अहा ! उगवला पहा अरुण हा उधळित तेजाला.
जगा जागवी, तसा जागवी कविच्या चित्ताला,
जसा उडवि हा अरुण चहुंकडे गगनीं रंगाला !
तसा पहा कवि उडवी अपुल्या चित्त-तरंगाला !
विश्वसूत्रधर सारुनिया करिं पडदा रजनीचा
जगद्रंगभूवरि का उडवित गुलाल गगनींचा ?
करी मंगलाचरणा मंजुल द्विज गुंजारव हा,
येत्या संसाराचि नांदी चाले काय अहा !
पूर्वदिशेवर लाल रंग हा कोण कुठुनि उधळी ?
किंवा फुटली तिच्याच हृदयीं प्रेमाची उकळी ?
रविसदनाच्या गवाक्षास ही काय लाल कांच ?
पल्याड लपलें तोंड तयाचें, दिसेल आतांच !
प्रातःकाळीं गगनपुष्प कीं सूर्याचें फुललें ?
सुगंधमकरंदांचे रस हे चहूंकडे झुकले ?
सदा सर्वदा जगदुद्धारा धरिती ज्या घेर
त्या मंगल सरितांचें आहे का हें माहेर ?
कुणी महात्मा विश्वोद्धारास्तव तप आचरितां
उचंबळुनि का वाहत त्याच्या हृदयाची सरिता ?
गत पुण्याच्या पुष्करिणींतुनि तेज काढण्याला
उडी रवीनें घालितांच कां फेस उचंबळला ?
अखंड सौभाग्याचि सरिता माझी भूमाता
काय लाविते कपाळभर ती हा मळवट आतां ?
कीं सोडुनि जी अम्हां चालली कष्टे निस्तूळ
महाराष्ट्र-लक्ष्मीची त्या ही दिसे पायधूळ ?
भरतें स्वर्गीं ये पितरांच्या करुणारसरंगा,
अम्हां आळशांवर मग ये कीं पूर्वपुण्यगंगा !
कल्पलतांवर फुलें बहरता सडा परागाचा
काय तरंगे स्वर्गंगाजलिं तांबुस रंगाचा ?
दिनरजनींच्या फटींतून या फार दूर ओंड
दिसतें कीं हें कालगर्भिंच्या स्वर्गाचें तोंड ?
हा रजनीच्या उदरीं दिसतो गर्भचि दिवसाचा,
कीं काळाचा बाळ नवा हा नव्याच नवसाचा
दिनरजनींचा, शुभशुभांचा, पापापुण्यांचा,
मंगल संगम रंगपटचि हा दावित गगनाचा !
काय निघाला मानसपुत्रचि विराट पुरुषाचा
विश्वैक्यास्तव मिरवित हा ध्वज विश्वसमत्वाचा ?
विश्वहितास्तव रोज सोडि जो रविला गगनांत;
पुराणपुरुषाचा कीं उघडा पळता तळहात ?
विश्वहितपरा ही ख्रिस्ताची रक्तमया माया,
महंमदाच्या पैगामाची किंवा ही काया ?
शांत रसा या अभंग वाणी प्रसवे तुकयाची,
दया परतली कीं बुद्धाच्या उदार हृदयाची ?
दिव्य भावना भक्तमनीं ज्या त्यांची ही मूर्ति,
भावि कवींच्या रसवंतीची कीं अस्फूट स्फूर्ति ?
आज निपजल्या प्रीतीचा हा मंगल अभिषेक,
जगदिशाच्या कृपावृष्टि ची कीं पहिली फेक ?
पतिव्रता गतसती जयांचें अग्निशयनिं निजणें
अखंड सौभाग्याचें त्यांचें किंवा हें लेणें ?
यशकाळची ही रामाचि सोन्याची सीता,
येत्या अवताराची छाया, कीं रक्तस्फीता ?
कीं, भवितव्या या देवीच्या या विमल दुग्धधारा
धांवत सुटल्या, परितोषाया विश्व शुद्ध सारा ?
उद्धाराया पुन्हां धांवली किंवा भवभीतां
श्रीकृष्णाच्या मनिं उरलेली श्रीभगवद्गीता ?
भावि कालचें हें स्वर्गाचें स्वप्न असे काय ?
ब्रह्मस्वाचा भावि सगुण कीं तेजोमय काय ?
विश्व रची जी आधीं, करि मग वृद्धि पुढें त्याची,
’आज’ रचाया आली का ती इच्छा ईशाची ?
ब्रह्मपदाच्या किल्ल्यावर कीं फडके जरिपटका ?
चिरंतनाची सनद मानावां, तिचा ताम्रपत का ?
अंत न पाही भगवंताला आली काय दया ?
चिन्मंगल मग उभें नभीं हें भूवरिं उतराया ?
अहा ! तयाच्या स्पर्शें होई शुद्ध हृत्तरंग,
दिव्य दृष्टिला पुरता कळला अरुणाचा रंग !
मना ! कल्पना पुरे ! प्रभूची हीच असे जाण
सौंदर्याची, मांगल्याची, प्रेमाची खाण !
प्रीतिरसाच्या, सौंदर्याच्या, देवींच्या मूर्ति
नित्य निर्मि ही परमेशाची अरुणमया स्फूर्ति !
आज उद्यांच्या महाकवींनो ! हृदयिं नीट ठेवा
प्रेमरसाचा, मांगल्याचा हा अद्भुत ठेवा !
अरुण-रसानें याच रंगवा मनिंचीं परि चित्रें !
रंगवीत जा तशीं उद्यांच्या देवींचीं चित्रें !
या रंगानें रंगवितों मी माझ्या हृदयाला,
पडद्यापदद्यावरी काढिलें चित्राचित्राला !
एका पडद्यावरि परि रंगे प्रेमचित्र एक;
हृदयाच्या हृदयांतिल माझ्या तोच शिलालेख !
त्या चित्राचा, त्या पडद्याचा, मम गाना धीर;
त्या चित्रांतिल देवीचा मी विकल शाहीर !
मरतां मी, तो जपाच माझ्या हृदयाचा पडदा;
त्या देवीचा झालों अगणित जन्मांचा बंदा !
तिच्या गालिंचा अरुण सारखा, लज्जे ! वाहूं दे !
’गोविंदाग्रज’ कविच्या ’अरुणा’ त्यांतच राहूं दे !