प्रणयदर्शना जातां मित्रा, न करी उपहासा,
नको थांबवूं मजला, मानुनि खोल हृदयहासा.
कसले डोंगर ? नद्या कशाच्या ? हीं विघ्नें कसलीं ?
प्रेमपथावर सारखींच हीं जरि असलीं नसलीं.
हृदयदेवतादर्शनिं आतां ओढ जिवा लागे;
चला थांबवा त्याला, पाहूं फिरतो का मागे.
मार्गीं डोंगर नद्या पाहुनी घे पळता पाय;
असें निरर्थक निर्जिव माझें प्रेम असे काय ?
नव्या दमाचा, नव्या जयाचा, ज्याचा अवतार,
त्या प्रेमाचा वीर करारी काय न करणार ?
हटतिल डोंगर, तटतिल सरिता ना आपोआप,
झटतिल मेघहि साह्य कराया धरुनि इंद्रचाप !
गिरिशिखरांची पडेल खालीं मोडुनिया मान;
प्रेमापुढतीं सांग कुणाचा टिकतो अभिमान ?
नव्या दमाचा, नव्या जमाचा, त्याचा अवतार
पाहुनि करितिल नद्याच त्याला स्वयें पैलपार.
जो निजहृदया फाडित चपलाप्रिया खेळवाया,
वृष्टि कशी ती मेघ करिल, वद, मला थांबवाया ?
तोच आपुल्या पंखांवरि मज वाहुनि नेईल;
निदान मार्गीं मला विजेचा दिवा दाखवील.
प्रेमें बोले, प्रेमें डोले, प्रेमें जग हाले;
प्रेमाखातर जगीं आजवर काय नाहिं झालें ?
गिरितट फोडुनि नद्या कशाला धांवतात ? सांग.
लता तरुविण सांग कुणाचे फेडितात पांग ?
संध्याहृदयीं रमावयाला सूर्य धांवतो ना ?
नातर गगनाच्या पडद्यावर भटकवेल कोणा ?
प्रेमासाठीं, रामापाठी सीता वनवासी;
वृंदेस्तव हरि स्मशानांतला वृंदावनवासी.
रघुवीरांनीं जलनिधिवरती पर्वत नाचविले;
सांग कोणतें संकट दुसरें त्यावरि ओढवलें ?
गोपिजनांच्या करुणरवाच्या ऐकुनिया ताना,
कसा नस्त्रावरि गोवर्धन धरि गोकुळिंचा कान्हा ?
पुराणांतल्या कथा कशाला ? पहा आजकाल !
नाचतसेना हवें तसें जग प्रेमें बेताल ?
कां ब्राह्मणपदपादशहाला राणी मस्तानी ?
कां धर्मावर लाथ मारिली पंडितरायांनीं ?
ब्रिजभाषेचा प्रेमवाल्मिकी प्रेतावर तरला;
सांग तयाला प्रेमावांचुनि कोणीं हात दिला ?
नजर गुंतली तुझी तरी कां तिकडे त्या नयनीं ?
तसाच इकडे या नयनांस्तव मी बसलों ध्यानीं.
सतीदेवता पतिसह गेल्या रचुनि अग्निशय्या;
प्रेमावांचुनि धीर कवन दे दुसरा लढवय्या ?
तलवारींच्या धारेवरतीं जीवांचा नाच,
रणशुरांनीं कां केला ? जा विचार त्यांनाच.
प्रेमाचा हा प्रभाव असला अखंड बा चाले;
तशांत हें तर निराशेंतुनी प्रेम जन्मलेलें !
नव्या दमाचा, नव्या जमाचा, ज्याचा अवतार,
त्या प्रेमाचा वीर करारी काय न करणार ?