मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
अवेळ तरिही बोल , कोकिळे ,...

राम गणेश गडकरी - अवेळ तरिही बोल , कोकिळे ,...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


अवेळ तरिही बोल, कोकिळे, अवेळ तरिही बोल !

रात्र पसरली जगतावरती,

भुरके काळे मेघहि फिरती,

वारा वाहे भरभर भंवतीं,

बालचंद्रचंद्रिका घाबरी गोरीमोरी होत.

उदासीनता छाया पसरी,

सृष्टि दिसे जरि वरुनी हंसरी----

खिन्नताच जरि अंतरिं सारी,

व्यर्थ बोलतो, व्यर्थ डोलतो संसाराचा गोल !

आनंदाच्या प्रातःकाळीं,

दिवसाच्या गजबजल्या वेळीं,

किंवा संध्या जेव्हां नटली,

आनंदाचीं गाणीं गाया गवई लाखकरोड !

असतां आनंदाची माया,

वृद्धि क्षणभर तिची कराया,

लागे ज्याचा तोच गावया,

आनंदाला द्विगुणित करिती आनंदाचे बोल !

परंतु जेथें उदासीनता

व्याकुळ करिते विषण्ण चित्ता,

तेथें त्याला द्याया समता----

गाणें गावें, हेंच अलौकिक ईश्वरतेचें काम !

बाह्य सृष्टि जरि निद्रा भोगी,

अंतःसृष्टि तरी हतभागी;

उडते तशीच राहुनि जागी,

निजवाया तिजलागीं असलें गाणें गाई गोड !

अवेळ येथें कसली बाई ?

दुःखसांत्वना गा केव्हांहि !

अनुकंपेला नियम न कांहीं !

रित्या मनीं या ओत सूर; त्यां जाऊं दे अति खोल

वळवाचा हा वार गार

झोंबुनि पीडा देई फार,

येत गवाक्षांतुनि अनिवार;

येतां जातां सूर काढितो भलभलते भेसूर !

खिन्न चांदणें ढगांआडचें

मग्न मनोरथ झाले ज्याचे----

हंसें जणूं तें अशा मनाचें,

पुष्पवतीच्या तोंडावरची छाया काय उदास !

या अवकाळीं-या एकान्तीं,

निद्रेची मिळवाया शांति,

थकुनी भागुनि पडलों अंतीं,

निद्रा कुठली परि त्या हृदया, भविष्य नाहीं ज्यास

हातीं संसाराची माती,

मनिंच्या आशा मनींच खाती,

भूतकाळचीं भूतें रडतीं !

मिटल्या जाग्या डोळ्यांपुढतीं शून्याचें मैदान !

निष्प्रेमाची शेज सोबती,

भयाण दुनिया सारी भंवतीं,

विषष्ण येती विचार चित्तीं,

ब्राह्यांतर विश्वांत खेळते उदासीनता एक !

गा तर चित्ता मम रमवाया ;

हीच खरी जादूची माया;

आनंदा खेळविणें वायां.

मशाल दिवसां लावुनि होतो लाभ कुणाला काय !

दूर कराया उदासीनता

गाच गडे ! अंगाई गीता,

झोंप येउं दे माझ्या चित्ता,

लक्ष लागतें सुरांकडे तव; वाटति ते बिनमोल !

पाहुनि ही तव दयाशीलता

द्रवेल कोणी भगिनी माता,

शांत कराया हताश चित्ता--

रुक्ष जगावर स्त्रीहृदयांतिल टाकिल अश्रू एक !

त्या अश्रूंच्या शीतलतेनें

भोंवतालची आग जाळणें,

निद्रा घेतां शांत मनानें

’गोविंदाग्रज’ ऐकत राहिल गुंगींतहि हे बोल !

कोकिळे ! अवेळ तरिही बोल !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP