मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
इथें टाकुनी मला नजरही चहू...

राम गणेश गडकरी - इथें टाकुनी मला नजरही चहू...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


इथें टाकुनी मला नजरही चहूंकडे फिरते,
दिसतें तितकें मला मिळेना, नको तेंच मिळतें !
निःश्वासाचें जीवन सारें; आशेची द्दष्टी,
हाय हाय, ही येत कपाळीं मनांतली सृष्टी !
मला नकोसा मी, तो असतो नित्य मला मीच,
क्षणोक्षणीं उंचावत नभ कीं भूमि होत नीच !
देवी देवी, खेळ असा हा मांडिलास काय,
मनांतला हा कैदी करितो सदा हाय हाय !
पळत्यासह कधिं पळतें मन कधिं उडत्यासह उडतें,
कधिं आकाशामागें दडतें, सागरिं कधिं बुडतें !
कोण तयाला तिथून मागें ओढुनि आणीत ?
कीं वार्‍याच्या दोर्‍यासंगें वरतीं उडवाया,
जीव मनाचा पतंग उडवी फिरुनी ओढाया !
तोड तोड त्या दोर्‍या देवा, मन तरि जाऊं दे,
जीव मरूं दे, देह जळूं दे, कांहीं होऊं दे !
एका अंशाची तरि आशा पूर्ण करायास,
उरल्या सुरल्या माझ्या देवा, करि सत्यानाश !
फिरता फिरता, पुरा लहरिचा, स्वैर विश्वगामी,
जाग्या स्वप्नामधला माझा दाखवि मजला मी !
खरें विश्व हें टाक जाळुनी, स्वप्नसृष्टि देई,
मिटल्या डोळ्या दिसे तेंच दे; दिसणारें घेई, !
वस्तुवस्तुचा नाद निपजुनी वार्‍यावर पळतो,
पळतां पळतां दूरदूर मग कुणीकडे जातो,
अट्टाहासें ओरडतां मज विरून जाऊं दे,
नादरूप मज त्या नादसह झुकून वाहूं दे ,
रवितापानें जलबिंदूंची विरल हवा होते,
कुणीकडे ती पळते याचा विचार मन कारेतें !
संतापानें या देहाचें अश्रुच होऊं दे,
अश्रुजलाच्या हवेंत मजला फिरून घेऊं दे !
बघतां बारा, बघतां तारा, हें सारें कांहीं
या माझ्या देहाचे कांहीं कसें होत नाहीं !
कराच मजला महाकवीची कल्पनाच अथवा,
त्याच्या प्रतिभेवरतीं मजला दे टाकुनी देवा !
दुर्दैव्याचें सुदैव करि, जें पळे सदा दूर,
निराश मनिंचें स्वप्न मला वा माझिच हुरहूर !
भाव कुणाचा, करि मज अथवा कोणाची आशा
उंच उंच ती जाइल तोडुनि बंधाच्या पाशा !
कुणा मुलाच्या मनांतली मज करि बा जिज्ञासा,
ज्या त्या वस्तूवर खेळूं दे मायामय भासा !
ज्या रमणीचा नाथ न कळतां चिरनष्टचि झाला,
तिच्या मनाची प्रेमाशा तरि करि देवा मजला !
अशक्य असतें, अतर्क्य असतें, अनंत जें असतें,
त्याच्या त्याच्या पलीकडे ही ती आशा जाते !
त्या आशेच्या रूपानें तरि फिरून घेईन,
अमर्याद विश्वाला वळसा घालुनि येईन !
काय दया तुज नाहीं किंवा अससि फार दूर !
शक्ति धाडिसी तिचा होतसे म्हणूनी कीं चूर !
शक्ती मला धाडिशी दुरूनी ती विरुनी जाते,
माझ्या जवळीं येतां येतां इच्छामय होते !
ती इच्छा मग मनीं सारखी लावी हुरहूर,
त्या शक्तीचा जळत्या हृदयीं कीं होई धूर !
शक्तिहीनता दिली का अशी, असल्या इच्छा का?
अनोळखीला उच्छृंखल मन मारित कां हाका ?
बघुनि बिजेच्या नव्या वांकडया अंधुक चंद्राला,
वाटे त्याची करून द्यावी होडी जीवाला !
बसून तीवर टाकुनि मागें भविष्यकाळाला
दिगंतिं जें जें, अनंत जें जें, हुडकावें त्याला !

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP