मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
श्रीधरस्वामीकृत पदें

श्रीधरस्वामीकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
हरहर नाम बोल आतां वाचे । प्राणिया ! ॥ध्रुवपद.॥
प्राणी उपजोनी संसारीं । अर्चन शिवाचें जो न करी ।
तो ह्या संसारसागरीं । पडिला आवर्तांमाजी ॥प्राणिया०॥१॥
करितां शिवनाम उच्चार । महापापा होय संहार ।
मुक्ति येउनि राखे द्वार । प्राण्या अखंड भक्ताचें ॥प्राणिया०॥२॥
सकळहि देवांचाहि देव । म्हणूनि नाम महादेव ।
नाम गाय स्वयमेव । शिवरूप होईल साचें ॥प्राणिया०॥३॥
जय शिवनामाचा छंद । तया प्रसन्न ब्रह्मानंद ।
श्रीधरस्वामीचे निजछंद । सार्थक करील जन्माचें ॥प्राणिया०॥४॥

पद २ रें
तो हरि असतां कां करुं चिंता ? ॥ध्रुवपद.॥
शुक कोणीं केले हिरवे रे ! । मोर विचित्रही ते बरवे रे ! ।
हंस धवल कोणा करवे रे ! । अत्याश्चर्यसा मिरवे रे ! ॥तो०॥१॥
अन्न जिरे आणि गर्भ तो वाढे । अग्निवरी उदकाचीं झाडें ।
पाहातां येकयेकेक निवाडें । ख्याति असीच असंख्य पवाडे ॥तो०॥२॥
आकाशा अवकाश जयाचा । परमाणूंतही वास जयाचा ।
अक्रिय, नित्य, सबाह्य दयेचा । निधि, श्रीधर शुभ गुण उदयाचा ॥तो०॥३॥

पद ३ रें
सखया रामा ! विश्रांति तुझिये नामीं ।
म्हणउनि मजला ने त्वरें निजसुखधामीं ॥ध्रुवपद.॥
अवचट सुकृतें नरदेहा झाली भेटी ।
पशुसुतजायाधनधामीं प्रीती मोठी ।
माझीं माझीं म्हणुनी म्यां धरिलीं पोटीं ।
यांच्या संगें भोगिल्या दुःखकोटी ॥सखया०॥१॥
सोडुनि स्वहिता धांवलों दिशा दाही ।
शववत झालों मागुता कौतुक पाहीं ।
परि खळजन हे नेदिती कवडी तेही ।
परि हे आशा पापिणी लाजत नाहीं ॥सखया०॥२॥
जंववरि दृढता तंववरि या तनुची प्रीती ।
जर्जर झाल्या निंदक हे अवघे होती ।
यांचीं दुःखें तुजला मी सांगूं किती ।
म्हणउनि येतो श्रीधर काकूळती ॥सखया०॥४॥

पद ४ थें
पूर्णब्रह्म होय रे ! । वर्णूं आतां काय रे ! ।
नंद ज्याचा तात जाणा यशोदा ते माय रे ! ॥ध्रुवपद.॥
ब्रह्मांडाच्या कोटी रे !  सांठवियेल्या पोटीं रे ! ।
यशोदा त्या घेऊनीयां पाजि दुधाची वाटी रे ! ॥पूर्ण०॥१॥
ब्रह्म निर्विकार रे ! । नाहीं ज्या आकार रे ! ।
गौळीयांचे घरीं तोचि दिसतो साकार रे ! ॥पूर्ण०॥२॥
क्षीरसिंधूवासी रे ! । लक्ष्मी ज्याची दासी रे ! ।
अर्जुनाचीं घोडीं धूतां लाज नाहीं त्यासी रे ! ॥पूर्ण०॥३॥
पूर्णब्रह्मानंद रे ! । सर्वसुखाचा कंद रे ! ।
श्रीधरस्वामीलागीं हाची लागलासे छंद रे ! ॥पूर्ण०॥४॥

पद ५ वें
भज भज गोपालम् । गोपीगोकुलपालम् ॥ध्रुवपद.॥
कंठविलंबितनववनमालम् । तनुरुचिविजिततमालम् ॥गोपी०॥१॥
करधृतमुरलीवादनलोलम् । मृगमदतिलकितभालम् ॥गोपी०॥२॥
मणिमयकुंडलरुचिरकपोलम् । श्रीधरपालनशीलम् ॥गोपी०॥३॥


References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP