मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
चला चला रे चला चला ॥ विसर...

राम गणेश गडकरी - चला चला रे चला चला ॥ विसर...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


चला चला रे चला चला ॥ विसरुनि विश्वा चला चला ॥धृ०॥

पूर लोटला प्रेमाचा ॥ प्रलयकाळ हा विश्‍वाचा ॥

लोट सारखा उचंबळे ॥ आतां कसला ओघ खळे ॥

स्वार्थाचे तट हे फुटले ॥ चहूंकडे पाणी सुटलें ॥

फुटकी होडी ॥ टाका उपडी ॥

सोडुनि सार्‍या मोहाला ॥ चला मिळूं या ओघाला ॥१॥

अलोट प्रेमाचा पूर ॥ धरणें करि सारीं चूर ॥

विश्‍व बुडालें पाण्यांत ॥ या प्रळयाच्या लाटांत ॥

अथांग पाण्याचा अंत ॥ जाणि एक तो भगवंत ॥

पाणी इकडे ॥ पाणी तिकडे ॥

पाणी पाणी चहूंकडे ॥ आतां लपवतां कुणीकडे ॥२॥

खडक बुडाले गर्वाचे । विरले डोंगर रागाचे ॥

खंदक जिरले द्वेषाचे ॥ कडे मोडले त्वेषाचे ॥

जीव कोंडला आशेचा ॥ श्‍वासचि बंद निरशेचा ॥

प्रेमजलाचा ॥ हृदयरसाचा ॥

सागर करि तांडव नाच ॥ प्रलयकाळ तो बा हाच ? ॥३॥

दिशा दहाही खळबळल्या ॥ सीमा त्यांच्या विरघळल्या ॥

त्रिवेणिसंगम काळांचा ॥ मागेंपुढें न व्हायाचा ॥

रजनीचा पडदा धुतला ॥ दिवसाशीं तन्मय झाला ॥

पांचहि भूतें ॥ पंचत्वातें--

गेलीं; गिळिलीं प्रेमजळें ॥ त्रिगुणांचा रंगहि निवळे ॥४॥

पाण्याच्या चढत्या लाटा ॥ उचंबळति बारा वाटा ॥

पृथ्वीसूर्य ग्रहगण तारे ॥ बुडबुडेच त्यांवर सारे ॥

प्रकाश वरचा फेस असे ॥ तिमिर नीलिमा आंत नसे ! ॥

एकाकारें ॥ विरलें सारें ॥

पहा पहा रे पहा पहा ॥ प्रळयाची ही मौज अहा ! ॥५॥

पाहणार परि कोण उरे ॥ जेथें सर्वचि विश्‍व मुरे

हृदयाचें पिंपळपान ॥ आत्मा माझा भगवान ॥

बाळरुप निजलें शांत ॥ उठविल त्याला कल्पांत ॥

चला तोंवरि ॥ आपण सारीं ॥

प्रेमाच्या या प्रळयांत ॥ उडी घालुं या निमिषाम्त ॥६॥

जन्म इथें मरणा जाई ॥ जन्म इथुनि मरणा नाहीं ॥

सर्वांवर फिरतां पाणी ॥ कोणास्तव रडणें कोणी ? ॥

हृदयसागराच्या लहरी ॥ पोहत आत्मा तयांवरी ॥

विश्व बहिरलें ॥ विश्व महिरलें ॥

प्रेमजलाचा भडिमार ॥ करि जीवा गारीगार ॥७॥

चिरविश्वाचा अवतार ॥ या पाण्यामधली गार ॥

विरुनि जाऊं द्या एकसरें ॥ जिरुनि जाऊं द्या प्रेमभरें ॥

’समा’होऊं द्या भरतीची ॥ एकसारखी चढतीची ॥

अखंड राही ॥ अखंड वाही ॥

प्रेमसागरा ! तव भरती ॥ चढवि सदा वरतीं वरतीं ॥८॥

प्रेमसागरा, तव लहरी ॥ उडवी अजुनी वरीवरी ॥

अफाट लाटा नाचीव ॥ ब्रह्मनाद तो ऐकीव ॥

लाटांचे देऊनि झोके ॥ काळाचीं मिळवी टोकें ॥

या बाजूला ॥ त्या बाजूला ॥

कुठेंहि मग मी पडे जरी ॥ सर्व सारखें मला तरी ॥९॥

थांबवील असला पूर ॥ कोण असा आहे शूर ? ॥

अनंतास देउनी वळसा ॥ ब्रह्माच्या जाइन कळसा ॥

विश्व बुडे मम हृदयांत ॥ पूर्ण हरपलें अंशांत ॥

बोलत जय जय ॥ डोलत थय थय ॥

अनंततेच्या पलीकडे ॥ प्रेमप्रळया, जाच गडे ॥१०॥

गाणें माझें प्रळयाचें । कुठलें तें संपायाचें ॥

प्रळयाच्या लाटा उडती ॥ गाण्याचीं कडवीं चढतीं ॥

ब्रह्मस्थितिची शून्यगति ॥ तिच्यांतुनिहि गाणीं निघतीं ॥

स्वानंदाच्या---- ब्रह्मपदाच्या ॥

पूर्णपणाच्या पैलथडी ॥ गाण्याची जाईल उडी ॥११॥

ब्रह्माहि स्वपदिं हालेल ॥ गाणें तरि हें चालेल ॥

शून्यकल्पनेहुनि खोल ॥ प्रेमप्रळयाचे बोल ॥

नका थांबवूं प्रेमाला ॥ नका थांबवूं गाण्याला ॥

हृदयचि हरलें ॥ शब्दहि सरले ॥

निःशब्दांच्या नादभरीं ॥ गाणें ऐकत रहा तरी ॥१२॥

टाकुनिया चिद्राजीव ॥ प्रळयामाजीं द्या जीव ॥

अचेतनाच्या गुंगींत ॥ ऐका प्रळयाचें गीत ॥

मृतविश्वाचें तेरावें ॥ कडवें चालें तेरावें ॥

कोणी निंदा ॥ कोणी वंदा ॥

प्रेमप्रळया प्रेमरसें ॥ ’गोविंदाग्रज’ गात बसे ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP