मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
बाळ कुणीं । संध्याकाळीं र...

राम गणेश गडकरी - बाळ कुणीं । संध्याकाळीं र...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


बाळ कुणीं । संध्याकाळीं रमे गुणी ॥

खेळतसे । बाळ अंगणीं हवें तसें ॥

बागेंत । मौजेनें झोंके घेत ॥

तों दिसली ! सुंदरशी त्याला वेली ॥

देठ कोंवळे । हिरवे पिवळे । नाजुक सगळे ॥

ती वेलीं । हिरवा शालू पांघरली ॥१॥

परी तया । हवा सोबती खेळाया ॥

खेळगडी । मूल फूल सुंदर जोडी ॥

पाहतसे । परि वेलीला मूल नसे ॥

तिच्या कळ्या । होत्या मिटलेल्या सगळ्या ॥

जणुं दमल्या । फार खेळुनी; मग निजल्या ॥

हवेंत डुलणें । हेंच खेळणें । खेळुनि निजणें ॥

ही त्यांची । गादी हिरव्या पानांची ॥२॥

बाळ गुणी । वाइट वाटे फार मनीं ॥

दिवसभरी । खेळुनि आला परत घरीं ॥

झोंपेंत । कितिदां गेला बागेंत ॥

धीर कुठें ? पहांट होतां बाळ उठे ॥

बागेंत । धांव तसाची तो घेत ॥

मौज तों किती । कळ्या न दिसती । फुलेंच हंसतीं ॥

बाळ डुले । चहूंकडे पाहून फुलें ॥३॥

आईला । शोधाया धांवत गेला ॥

मग बोले । "आई ! बघ हीं गोड फुलें ॥

काल कळ्या । आज फुलें झाल्या सगळ्या ॥

कशा उमलल्या ? कुणीं हंसविल्या ? हांसत बसल्या ॥

कशा कळ्या ? आई सांग मला, सगळ्या ?" ॥४॥

मग आई । बाळाला उत्तर देई ॥

"खेळासी । जमति चांदण्या आकाशीं ॥

त्या हंसती । चहूंकडे पाहत बसती ॥

तों दिसल्या । कळ्या बिचार्‍या हिरमुसल्या ॥

कळवळल्या । फार चांदण्या मग रडल्या ॥

आंसूं पडले । ते दंव झाले । धांवत आले ॥

भुईवरी । पडले सार्‍या कळ्यांवरी ॥५॥

तो साचा । रंग पांढरा तारांचा ॥

कळ्यांवरी । चहूकडे जाउनि पसरी ॥

मग हंसल्या । कळ्या फुलें हांसतां झाल्या" ॥

सर्व असें । आई बाळा सांगतसे ॥

ऐकुनि हें । बाळ तिच्या वदना पाहे ॥

कां न कळे । मिठी मारिली तिला बळें ॥

त्या काळीं । आई आनंदें हंसली ॥

हंसता रडली । असवें पडलीं । त्याच्या गालीं ॥

तों साची । कळी उमलली बाळाची ! ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP