मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
देहाभंवतीं अंधाराची अधीं ...

राम गणेश गडकरी - देहाभंवतीं अंधाराची अधीं ...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


देहाभंवतीं अंधाराची अधीं काळी छाया,
व्यापि जिवाला आठवणीची अंधुक उदास माया !
उदास संध्याकाळ; भोवतीं वारा वाहे कुंद,
चढे शाहिरी शराब; झाला ‘ गोविंदाग्रज’ धुंद !
एक मनाच्या मरजीसाठीं प्रीतीचा इतिहास
लिहून ठेविला, रसिक वाचका, खूशल त्याला हांस !
पेमकथा ही ऐकायाला नको रिकामा कान,
ज्याची त्याला दस लाखाची मुक्या मनाची तान !

संदिग्ध व्यक्ति

पुढें लकाकत वाजत गाजत आला पाउसकाळ,
हिरवळले त्या काळीं सगळे मिरजमळ्याचे माळ !
नाच परोपरि करि बिजलीचो वर लखलखती घाई,
भीतीने डोळ्यांत तुझ्याही खेळे ती चपळाई !
शीतल जलकण तनुवरि उडवी शीतवात निजरंगें,
किंचित् भिजलीं, गारटलीं हीं अपुलीं विव्हाळ अंगें
निकट, नकटतर सरली-न कळत अंतर विलया गेलें.
उष्ण श्वासें परस्परांचें शीत निवारण केलें !
स्त्रीसहजा संकोचवृत्ति ही कोमल तितकी क्रूर,
प्रसंग साधुनि करी विरम मग लावि पुढें हुरहुर !
चुकल्या चित्ता चटपट लागे, हृदय संशयें हालें,
सीमारेपा निरखिल्या न तों इंद्रचाप मावळलें !
पुन्हा मनाच्या जगांत आली कितीकदा ती वेळ,
एकसारखा करी आपुला झला तितका खेळ !
झालें असतें काय दुजा क्षणीं नव त्याची जाणीव,
अवघड कोडें हुडकायातें करित धडपड जीव !
क्षणचि आणखी एक, शब्द वा एक, एक द्दक्पात,
जरी लाभतां तरि हा चुकता असा मनाचा घात !
उंच पठारावरी धांवतां फूलपांखरामागें,
हात सरकला पुढें-अरेरे-पंखहि हाता लागे,
तोंच तेथुनि कडा लागला-तें सरतें पाऊल,
वरुनि तरळतें फूलापाखरूं पाडी द्दष्टिला भूल,
अधांतरीं तें भिरभिरतें मग-अंतर नसता फार,
जडावलेल्या जिवास भासे परि ते नानाकार !
निःश्वासाच्या लहरीवरतीं दूर तरंगत जाई,
उदास ओसाडीच पुढें ती वरतीं खालीं पाही !

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP