चल, सख्या जिवा रे, पुन्हां घरीं । कां उगाच फिरसी पिशापरी ? ॥धृ०॥
पाय लागुनी कांच तडकली । पुन्हा जोडणें कुणीं तरी,
ती कशी तरी कीं कधीं तरी ॥चल०॥१॥
कळस देवळावरला ढवळा । पुन्हां बसविणें कुणीं तरी,
तो कसा तरी कीं कधीं तरी ॥चल०॥२॥
वेजीं उतरे मोतीदाणा । पुन्हां सांधणें कुणीं तरी,
तो कसा तरी कीं कधीं तरी ॥चल०॥३॥
हार घेउनी घार पळाली । पुन्हां आणणें कुणीं तरी,
तो कसा तरी कीं कधीं तरी ॥चल०॥४॥
लवून गेली बहार बिजली । पुन्हां पाहणें कुणी तरी,
ती कशी तरी कीं कधीं तरी ॥चल०॥५॥
लाटा जळांतरिं पळांत जिरली । पुन्हां चढविणें कुणीं तरी,
ती कशी तरी कीं कधीं तरी ॥चल०॥६॥
सूर विराला वार्यावरतीं । पुन्हां छेडणें कुणीं तरी,
तो कसा तरी कीं कधीं तरी ॥चल०॥७॥
पळे सपाटीवरतीं पारा । पुन्हां बांधणें कुणीं तरी,
तो कसा तरी कीं कधीं तरी ॥चल०॥८॥
घडूं नये तें घडून गेलें । पुन्हां घडविणें कुणीं तरी,
तें कसें तरी कीं कधीं तरी ॥चल०॥९॥
’गोविंदाग्रज’ बघे सदाही । या संसारीं नवलपरी,
कीं तरीमागुनी तीन तरी ॥चल०॥१०॥