपुलें ।संतसुखें समजुनि खुण साधन कर वहिलें ॥ध्रुवपद.॥कोशत्रय फिटुनि भ्रांती । स्वयें धरिशि नेणिव नसती ।सुषुप्तींत सुखेंचि उरशी । चित्तिं वळख पहिलें ॥मीपण०॥१॥होतां अवर्ण भंग । केवळ चिन्मात्र अंग ।पहातां निजअंतरंग । अद्वैतचि सगळें ॥मीपण०॥२॥दिसे सत्व मिश्रसवें । स्फूर्ति चिदाभास जिवें ।मुख्य बिंब देहिं असुनि । देहामाजि लपलें ॥मीपण०॥३॥कल्पुनि जग आपणांत । निरखी आपणासि त्यांत ।दासपणें तन्मय पावुनि राहे तेथें उगलें ॥मीपण०॥४॥ पद ७७ वें परम सुकृति ते जे हरि भजती ।त्यांचिच मानावी दैवी वैभव प्रकृती ॥ध्रुवपद.॥जिज्ञासु जाणाया ज्ञान । प्रेमें मनें करिती ध्यान ।तोचि श्रीगुरुरूपें तोडीं भवगजविकृती ॥परम०॥१॥एक ते आरोग्यकाम । कोणी अपेक्षोनी दाम ।ते तें पावोनियां होती मुक्ती योग्य मागुती ॥परम०॥२॥सायुज्यादि चारी मुक्ती । भक्तीपुढें तुच्छ मानिती ।दास्यत्वें अवलंबुनि भक्ती देव ऋणी करिती ॥परम०॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 18, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP